- कविता म्हणजे काय? -

वाटलं होतं, कविता हा शब्दांचा खेळ आहे,
थोड्याश्या उपमा, थोडेसे विचार ह्यांचा मेळ आहे.
शब्द असतात हसरे नाचरे, तेव्हा कविता होते गोजिरवाणी,
शब्द असतात उदासभरे, तेव्हा कविता होते बापुडवाणी.
पण एक वेळ अशी येते, की भावनांच्या महासागरात शब्दच वाहून जातात,
तेव्हा कविताच होते सर्वांग सुन्दर गाणी,
आणि शब्द बनून येतात, डोळ्यातील पाणी,
शब्द बनून येतात, डोळ्यातील पाणी.

ऋतुगंध शरद साहित्य आवाहन वाचल्यापासून “कविता म्हणजे काय?” हा प्रश्न सारखा सतावत होता. अनेक थोरांच्या व्याख्या वाचल्या. 'निःशब्दाला शब्दरूप करणारे साधन,' ' भावनांचा उस्फूर्त आणि उत्कट आविष्कार,' 'सृजनशील आत्म्याचा उच्चार' आणि अशा अनेक व्याख्या! प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला. वर उदधृत केलेल्या गोष्टी कवितेत असतील कदाचित! पण कवितेची हीच ओळख आहे का? आणि लक्षात आले, जी कविता ओळखण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, ती कविता आपल्याला फार पूर्वीपासून ओळखीची आहे, अगदी कळायला लागण्या आधीपासून ! 'काऊ ये, चिऊ ये ' म्हणत कवितेनेच पहिला घास भरवला. अंगाई गीत गाऊन निजवले. 'अटक मटक' करत खेळात रंगवले आणि चंद्र, चांदण्या, तारे, फुले ह्यांनी आपले चिमुकले जग मोठे केले.

शाळेत कविता भेटली ते कुंभाराचे हात घेऊनच. जीवनाच्या जाणिवांचे आणि नेणिवांचे पदर उलगडत कळीचे फूल केले. कवितेने शिकवण्यापेक्षाही शहाणे आणि सुजाण केले. कवितेने भारावून जाऊन आम्ही मैत्रिणींनी किती मनोरथे रचली. कधी वाटे 'घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात व्हावे' मधले हात व्हावे. कधी “तुतारी” वाजवून नव्या युगाचे रणभेदी व्हावे. कधी वाटे क्रान्तिवीराचे वारस व्हावे, तर कधी नियमासाठी राजांनाही “खबरदार” म्हणणारा इमानी सावळा व्हावे. किती वचने टिकली माहित नाही पण कवितेने स्वप्न बघायला शिकवले. कवितेने आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेत साथ दिली. उमेदीच्या काळात 

तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ,
तुला देवाने दिले रे, दोन हात, दहा बोटं 

ही बहिणाबाईंची कानउघाडणी आत्मविश्वास देऊन गेली. आयुष्याच्या संध्याकाळी “आयुष्य कसे जगायचे, कण्हत कण्हत की गाणे म्हणत?” ह्या आशादायी दृष्टीकोनाने उभारी दिली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती दीपस्तंभासारखी उभी होती. कधी सखी म्हणून, कधी गुरु म्हणून, कधी पालक म्हणून, कधी मार्गदर्शक म्हणून! कवितेशी एक नाते तयार झाले आहे. म्हणूनच कदाचित कविता म्हणजे काय हे सांगता येणे कठीण आहे कारण नात्याची फक्त अनुभूती घेता येते, शब्दात मांडता येत नाही. 'चार भिंती, एक छप्पर, दरवाजा, खिडकी असते ते घर' ह्या व्याख्येत मनातले घर बसत नाही. तसंच कविता कुठल्याही व्याख्येत बसवता येत नाही.

कवितेच्या अनेक नात्यांप्रमाणे तिची रुपेही बहुविध आहेत. कविता हा केवळ सृजनशील आत्म्याचा उच्चार नाही तर मूर्तरूप अविष्कार आहे. एखादा अवलिया स्वप्नाचे बीज रुजवतो, भावनेच्या ऊबेत जोपासतो, विचारांच्या कोषाचे आवरण घालतो, त्यातून जे सुन्दर फुलपाखरु बाहेर येते त्याला कविता असे म्हणतात. कोणत्याही सृजनात्मक कलाकृतीसाठी हे खरे आहे. म्हणून प्रत्येक कलाकृती ही कविता असते. कोणी कविता शब्दात मांडतो, कोणी सुरात बांधतो, कोणी कुंचल्यात रंगवतो, तर कोणी पाषाणात कोरतो. म्हणूनच एखाद्या दर्दभरी तानेतून कवितेचे आर्त शब्द ऐकू येतात.

एखादे चित्र ही मूक कविता वाटते तर एखादी कविता बोलके चित्र वाटते. काही कविता मन घडवतात तर काही कविता आयुष्य घडवतात. पण एखाद्या महान आत्म्याचे भव्य दिव्य स्वप्न जग घडवते. अनेक युगांमधून एखादा महान योगी आपले भव्य स्वप्न 'हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे' म्हणून साकारतो. तर एखादा द्रष्टा इतिहासाने दखलही न घेतलेल्या जमिनीच्या तुकड्याला जगाच्या भूगोलात मानाचे स्थान देऊन सिंगापूर 'राष्ट्र' म्हणून आकारतो. ह्या आणि ह्यासारख्या महान कवींना आणि त्यांच्या महान कवितांना मानाचा दंडवत !!!
- प्रमोदिनी देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा