ग्लोबल कुटुंब

आपण सगळे सिंगापूरमध्ये राहतो आणि आपला अनेक देशाच्या लोकांशी संपर्क येतो. आत्ताच्या काळात वसुधैव कुटुम्बकम् किंवा हे विश्वाची माझे घर, हे आणखीनच खरं झालंय. कारण जग खूप जवळ आलंय. पूर्वी इतकं आता परदेशी जाणं हे अवघड राहिलेलं नाही. आपण इतके देश फिरतो, इतक्या प्रकारचे जेवण जेवतो, कि पूर्वी सारखं आपल्याच प्रकारचं जेवण पाहिजे असा आग्रह आता राहिलेला नाही. जेवायला गेल्यावर आपण मेक्सिकन, थाई, चायनीज, हे अगदी आवडीने खातो. पूर्वीसारखं 'आमटी-भाताशिवाय आमचं काही होत नाही बुवा' हा प्रकार कमी होत चालला आहे. आता कपड्यांचं बघितलं तर जीन्स आणि टी शर्ट हा एक ग्लोबल ड्रेस झाला आहे. बायका, पुरुष सगळे जॉब करत असल्याने सुटसुटीत कपडे सर्वांनाच बरे वाटतात. जे घालून काम करायला सोपं पडेल, अश्याच कपड्यांना आपण प्राधान्य देतो. एकमेकांशी इंग्लिश बोलतो. कारण ही एक भाषा आहे जी सगळ्यांना समजते आणि बोलता येते. 

सिंगापूरने जी एवढी प्रगती केली, त्याचं खूप मोठ्ठं श्रेय इथे बोलल्या जाणाऱ्या इंग्लिश भाषेला द्यावं लागेल. त्यामुळे थेट परकीय गुंतवणूक करणं, इथे नवीन व्यवसाय स्थापित करणं लोकांना सोपं जातं. भाषा ही खूप मोठी अडचण असू शकते. जसजसे देश जवळ येत चाललेत, तसतसा प्रत्येकाला आपल्या उद्योगाचा व्याप वाढवावासा वाटतो. पूर्वी भारतातल्या एका गावात जर उत्पादन युनिट आहे, तर तो व्यावसायिक फक्त त्या गावातच माल विकत असे. मग हळूहळू त्याची इच्छा झाली कि, पूर्ण भारतात आपला माल विकावा. पण आता मात्र फक्त भारतात माल विकून तो खुश राहत नाही, कारण त्याला जगभर माल विकायची इच्छा असते. म्हणून तर हल्ली जग म्हणजे ग्लोबल विलेज झालेलं आहे. 

फक्त एकच वाटतं कि, सर्व प्रगती होत असताना वेगवेगळ्या देशांची संस्कृती लोप पावायला नको. कारण आता सगळेच बर्गर्स खातात, जीन्स - टॉप घालतात व इंग्लिश बोलतात. एकमेकांशी नातं जोडण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी हे सगळं खूप छान आहे. पण त्यात प्रत्येक देशाची संस्कृती, पेहराव, भाषा, खाणं, पिणं हे मागे पडत चाललंय. एक दिवस मी माझ्या एका चायनीज मैत्रिणीशी गप्पा मारत होते, तर तिनं सांगितलं कि चायनामध्ये फक्त लोकांचा पेहरावच बदलला असं नाही, तर त्यांनी आपली लग्नाची पारंपारिक पद्धतसुद्धा बदलून टाकली आहे. आता रजिस्टर लग्न होऊन पार्टी दिली जाते. मला असं वाटतं की, लग्नासारख्या पारंपारिक पद्धती सोडायला नकोत. ग्रहयज्ञ, मेंदी, सीमांत पूजन, आणि सर्व विधींसकट लग्न सोहळ्याचा असा छान ३,४ दिवस आनंद घेता येतो. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.

माझे यजमान डॉ. राजीव असेरकर हे व्यवस्थापन (management) कॉलेजमध्ये शिकवतात आणि आम्ही कॅम्पसवर राहतो. आमच्या इथे बराचसा स्टाफ आणि विद्यार्थी हे परदेशी असल्याने आमचा त्यांच्याशी रोज संपर्क असतो. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या देशांच्या चाली रिती, संस्कृती समजावून घेता येतात. नुकतीच एका अमेरिकन जोडप्याशी छान मैत्री झाली व गप्पा मारताना जाणवले की ते ३ नातवंडांचे अतिशय प्रेमळ आजी- आजोबा आहेत. आपल्या मुलीची काळजी वाटणारे ब्रिटीश बाबा, किंवा जेवणाकरता बायकोची वाट पाहणारा ऑस्ट्रेलियन नवरा हे मनानी आपल्या सारखेच आहेत हे जाणवते.

आपल्या आधीच्या पिढीला ही संधी मिळत नव्हती. माझे आई, वडील, सासू, सासरे हे पूर्ण आयुष्य एकाच गावात राहिले. व खूप जणांनी तर एकाच जागी नोकरी केली, व तिथून निवृत्त होऊनच बाहेर पडले. अर्थात तेही स्थिर आयुष्य छान होतं. आता आपल्या व आपल्या मुलांच्या जीवनशैली मध्ये फारसा फरक राहिलेला नाहीये. कुटुंबातले, नात्यातले लोक परदेशी स्थायिक असण्याचं प्रमाणही जास्त आहे व एकमेकांकडे परदेशी जाणं पण खूप वाढलंय. कारण विमानाने प्रवास करणं लोकांना परवडणारं झालं आहे.

जग जवळ आणण्यात मोबाईल फोन, whatsapp, फेसबुक आणि ईमेल्सचा अर्थातच खूप मोठा हातभार आहे. आता भारतात IT कम्पनी मधे काम करणारे लोक US, UK च्या वेळा पाळत काम करताना दिसतात. परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्याचं प्रमाणही खूप वाढलं आहे. ह्या सगळ्यामुळे हे विश्वची माझे घर हे अगदी खरं झालं आहे. फक्त ह्या ग्लोबल कुटुंबात लोकांनी एकमेकांशी सलोख्याने राहावं, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

- मेघना असेरकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा