जो जे वांछील तो ते लाहो

‘हा आपला तर तो परका असा आप-पर दुजाभाव मनात न बाळगता सर्व विश्व हे माझे कुटुंब आहे असे जो मानतो तो श्रेष्ट’ असा विचार ह्या आपल्या उपनिषदांमध्ये उत्तम पुरुषाच्या लक्षणात सांगितलेला आढळतो. 

आज सुद्धा ज्या विचाराची अत्यंत गरज आहे आणि अभाव आहे तो हा विचार आपल्या उपनिषदात हजारो वर्षांपूर्वी सांगून ठेवला आहे. हेच चिरंतन साहित्याचे लक्षण आहे. आपल्या ह्या साहित्यिक ठेव्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटावा असे हे वैचारिक धन आहे.

वैश्विक बंधुत्व ही आज काळाची गरज आहे. आज सर्वत्र क्रोध, मत्सर, द्वेष ह्या मानवजातीच्या शत्रूंनी आपल्याला ग्रासलेले दिसते. त्यावर ह्या विचाराच्या अंमलबजावणीची नितांत आवश्यकता आहे. माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. जात, धर्म, पंथ, वर्ण ह्यावर आधारित भिंती माणसाला माणसापासून विभागत असताना विश्व हेच कुटुंब ह्यासारखा सुंदर विचार माणसाला एका रेशमबंधाने बांधू शकतो.

“वसुधैव कुटुम्बकम्” अर्थातच “हे विश्वचि माझे घर…” सर्व वसुधेला आपले मानण्याची उदात्त संकल्पना. एक भूगोलाची शिक्षिका ह्या नात्याने मला तर ही अगदी मनापासून पटलेली आणि आवडलेली अशी समजूत आहे. आपण जर आल्फ्रेड वेग्नेर च्या 'Continental Drift Theory' कडे जरा ह्या दृष्टीकोनातून पाहिले तर कळेल की मुळात हे जग एकाच अखंड भूखंडाने व्यापले होते. 'Pangea' नामक एक विशाल भूखंड कालांतराने प्रथम दोन व नंतर अनेक सद्य विस्थापित ७ खंडांमध्ये विभागला गेला. कल्पना करून बघा जर हा 'Pangea' विभागलाच गेला नसता तर? ह्या पृथ्वीतलावर एकाच खंडावर ही मानवजाती एकत्र नांदली असती. मग हा आशियाई, तो युरोपिअन, ती आफ्रिकन अन हा अमेरिकन हा भेदभावच उरला नसता, नाही का? ह्या 'Pangean' संस्कृतीच्या 'अवघ्या एक रंगात' हे विश्व रंगले असते. 

भौगोलिकदृष्ट्या आपण जरी विभिन्न नैसर्गिक परिस्थितीत राहत असलो तरी ज्याप्रमाणे सर्व जीवनाचा अन् उर्जेचा स्रोत सूर्य आपली किरणे कोणाचा कोणता वर्ण आहे हे न पाहता सर्वत्र पोचवत असतो, वारा कोणत्याही भेदभावाला न जुमानता वाहत असतो, पाऊस उच्च-नीच न पाहता पडत असतो, एखाद्या वृक्षाची सावली त्याखाली बसलेल्या प्रत्येक वाटसरूला समान वागणूक देत असते, त्याप्रमाणे आपणही प्रत्येक व्यक्तीशी आपला व्यवहार ह्या मानवनिर्मित फरकांना न मानून करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने विश्वबंधुत्व अंगिकारले असे म्हणता येईल. 

मुळात सर्व मानवजात ही एक आहे हा विचार ज्ञानेश्वरांनी ७५० वर्षांपूर्वी आपल्या पसायदानातून 'आता विश्वात्मके देवे' असा उच्चार करून परत मांडलेला दिसतो. माझ्या जातीपुरता, समाजापुरता, राज्यापुरता किंबहुना देश अथवा खंडापुरता त्यांचा विचार मर्यादित न राहता संपूर्ण विश्वातील अखिल मानवजातीचे कल्याण व्हावे हा केवढा उदात्त विचार आपल्या पसायदानातून ज्ञानेश्वरांनी प्रकट केला आहे. अन् 'जो जे वांछील तो ते लाहो' अशी अतिसुंदर भावना व्यक्त करून आपल्या मायबोलीला “अमृताशी पण पैजा जिंकवून” देण्याइतकी ताकदवान बनवली आहे. अगदी अलीकडच्या काळात स्वामी विवेकानंदांनी ह्याचाच उच्चार करून सर्व जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश दिलेला आपण जाणतोच.

ज्याप्रमाणे एका कुटुंबात एकत्र नांदणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते, आवड-निवड असते आणि आपण त्याचा आदर राखतो, त्याप्रमाणेच ह्या वैश्विक कुटुंबात नांदणाऱ्या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा, राहण्याच्या पद्धतीचा, खाण्यापिण्याच्या पद्धतीचा, वेशभूषेचा आदर राखणे आपले कर्तव्य नाही का? असे झाले तरच आपण खऱ्या अर्थाने 'हे विश्वचि माझे घर' हे विधान सार्थ करू असे वाटते.

- रमा कुलकर्णी

1 टिप्पणी: