चाहूल

सरता सरता दिवस जाणे
नेहमीच ती मनाला हूल,
येणार तू लवकर आता
हिच होती सगळ्यांना चाहूल...

स्वप्न पूर्ण झाले बघता बघता,
तुझे आगमन झाले हसता हसता,
जीवन आमुचे संगीत झाले,
शब्द तुझ्यासाठीचे गीत झाले...

तूच आमुचे जीवन आता,
तूच भविष्य, तूच वर्तमान,
तुला घडविण्याचा प्रयत्न,
हेच आता आम्हासमोरचे आव्हान...

तूच सावली, तूच दिशा,
तुझ्यात रमण्याचे स्वारस्य,
दु:ख सगळे विसरून जाऊ,
पाहू जेव्हा तुझे हास्य...

तूच सोनुल्या, तूच छकुल्या,
तुझ्यात पाहिला मी माझा अंश,
वंश आमुच्या परिवाराचा तू,
सर्वांचा लाडका तू सारांश...

प्रत्येक महिन्यात नवा बदल
हावभाव असतो तुझा नवा,
रोज तुला हसताना बघून
पळून जातो आमचा थकवा...

कधी रांगणार, कधी चालणार
खूप अपेक्षा भाबड्या मना,
तुझीच स्वप्ने येती आम्हाला
आनंदाश्रु आमुच्या लोचना...

झालास तू एक वर्षाचा
खूप बडबडावे हीच इच्छा,
भविष्याच्या वाटचालीसाठी
आई-बाबाकडून शुभेच्छा...

   --- प्रफुल्ल मुक्कावार




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा