माझी सखी, माझी सय - आकाशवेडी



माझी सखी, माझी सय - आकाशवेडी 
 
मनातली कविता ही कधी तरी अचानक भेटते अन् मग अंतरंगात एक गोल गिरकी मारून मनोलहरींच्या तरंगात हेलकावे घेत रहाते. प्रत्येक हेलकाव्याबरोबर तिचा भाव नव्याने गवसतो आणि ती अजूनच हवीहवीशी वाटते, नकळत आपलीशी बनून जाते. गरजच नसते की ते शब्द आपलेच हवेत, तिच्यात गवसलेल्या भावना आणि तिची भेट झालेला तो क्षण मोलाचा ! माझ्या मनाच्या कोंदणात सजलेली कविता शाळेच्या पाठ्यपुस्तकात भेटली. शालेय जीवनात भेटलेली "पद्मा गोळे' यांची "आकाशवेडी' कविता.
मी एक पक्षिण आकाशवेडी
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणांतळी.

स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन्
निशा गात हाकारिते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय नीडांतुनी अन्
विजा खेळती मत्त पंखांतुनी.

ही कविता प्रश्नांची उत्तरे व संदर्भासहित स्पष्टीकरण या पुरती मर्यादित राहिली नाही तर तिने तिच्या रंगात मला पुरते माखून टाकले. आकाशाचे आणि निळाईचे वेड असलेल्या मला ती जवळची भासली ती तिच्या शेवटच्या कडव्यामुळे. "किती उंच जाईन पोहोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावारी, आकाशयात्रीस ना खेद त्याचा निळी जाहली ती सबाह्यांतरी'. कवितेला लावलेली चालही खासच होती, "ओ मेरे सपनोके सौदागर मुझे ऐसी जगह ले जा'. तिचे गुणगुणणे ह्यांच चालीवर सुरु झाले आणि त्या वयानुसार कवितेचा अर्थ लावला, "एक पक्षीण जिचे ध्येय आकाशापर्यंत पोहचण्याचे आहे आणि त्या ध्येयात ती रंगून गेली आहे. दिवस उगवतो ते आकाशाचे स्वप्न घेऊन आणि रात्रही त्या ध्येयाचेच गाणे गाते. मग एक नवा उत्साह पंखात संचारतो अन् आकाशाकडे झेप घेतली जाते. आकाशाचे विविध रंग लेवून त्याच्याच दिशेने वाटचाल सुरु रहाते. इतकी असोशी, इतके प्रयत्न पाहून तो सूर्यही उषेला गुजतो, "ह्या पक्षिणीच्या ध्येय वेडात, ध्यासात आकाशाचेही गाणे सामावलेले आहे की नाही, त्याची भेट झाल्यावर खरंच पूर्ततेचा आनंद मिळेल ना? पण ही वेडी पक्षीण तिला तर कशाचेच भान नाही, खंत नाही, तिला हेही माहित नाही की या आयुष्यात ती आकाशापर्यंत पोहचेल किंवा नाही कारण ती त्या आकाशवेडातच रंगून गेली आहे.'

अशी झेप घ्यावी,असे सूर गावे,
घुसावे ढगामाजि बाणापरी,
ढगांचे अबोली भुरे केशरी रंग
माखून घ्यावेत पंखावरी.

गुजे आरुणि जाणुनी त्या उषेशी
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारिते काय वीणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर.

ते वय सरून गेले तरी तिचे गुणगुणणे त्याच चालीवर कधी मनात तर कधी एकट्यानेच स्नानगृहात सुरु राहिले. जणु आता ती कविता राहिलीच नव्हती ती माझी जीवाभावाची सय झाली होती. तिला कविता म्हणणे सोडून दिले आणि 'सई' म्हणून तिला मिरवू लागले. तिच्या प्रत्येक भेटीत ती मला नव्याने गवसत गेली, नवे अर्थ देऊ लागली. आकाशाच्या निळाईच्या अथांगपणाची पहिली ओळख तिनेच मला करून दिली, तेव्हा कुठे स्वत:च्या थिटेपणाची जाणीव झाली, डोळ्यातल्या, प्राणातल्या आकाशाचे मर्म कळले. मग एक नवी धडपड सुरु झाली त्या निळाईत रंगून जाण्याची, तिच्या विस्तृत कक्षा डोळ्यांत सामावून घेण्याची.
दिवसागणिक आकाशाची निळाई वेगवेगळ्या रुपात माझ्याकडे झेप घेऊ लागली अन् माझ्या कोशातून मी तिच्याकडे नव्या दमाने नव्या उत्साहाने उडाण घेऊ लागले. नव्या दिनुचे नवे अनुभवाचे गाणे नव्या रंगांची जाणीव देऊ लागले. ढगांच्या अबोली, भुर्‍या-केशरी रंगाला परिस्थितीनुरूप अर्थ लाभू लागले. कधी अबोली रंगात लहानग्या बाळाचे गोबरे गाल दिसले तर भुर्‍या रंगात डोक्यावरचे जावळ अन केशरी रंगात माथ्यावरचा अष्टगंधी टिळा, कधी अबोली रंगात मुसमुसलेले तारुण्य, भुर्‍या रंगाच्या बोलक्या बाहुल्या अन लज्जेने सरकलेली केशरी चुनर. आरुणी तेव्हा उषेला गुजत राहिला आणि प्रत्येक अनुभवक्षणांचा स्पर्श होताच विणलेल्या नव्या नात्याचा नवा सूर गवसू लागला.
माझ्या दोन डोळ्यात मावणार्‍या, माझ्या खिडकीतून दिसणार्‍या आकाशाला आताशा खिडकीच्या गजाआडच्या बंदीतून पहाणे सोडलेय अन् अधाशासारखी त्याचा ध्यास घेऊ लागलेय. तेव्हापासून एक वेगळाच अनवट राग कानी पडतो अन् मनोपाखरू क्षणार्धात देहरूपी निडातून त्या निळाईकडे झेप घेते. नव्या सुरात नवे गाणे, नवे सार्थ अर्थ गवसू लागतात. अबोली रंगात दोन चरणकमल दिसू लागतात तर भुर्‍या रंगाच्या आड शामलवर्णी, केशरी वस्त्र धारण केलेला बंसीधर खुणावतो त्याच्या रंगात रंगून जाण्यासाठी. मीही आसुसले आहे त्या शिव-स्पर्शासाठी आणि त्याच्या झंकार रागासाठी. न जाणे अजून किती नवे साक्षात्कार ही माझी सखी मला देईल? जसजसा वयाचा व्यास वाढत जाईल तसा अनुभवांचा परिघही वाढेल आणि नवे अर्थ ह्या नश्वरतेला गवसतील तोपर्यंत तिचे गुणगुणणे अव्याहत सुरूच राहील...
किती उंच जाईन, पोहचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी
आकाश यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी!

मुक्ता पाठक शर्मा



1 टिप्पणी:

  1. खूप छान कविता आणि स्पष्टीकरण देखील खूप छान दिलेले आहे बालभारती पुस्तकात ही कविता होती तेव्हापासून माझ्या स्मरणात आस्थागायत ही कविता आहे कवयित्रीने खूप छान अशी ही कविता लिहिलेली आहे जणू काही ती माझीच मला वाटते आणि म्हणून पुन्हा आज ती कविता मला आठवली मी एक पक्षी आकाश वेडी

    उत्तर द्याहटवा