मंत्र : भाग २

(कथेच्या पहिल्या भागात - 'राशी आणि त्यांचे स्वभाव' या पुस्तकाच्या लेखनात व्यस्त असताना लेखक महाशयांना त्यांच्या मुलीनं, म्हणजे मुक्तानं मध्येच उठवलं कारण खूप वय झालेल्या माई त्यांना बाहेर भेटायला आल्या होत्या. चाळीस वर्षांपूर्वी सोडून गेलेल्या मुलाच्या ओढीने आलेल्या माईंना काही तरी उपाय हवा होता ज्यायोगे त्यांचे डोळे मिटायच्या आधी एकदा त्यांची मुलाशी भेट होईल.)

ज्योतिषविद्येचा अभ्यास असल्याने पत्रिका बनवणे, जुळवणे आणि काही दोष असल्यास शांतीहोमादि उपाय सुचवणे व ते व्यवस्थितरित्या पार पाडून देणे वगैरे वगैरे मी करत असतो. त्यामुळे मला लोक मानतात आणि अगदी दूर-दूरहून माझा सल्ला घ्यायला येतात. आता या माईसाठीही धर्मशास्त्रात सांगितलेला एखादा उपाय मी शोधून देऊ शकलो असतो. पण मला त्यात काही राम दिसेना. आधीच म्हातारीच्या सगळ्या गोवर्‍या स्मशानात गेलेल्या. असा एखादा उपाय शोधायचे कष्ट घ्या, तिला तो समजावून सांगा आणि एवढं करून तो उपाय करणे तिला परवडणार नसेल तर? शिवाय दक्षिणा देण्याइतके द्रव्य तिच्याकडे असणे दुरापास्तच असणार असा मी अंदाज केला. आमचे पिताश्री म्हणायचे की कोणासाठीही काहीही फुकटात करु नये, माणसाला किंमत राहात नाही. म्हणून मी तिला झटकून टाकायला हवं होतं पण सरळ - सरळ नाही म्हटलं तर म्हातारी उगाच चिवटपणा करेल, रडारड करेल आणि आणखी वेळ खाईल म्हणून मी तिला काहीतरी थातूर-मातूर उपाय सांगायचं ठरवलं.

"माई तुम्हाला वाचता येतं का?", मी तिला विचारलं.
"हो; येतं की. चवथीपर्यंत शिकलेली आहे मी आणि उजव्या डोळ्याने दिसतं मला अजून!", माई उत्साहाने म्हणाली.
मुक्ताला मी कागद-पेन आणायला पाठवलं आणि माईला म्हणालो, "एक उपाय सांगतो तो लक्षपूर्वक ऐका. दिवेलागणीला एक चमचा घ्यायचा आणि मी देईन तो मंत्रअकरावेळा म्हणून तो अभिमंत्रित करायचा. मग तो चमचा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कोयंड्यात अडकवून द्यायचा. कितीही वर्षे दूर गेलेला माणूस हमखास घरी येतो; काय समजलं?"
"दिवेलागणीला एक चमचा घ्यायचा; अकरावेळा मंत्र म्हणून दाराच्या बाहेरच्या कोयंड्याला अडकवून द्यायचा.", माई थोडक्यात म्हणाली.
"बरोबर", मी म्हणालो. तितक्यात मुक्ता कागद-पेन घेऊन आली. मी कागदावर मनानेच रचून एक मंत्र लिहीला.
यथा उत्क्षिप्तो पाषाणः पुनरायाति पृथिवीम् |
बाष्परुपभूतं तोयं पुनरायाति सागरम् |
यथा भास्वतो भास्करः पुनरायाति उदयाचलम् |
तथा सुदूरं गतो जीवः पुनरायाहि स्वगृहम् ||
|| ॐ शुभं भवतु ||

लिहून झाल्यावर कागद मी माईकडे दिला आणि तिला वाचायला सांगितलं. तिने मंत्र अडखळत-अडखळत वाचला.मी अर्थ सांगितला, "ज्याप्रमाणे वर फेकलेला दगड पुन्हा पृथ्वीकडे येतो; ज्याप्रमाणे वाफ झालेले पाणी शेवटी पुन्हा सागराला येऊन मिळते; ज्याप्रमाणे तेजस्वी असा सूर्य पश्चिमेकडे जाऊन पुन्हा पूर्वेकडे येतो; त्याचप्रमाणे घरापासून खूप दूर गेलेल्या हे जीवा तू स्वगृही परत ये असा त्याचा अर्थ आहे."माईने आनंदाने डोलत मान हलवली व कागदाची घडी दोन्ही हातांच्यामध्ये धरून हात जोडून कपाळाला लावत भक्तिभावाने नमस्कार केला.
"फार उपकार झाले रे बाळा", माई पुन्हा भावनावश होत म्हणाली, "तुझे उपकार तर मी फेडू शकणार नाही; पण दक्षिणा किती द्यायची तेवढं तरी सांग."
"आता तुमच्याकडून काय घ्यायचं माई?", मी हसत म्हणालो, "स्वखुशीने जे द्यायचं ते द्या."
माईने कमरेची चंची काढली आणि त्यातून अकरा रुपये काढून मला दिले. एक खडीसाखरेचा खडा काढून मुक्ताच्या हातावर ठेवला. मुक्ताला काय वाटलं कोण जाणे? तिने वाकून माईला नमस्कार केला.
"चिरंजीव हो.", माई भरल्या गळ्याने म्हणाली आणि मुक्ताच्या दोन्ही गालांवरून हात फिरवून तिने स्वतःच्या कानशीलावर कडाकडा बोटे मोडली.
"मोठी गोड आहे पोरगी!", बोळ्क्याने हसत मान डोलावत ती म्हणाली आणि मग पदराने डोळे पुसत पुसत निघून गेली.
मी पुन्हा अभ्यासिकेकडे वळलो तर मुक्ता म्हणाली, "बाबा तुमचा मंत्र काम करेल ना हो?"
"म्हणजे काय?", मी हसत म्हणालो, "अगदी शंभर टक्के. इथून पुढे मी लिहीत असताना तू कोणाला घरात घेतलं नाहीस तर नक्कीच माझा मंत्र फळेल."
"बाबा! चेष्टा नका ना करू! खरं खरं सांगा तुमचा मंत्र काम करेल ना?", मुक्ता परत रडवेली झाली होती आणि आता कोणत्याही क्षणी गंगा-यमुना वाहायला लागतील असं वाटलं म्हणून मी म्हणालो, "हो गं. नक्की काम करेल. अगं उपनिषदातला मंत्र आहे तो!". मी ठोकून दिलं असलं तरी तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं. ती तरीही विचारात पडलेली दिसत होती पण किमान रडली तरी नाही.उरलेला रविवार विशेष काही न होता गेला. सोमवारही आला आणि गेला. मंगळवारी सकाळी मात्र तो सगळा गोंधळ झाला. नेहमीप्रमाणे बँकेत जायच्या आधी मुक्ताला शाळेत सोडवायला मी निघालो होतो. वळणावर गाडी वळवली तर माईच्या घरासमोर ही गर्दी. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, "माईच्या घरासमोर गर्दी कसली?", असं म्हणत गाडी बाजूला थांबवली आणि मुक्ताला गाडीतच बसून राहायला सांगून गर्दीत घुसलो. गर्दीतून रस्ता काढत पुढे आलो आणि पाहिले तर एक पोलिस इन्स्पेक्टर, दोन हवालदार आणि दोन पहारी घेतलेले मजूर उभे.
"काय झालं?", मी शेजारी उभ्या असलेल्या माणसाला विचारलं.
"दरवाजा तोडताहेत", तो म्हणाला, "काल दरवाजा उघडला नाही म्हणून दूधवाला दूधपिशव्या दारात ठेऊन गेला. आज येऊन पाहतो तर मांजराने पिशवी फोडून सगळीकडे दूध सांडलेलं. आजही दार उघडेना म्हटल्यावर सगळ्यांनाच संशय आला म्हणून बोलावलंय पोलिसांना. बहुतेक रविवारी रात्रीच गेली वाटतं म्हातारी."
पहारी घेतलेली माणसं दरवाजाकडे निघाली. तेवढ्यात पोलिस इन्स्पेक्टर पुढे झाला आणि दाराच्या कोयंड्यात अडकवलेला चमचा त्याने काढला. मी परत फिरलो आणि गाडीत येऊन बसलो. गाडीत बसून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
"काय झालं बाबा?", मुक्ताने विचारलं.
"गेली बिचारी निजधामाला.", मी म्हणालो.
"निजधामाला?", मुक्ताने विचारलं.
"हो.", मी वरती बोट दाखवून म्हणालो, "देवाच्या घरी."
मुक्ता काचेतून गर्दीकडे आणि माईच्या घराकडे पाहात राहिली. मी चटकन गाडी काढली आणि निघालो. मुक्ता खिडकीच्या काचेतून वराचवेळ बाहेर बघत राहिली. काही वेळाने एकदम वळून तिने विचारलं, "बाबा, देवाच्या घराला निजधाम का म्हणतात?"
"निज म्हणजे कायमचं आणि धाम म्हणजे घर", मी तिला सांगू लागलो. इंग्रजी माध्यमात ती शिकत असल्याने मराठी व संस्कृत शब्दांचा अर्थ मीच तिला सांगत असतो, "अगं, देवाचं घर हेच आपलं कायमचं घर असतं. इथं पृथ्वीवर आपण सगळेच तात्पुरते घरापासून दूर आलेलो असतो. प्रत्येकाला कधी ना कधी आपल्या स्वतःच्या कायमच्या घरी जावंच लागतं".
"तुमच्या मंत्रात तेच म्हटलं होतं ना बाबा?", ती एकदम म्हणाली, "त्यामुळेच माईचा जीव....", आणि अचानक ती हमसून हमसून रडायलाच लागली. माझ्या डोक्यातच नव्हतं ते, यामुळे ती काय बोलतेय तेच मला कळेना. थोड्यावेळाने कळल्यावर मी डोक्यावर हात मारून घेतला. झाऽऽलं. तेव्हापासून ते आतापर्यंत सारखा तोच विचार ती करतीये. मधूनच रडते आणि "सांगा ना बाबा; सांगा ना बाबा"चा धोशा लावला आहे. तिला मी हजारवेळा सांगून झालंय की हे मंत्रा-बिंत्राने काहीही झालेलं नाहीय; ती माई म्हातारी झाली होती आणि कधी ना कधी मरणारच होती ते त्याच दिवशी मेली; तो निव्वळ योगायोग होता; आयुष्य म्हणजे नुसता योगायोग असतो; हे मंत्र-पूजा-पाठ केल्याने नियती बदलत नाही वगैरे परोपरीने सांगून पाहिलं पण ही हेकट पोरगी काही ऐकायलाच तयार नाही. वर "मंत्राचा परिणाम नाही तर तुम्ही लोकांना मंत्र का देता?", असं विचारतीये. आता या मूर्ख मुलीला कसं समजावून सांगू? तुम्हीच सांगून पाहा तिला. तुमचं कदाचित ऐकेल ती.

(समाप्त)













निरंजन नगरकर

२ टिप्पण्या: