गुलाब

गुलाब
विविधरंगी गुलाब होते
शेतामधुनी फुललेले
लाल, गुलाबी, केशरी, पिवळे
कोठे पांढरे, कोठे निळे
नाजूक रेशमी एकेक पाकळी
पराग मधुनी झगमगती
कौतुक नजरे पाहू जाता
हासून मजला खुणावती
गुलाब भावले, परी न गमले
काटे उभे असलेले
सौंदर्याचे रक्षक जरी ते
झाडानेच नेमलेले
काटे म्हणुनी कसे कळावे
गुलाबफूल ते अंधजना
कष्टी होती बाबा आमटे
जरी राहती आनंदवना
कनवाळू त्या सुनिताबाई
जाणून त्यांच्या दुःखाते
परिश्रमे रोप शोधून देती
काट्यावाचून गुलाबाचे
हर्षित बाबा जपणुक करिती
फुलवती या गुलाबाला
गुलाबही देती आनंदाने
मंद सुगंधी प्रतिसादाला
दिसत नसे पण जाणुनी दरवळ
स्पर्श करुनी गुलाबफुला
अंध जनांना ओळख पटली
काटा न रुतता हाताला

कल्याणी पाध्ये


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा