मुमुक्षु

निओकॉर्टेक्सच्या सीमावर्ती भागात
सगळ्यात सामसूम न्यूरल पथावरच्या
सगळ्यात शेवटच्या न्यूरल नोडच्या
सगळ्यात शेवटच्या मजल्यावर
मुमुक्षु राहतो.

रेप्टिलियन पाताळ अन् लीम्बिक धरतीवर
अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि
निओकॉर्टेक्समध्ये ज्याचे फिरतात दूत
न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत
तो त्रैलोक्याधीश डीएनेश्वर.

ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन
हल्ला करतात अचानक दिसेल तिथे
अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

डमरू डीएनेश्वर वाजवतो कधी गगनभेदी
दैवी प्रयोजनाची रासायनिक कारंजी उसळतात
डोपॅमाईनचे चषकच्या चषक फेसाळतात
नव्या त्रैलोक्याची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा
रडतो मुमुक्षु पोटात गुडघे घेऊन

बलवान नव्या मुमुक्षुच्या जन्माची प्रार्थना करतो.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.













निरंजन नगरकर

३ टिप्पण्या:

  1. मुमुक्षुही आहे डीएनएश्वराचाच अंश
    अमर्त्य आणि संसर्गजन्य
    ईश्वरपुत्र सैतान
    पण मुमुक्षु झोपलेलाच असतो बहुधा
    त्याचे झोपले असणेच परवडते डीएनएश्वराला
    म्हणून त्याच्यावर मारा एन्डोकॅनाबीनाॅइड्सचा
    एन्डाॅर्फिन आणि डोपामाईन्सचा
    हॅप्पीनेस न्युरोकेमिकल्सचा
    कारण मुमुक्षु जागा झाला तर
    अडवतो प्रवाही न्युराॅन्सना
    त्यांना विचारतो अवघड प्रश्न
    त्यांच्या प्रवासाच्या आणि दिशेच्या प्रयोजनाबद्दल
    मग गोंधळलेल्या न्युराॅन्सचा प्रवाह अस्ताव्यस्त

    उत्तर द्याहटवा
  2. खळबळ माजवणारी कविता, निरंजन! फारच छान!!

    उत्तर द्याहटवा