मी माझा: प्रत्येकाचं स्वतःमधल्या "मी" शी असणारं अनाकलनीय पण सुंदर नातं

हा "मी" माझाच काय पण कुणाचाच नसावा,
कारण जर तो "माझा" होऊन राहीला तर … 
तर मग नियतीनेच ठरवावा, तो कसा आणि कधी असावा.
एकाच या शब्दामुळे रामायण-महाभारत घडलं,
तरीसुद्धा माणसाचं त्या "मी" वर इतकं प्रेम,
की पावला पावलाला, त्या "मी" शिवाय अडलं.

त्याची कितीतरी नावं आहेत, कित्येक स्वभाव त्याचे,
ज्यानं जो "मी" उचलला, त्यावर बांधले जातात
त्याच्या तथाकथित नशिबाचे आडाखे. 
तसं पाहता कोणता "मी" उचलायचा ते ठरलेलंच असतं, 
त्यामुळं फायदा होणार की तोटा, हे कळत नसावं. 

कर्णाला जन्म देताना कुंतीला तरी कुठं माहित होतं,
कवच कुंडलांसहित कर्णाचा "मी" जन्माला आला होता,
स्वतःसारखीच सुरक्षा तो साऱ्या विश्वाला देणार होता.
त्याची पावलं पांडवांकडे वळली असती तर कदाचित,
त्याचा "मी" अजूनही तेजस्वी आणि पुनीत झाला असता. 

तेच कौरवांच्या शंभर "मी" चं नियतीला पडलं कोडं, 
पश्चात्ताप झाला तिला का नाही आवडलं थोडं,
शंभर तुकडे एकाच वेळी श्वास घेते झाले,
कौरवांच्या वंशाचा उद्धार "मी" पणाने करते झाले,
असा "मी" कुळाचा नाश करायला देते झाले. 

कृष्ण जाणता विष्णुअवतार, बासरीत नादावला,
एक सहस्त्र स्त्रीयांचा अधिष्ठाता होऊन जगला,
त्याच्या रसिक प्रवृत्तीचा "मी" फारच सखोल होता,
कुणा येणा-जाणाऱ्याला तसा तो कळणार नव्हता,
तो गीतेचं सार जीभेवर पेलणारा, दमदार "मी" होता. 

आरसा जसा आरसपानी तसाही "मी" असतोच की,
पावित्र्याच्या पार्श्वभूमीवर समाधानानं जगतोच की. 
निःस्वार्थी आत्मे पुण्यात्मे म्हणून पृथ्वीवर जन्म घेतात,
दोन्ही हातांनी दान करून रिकामी ओंजळ घेत राहतात,
मोहाचं दान त्यांचा "मी" त्यांना कधीच देत नसतो. 

नवा जन्म घेताना कधी चुकीचा आत्मा मिळून जातो,
कायाप्रवेश करतानाच तो देहाची भाषा बदलून जातो, 
कसा होईल हा स्वभाव, हे निश्चित करूनच श्वास घेतो 
म्हणून तर आत्म्याचा "मी", हातावरच्या रेषा रेखाटतो. 

नशिबंच्या नशिबं बदलून जातात अजाणतेपणाने,
नुकसान करुन घेतात स्वतःचं "मी" च्या कौतुकाने  
त्या "मी" चे हट्ट पुरवताना चुकीचं काही वाटतच नाही,
किंबहुना त्या "मी" चा नकळत दर्प चढत राही,
अशा वेळी कसं सावरायचं न कळलेला प्रश्न असतो. 

"इगो" नावाचा "सुंदर" प्रकार इंग्रजीतला मी असतो,
त्याचं काहीतरी वेगळंच, तो इतरांची मनं लेट गो करतो. 
त्यांच्याही मनातले विचार ऐकले पाहिजेत शांतपणे,
असा विचार त्या इगोच्या खिजगणतीत सुद्धा नसतो,
असा "मी" जेव्हा संतप्त होतो, तेव्हा प्रकांडप्रकोप होतो. 

"मी", आत्म्याभोवतीचं एक मलमलीत आवरण,
स्वभावाच्या विणण्यासाठीची मखमली पैरण,
धागा जर रेशमी मुलायम मिळाला, तर उपरणं, 
पण जर तोच धागा तरटाचा निघाला, तर मात्र 
पहिल्या श्वासापासून शेवटच्या पर्यंत फक्त साकळणं. 

खूप नशीबवान असतात ती शरीरं, 
ज्यांना "मी" विरहित आत्मा सांभाळतो,
एकवेळ सृजन "मी" नसला तरी चालेल,
पण वाममार्गी "मी" चा त्रास खूप नडतो,
म्हणूनच माणसाला "गती" मिळाली की मोक्ष अपेक्षित असतो. 

या गतीचा प्रवास कधी अर्ध्यावरच थांबतो, 
पूर्ण जन्माच्या चक्रात जाऊन अडकून राहतो,
मग पुन्हा त्या "मी" चं रोपण अवधानानं होतं,
नियतीच्या मनात जे असतं, ते स्वीकारलं जातं,
आणि मग माणूस "मी" पणानं जगायला लागतो. 

का? का बरं सगळ्याच प्रवृत्ती "मी" विरहीत नसाव्यात?
का, या दुष्ट चक्राला श्रापांच्या सख्याच आवडाव्यात?
डोळ्यांमध्ये जर शांत, आप्त भाव जागला असता,
तर कदाचित या "मी" साठीचा दरवाजा उघडलाच नसता,
पण जे घडायचं ते ग्रह-नक्षत्रांच्या मर्जीचंच देणं असतं. 

म्हणून तर माणसाला जन्म-मृत्युच्या अधिकारापासून 
वंचित ठेवलंय त्या ईश्वरानं अगदी जाणून बुजून,
शाप-अभिशाप, वरदान कि दुःखालाप, 
हे माणसाला त्यानं कधी कळूच दिलेलं नाही,
तो बिचारा स्वतःचा "मी", स्वतःचा म्हणूनच पाही. 

आपल्यातला हा "मी" दुसऱ्याला डागण्या देतो,
मनाच्या नाजूक तलम वस्त्राच्या चिंधड्या चिंधड्या करतो,
हे त्याला कधीच कळू नये असा डाव या जीवनाचा. 
खरं रूप दाखवणारा एखादा आरसा तरी बनवायचा,
पण तेच तर मंजूर नाहीये या विधात्याला,
"मी" नावाची दोरी घेऊन खेळवतोय तो,
या तमाम विश्वाला, माणसाच्या आतल्या त्या "मी" ला,
 माणसाच्या आतल्या त्या "मी" ला!

-सौ. चेतना वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा