मी आणि कुसुमाग्रजांची कविता


मी आणि कुसुमाग्रजांची कविता
 मराठी कवितेची आवड मला शाळेत असल्यापासूनच लागली. खरं तर मी एका इंग्रजी शाळेत शिकणारा विद्यार्थी - म्हणजे अभ्यासक्रमात लोअर मराठी. असे असूनसुद्धा “मराठी भाषेची आणि खास करून कवितांची आवड कशी काय?असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडणे स्वाभाविक आहे.  इंग्लिश शाळेत शिकत असलेल्या मुलांचा बोलण्याखेरीज मराठीशी संबंध नाही, त्यांना मराठी भाषेमध्ये  इंटरेस्ट नाही, असा एक नकळत शिक्का मारला जातो. बाकीच्यांचे कदाचित असे असूही शकेल, माहित नाही, पण मला मात्र मराठी साहित्याची आवड आहे. ती लागली घरातल्या वातावरणामुळेच. माझ्या आई-बाबांना मराठी कवितांची फार आवड आहे. त्यामुळे घरी कुसुमाग्रज, गदिमा,आरती प्रभू, पाडगावकर, ग्रेस, भट, यांसारख्या सगळ्या कवींचे काव्यसंग्रह आहेत. अर्थातच या सर्व कवींच्या कविता ऐकतच मोठा झालो. शाळेत असताना बाबांचे मित्र दर रविवारी सकाळी घरी कविता वाचायला यायचे. मी पण त्यांच्यातच जाऊन बसायचो. कविता कधी कळायच्या नाहीत, पण कवितेनंतर मित्रमंडळीत होणाऱ्या चर्चेमुळे कवितेचा भावार्थ थोडाफार कळत असे.
मोठा झालो तशा त्या त्या वयानुसार त्या त्या कविता पण कळायला लागल्या. हळुहळू कविता वाचायला लागलो. बालकवींच्या निसर्गकविता, संदीप खरेच्या कविता, नंतर कुसुमाग्रजांच्या कविता. आई मराठीची शिक्षिका आहे म्हटल्यावर अगदी काहीही अडलं तरी घरच्या घरी उत्तर मिळायचं. या सर्व मंडळींबरोबर बसून अगदी सातवी-आठवी-नववीत असतानाच अनेक सुंदर सुंदर कविता ऐकल्या, वाचल्या; पण या सर्व कवींपैकी ज्यांची कविता सगळ्यात भावली ते होते कुसुमाग्रज.
कुसुमाग्रजांची आणि माझी ओळख तशी फार जुनी. प्रथम त्यांना अगदी नकळत, वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी भेटलो – त्यांच्या “वेडात मराठे वीर दौडले सात”आणि “पावनखिंड” या कविता गाण्याच्या रूपातून ऐकल्या तेव्हा. ही गाणी नंतरही अनेकदा ऐकली, परंतु त्या गाण्यामागच्या कवीला मात्र विसरलो होतो. पण आयुष्यभर लक्षात राहील अशी त्यांची-माझी पहिली ओळख राजगडाच्या सदरेवर घडली. स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कवितेत गडकोटांचे वारंवार उल्लेख असतातच. त्यामुळे त्यांची आणि माझी व्यवस्थित ओळख राजगडाच्या त्या उंच पहाडावर झाली यात काही नवल नाही. ती भेट घडवून दिली निनादराव बेडेकरांनी. कुसुमाग्रजांच्या “निर्धार” या कवितेचं वाचन करून बेडेकरांनी त्यांचं भाषण संपवलं होतं. शेवटची ती कविता ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे होते, आणि अंगात जोश सळसळत होता. ही ओळख झाली तेव्हा मी सातवी-आठवीत होतो. त्यानंतर कुसुमाग्रजांशी ओळख वाढतच गेली ती त्यांच्या “विशाखा”, “हिमरेषा”, “रसयात्रा” व इतर अनेक पुस्तकांमधून.
मी दहावीत असताना इंग्लंडला होतो. अर्थात माझ्यासोबत ही सगळी पुस्तकं आली होतीच, पण त्याचबरोबर एक, आधी कधी हाती न लागलेले माध्यम देखील इथे मिळाले. या काळात अल्फा मराठी या वाहिनीने “नक्षत्रांचे देणे” हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्या सीडीज घेऊन गेलो होतो. रविवारी दुपारी आई-बाबांबरोबर बसून मराठी विश्वातले “नक्षत्रांचे देणे” ऐकत असे. ज्या दिवशी कुसुमाग्रजांची सीडी लावली, तो दिवस अजूनही आठवतो. दुपारी ३-६ या वेळात ती सीडी बघत होतो. काव्य काय असतं, एखाद्या शोमध्ये ते कसं म्हणावं, कवितांना साध्या चाली लाऊन त्या म्हणणे याचे धडे देणारी ती सीडी आहे. आधी केवळ वाचलेल्या कविता आता ठराविक पद्धतीने मीटर मध्ये म्हटल्या की १-२ वेळा ऐकून पाठ होत होत्या! कवितांबरोबरच कुसुमाग्रजांची आधी न पाहिलेली बाजू पाहायला मिळाली ती म्हणजे त्यांनी लिहिलेली नाटकं व काही नावाजलेल्या नाटकांमधली दृष्ये. ययाती देवयानी, दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, मुख्यमंत्री, कौंतेय व नटसम्राट या अजरामर नाटकांमधले काही उतारे ऐकायला मिळाले आणि नंतर आपसूकच ही सगळी नाटकंदेखील पाहि ली गेली.
नाटकं जरी आवडली, तरी मुळात कुसुमाग्रजांकडे ओढ होती ती मुख्यतः त्यांच्या कवितेमुळे. नटसम्राट या नाटकामधलं “कोणी घर देता का घर?जितक्या सहजतेने भावनावश करतं, तितक्याच सहजतेने “पृथ्वीचे प्रेमगीत” ही कविता चेहऱ्यावर हसू आणते आणि त्याच सहजतेने “क्रांतीचा जयजयकार!ही कविता प्रेरित करते! कुसुमाग्रजांचे हेच वैशिष्ट्य आहे. माणसाला वाटणारी कोणतीही भावना सोप्या साध्या सरळ शब्दांमधून ते आपल्या कवितांत मांडतात. मग त्या कवितेत “काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हातअशी भावना व्यक्त होत असो, “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा” असो नाहीतर “पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा” असो- अगदी कवितेची “कन्सेप्टथेट आपल्या मनाला जाऊन भिडते! कवितेची पहिली ओळ कानावर पडली की पूर्ण कवितेचा धो धो धबधबा मनात पाडण्याचे सामर्थ्य कुसुमाग्रजांकडे आहे. तेच त्यांचे वेगळेपण आहे.
खरं सांगायचं तर कुसुमाग्रज हे दोन पानात सामावणारे व्यक्तिमत्व नाही. त्यांच्या कवितेत आकाश व्यापून टाकायची क्षमता आहे. पण अगदीच थोडक्यात सांगायचं झालं तर निदान माझ्यासाठी तरी कुसुमाग्रजांची कविता मराठी वाङ्मयाच्या सृष्टीतली गंगाच आहे. त्या कवितेला गंगेसारखाच ओघ आहे. एक अखंडता आहे. ज्या प्रमाणे गंगा पावसाळ्यात आपले किनारे फोडून आजुबाजुची जमीन सुपीक करते, तशीच कुसुमाग्रजांची कविता मनाची आखलेली चौकट ओलांडून नवे विचार करायला भाग पाडते, खूप काही शिकवून जाते आणि जणु आपलं डोकंच सुपीक करते. ऋषिकेश, हरिद्वार, प्रयाग, काशी जशी गंगेवरची तीर्थक्षेत्रं आहेत, त्याचप्रमाणे विशाखा, हिमरेषा, छंदोमई ही मराठी साहित्याची तीर्थक्षेत्रं आहेत. ही तीर्थक्षेत्रं ध्येयवाद, आशावाद, सकारात्मकता, राष्ट्रप्रेम, समाजसुधारणा, स्वातंत्र्य व इतर कितीतरी (सहसा दुर्लक्षित केलेल्या) गोष्टींची बीजं आपल्या मनात रुजवतात.
मराठीत अनेक प्रतिभावंत कवी होऊन गेले, आजही आहेत; पण या सगळ्यांमध्ये मला कुसुमाग्रजच का भावले? याचं उत्तर पुलंच्या एका वाक्यातूनच देता येईल. पु. ल. म्हणतात “फलज्योतिषी माणसाचे जन्म नक्षत्र सांगतात. मला त्या शास्त्रातले काहीही गम्य नाही. पण माझे तारुण्य जन्माला आले, ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या अवकाशात सोडलेल्या “विशाखा” या नक्षत्रामुळे!” खरोखर, माझ्या वाचनाच्या critically formative years चे जे दोन आधारस्तंभ होते त्यात एक कुसुमाग्रज होते. आज सिंगापुरात घरापासून दूर, एकटाच रहाताना, कुसुमाग्रजांची कविता एक भक्कम आधार झाली आहे.
सर्वात मधुर स्वर-
ना मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा
ना सागराचा, ना कूजनाचा, ना आमंत्रित ओठातील हसण्याचा.
सर्वात मधुर स्वर,
कुठेतरी, कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळखळा तुटण्याचा”.


चिन्मय दातार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा