आत्मविश्वासाचा मार्ग

खो न जाये ये तारें जमीं पर ... ह्या गाण्याच्या धुंदीत रात्रीचा शेवटचा शो पाहून मी घरी आलो.

धांदरटपणाची लक्षणं माझ्यात दिसली ती थेट पहिलीत असल्यापासून. मला सो आणि सौ मधला फरक पटकन कळायचा नाही. लिहिताना मी छपन्न लिहितोय की पासष्ठ हे पटकन सांगता यायचं नाही. पहिली ते चौथी गणिताच्या परीक्षेत आम्हाला तोंडी हिशोब असायचे. गणित तोंडी घातल जायचं आणि त्याचं फक्त उत्तर अंकात लिहायचं असायचं. कुठेही आकडेमोड न करता, मनातल्या मनात हिशोब करणं अपेक्षित असायचं. मला ते कधीच जमायचं नाही कारण उत्तर लिहायच्या वेळेपर्यंत गणित विसरलेल असायचं. खूप सूचना एका वेळेस माझा मेंदू लक्षात ठेवू शकायचा नाही. माझ्या ह्या धांदरटपणामुळे मी स्वाभिमान आणि आत्मविश्वासाची विल्हेवाट लागणारे अनुभव पुरेपूर घेतले आहेत. पूर्ण वर्गासमोर सोप्पी उत्तरे न देता येणे, चुकीचे शब्द लिहिल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांनी टिंगल करणे! पण पायाखालची जमीन सरकेल असा अनुभव म्हणजे आई-बाबांचा विश्वास उडणे! माझ्या ह्या धांदरटपणाला आज मला नाव कळलं होतं - डिसलेक्सिया!!! ईशानमध्ये मी स्वत:चं बालपण बघितलं होतं.

दरम्यान मी स्वत:वर अनेक मर्यादा घालून घेतल्या होत्या. मला हे येत नाही, ते तर नक्कीच जमणार नाही, असे पक्के समज करून घेतले होते. परिणामी जे जमत नाही ते जमावे असे प्रयत्न करणंच सोडून दिलं होतं. उदाहरणार्थ, तोंडी हिशोब! तोंडी हिशोब ह्या नावाचा एक न्यूनगंड माझ्यात तयार झाला होता. हिशोब हे मला तोंडी करताच येत नाहीत, असा मी माझ्या मनाचा पक्का ग्रह करून घेतला होता. अगदी सोप्पा हिशोबसुद्धा मी कागद-पेना शिवाय केल्याचं मला आठवत नाही. हिशोब तोंडी करता येत नाहीत असं मानून प्रयत्न सोडून दिला आणि प्रयत्न सोडून दिला म्हणून ते येईनासे झाले. हे चक्र सुमारे वीस वर्षं असंच चालू राहिलं होतं आणि विश्वास दृढ होत गेला. दरम्यान दुसऱ्या कोणालाही पटापट तोंडी हिशोब करताना बघितलं की आपल्यात काहीतरी कमी आहे असं वाटायचं. अगदी सोप्या हिशोबासाठी कागद-पेन घेताना बघून लोक मला हसत आहेत असं वाटायचं. कमीपणाच्या भावनेनं एकंदरीतच आत्मविश्वास कमी होता. ह्या अडकलेल्या मन:स्थितीचा खूपदा कंटाळा यायचा. काहीतरी करून ही परिस्थिती बदलावी वाटायची पण कशी ते कळायचं नाही.

मी माझ्या न्यूनगंडाला सरळसोट धडक देऊन त्याच्यावर मात करायचं ठरवलं. परत पहिल्यापासून सुरवात करायची! पाढे, वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ, पावकी, निमकी, औटकी, सवायकी पाठांतराचा धडाका सुरु केला. फावला वेळ मिळेल तेंव्हा उजळणी करायला लागलो. दिवसातून कमीत कमी ३ वेळा सगळी उजळणी केली जाईल अशी स्वत:वर सक्ती केली. हिशोब करताना कॅल्क्यूलेटर घेण्याचा मोह टाळून तोंडी करायचा प्रयत्न करायला लागलो. खूप अवघड वाटायचं, उत्तर नक्की चुकणार आहे असं वाटायचं. पण चिकाटी सोडली नाही. उजळणी करताना कधी कधी बाजूच्याला ऐकू जायचं आणि तो “बरा आहेस ना” अश्या चेहेऱ्यानी बघायचा. पण मला त्याची पर्वा नव्हती. मी हे का करतो आहे, ते मला कुठे घेऊन जाणार आहे, हे मला पक्क माहीत होतं.

हळूहळू फरक वाटायला लागला. सोपी उत्तर बरोबर आली तरी खूप आनंद होऊ लागला. सुमारे तीन महिन्याच्या परिश्रमानंतर भीती वाटणारे अंक, आकडे मित्र वाटायला लागले. हिशोब करायला लागणारा वेळ कमी व्हायला लागला. उत्तरांचे आकडे आपोआप डोळ्यासमोर यायला लागले. पण खात्री वाटायची नाही. कॅल्क्यूलेटर वर पडताळून बघितलं तर स्वत:वर विश्वास बसायचा नाही, उत्तरं बरोबर आलेली असायची. इतकी वर्षं जमणार नाही असं म्हणून जे मान्य करून बसलो होतो, ते आपण करू शकतोय, ह्या विचारांनी अत्यानंद होऊ लागला. असेच अजून ३ महिने प्रयत्न केल्यावर मी तोंडी हिशोबात पारंगत झालो. आता मी हिशोब तोंडी चटाचट करू शकतो.

मला यशाची गुरुकिल्ली सापडली होती. मी स्वत:साठी एक कार्यक्रम तयार केला. ज्या गोष्टींमुळे मला कमीपणाची भावना वाटत होती त्या गोष्टींना मी सरळ धडक देऊ लागलो. कुठल्याही प्रकारचा सोपा मार्ग न शोधता मुळात जाऊन तयारी सुरु केली. वाचन, आकलन, सराव परीक्षा, अपेक्षित परिणाम दिसेपर्यंत हे चक्र सोडलं नाही. हळूहळू माझ्या अनेक कमीपणाच्या भावना मी मारून टाकल्या. आता मी आत्मविश्वासानी वावरतो - बोलतो, ते माझ्यात त्रुटी नाहीत म्हणून नाही तर त्यांच्यावर माझ्याकडे उत्तर आहे म्हणून! मी निवडलेला मार्ग मला यशाच्या शिखराकडे घेऊन जाणार आहे हा माझा विश्वास आहे म्हणून.

पूर्वी घडलेल्या घटनांमुळे आपण स्वत:वर मर्यादा घालतो. कालांतरानी त्या मर्यादांवर आपण पक्के ग्रह करून घेतो आणि तेच संकुचित आयुष्य जगायला लागतो. मर्यादित, संकुचित आयुष्य जगणे हे अंधारात जगण्यासारखे आहे. स्वत:वरच्या मर्यादांना आव्हान देऊन त्या झुगारून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे हा एकमेव मार्ग अंधारातून बाहेर काढेल असा माझा ठाम विश्वास आहे. हे दुसरं कोणीही स्वत:साठी करू शकणार नाही, ते स्वत:चं स्वत:लाच करावं लागतं कारण अंधारही आपणच स्वत:वर लादलेला असतो.













विश्वास वैद्य

1 टिप्पणी:

  1. फार छान ! अंधार आपण आपल्यावर लादलेला असतो त्यामुळे अंधारातून बाहेर पडणे पण स्वत:चे स्वत:लाच करावे लागेल हे तर फारच पटले.

    उत्तर द्याहटवा