उपोद्घात

सूर्यनारायण नुकताच अस्तास गेला होता. कुशपुरामध्ये दरवर्षीप्रमाणे कृष्णजन्माच्या सोहळ्याची तयारी चालु होती. “बोबड्या कृष्णाच्या” मंदिरातील तयारीवर स्वतः सुशर्मा प्रधान देखरेख करत होता. त्याच्याबरोबर राजवैद्य देखील होते. ते त्याला जुन्या काळातील सोहळ्यांच्या आठवणी सांगत होते. पण सुशर्मा मात्र वैतागला होता. राणीसरकार येण्याआधी सर्व तयारी संपवणे भाग होते आणि राजवैद्यांच्या अखंड बडबडीमुळे त्याला काही सुचत नव्हते. आता ह्यांना काय उपायाने चुकवावे असा विचार तो करत असताना, एका नोकराने येऊन राजवैद्यांच्या हातात एक चिठ्ठी दिली. ती बघताच ते लगबगीने उठले आणि म्हणाले “चला प्रधानजी, मी येतो. राजेसाहेबांसाठी तयार करायच्या औषधाचे काही घटक निलगिरीमधून मागवावे लागतात हे तुम्हाला माहितीच आहे. तिकडच्या कामगिरीवर गेलेल्या एका सरदारांना मी ते येताना आणायला सांगितलं होतं. ते सरदार परत आले आहेत. आता मी जाऊन त्यांनी योग्य ती वनस्पती आणली आहे का ते बघतो.” इतके बोलून ते निघून गेले. ‘बरं झालं, ब्याद टळली’ असं म्हणून सुशर्मा पुढील तयारीला लागला.

राजवैद्य लगबगीने आपल्या कार्यशाळेत आले. तिथे येऊन त्यांनी त्यांच्या विश्वासू सेवकाला बोलावून घेतले. त्याला एका विवक्षित स्थळी जाऊन एका माणसाला भेटण्याची सूचना देऊन बाहेर पाठवले. सुमारे एक प्रहराने तो परत आला. अंगरख्यात दडवलेला एक लखोटा बाहेर काढून त्याने राजवैद्यांच्या हातात दिला आणि दरवाजा बंद करून तो बाहेर पहाऱ्यावर उभा राहिला. तो गेल्यावर त्यांनी तो लखोटा उघडला. त्यात एक मोहोरबंद पत्र होते. सूर्य, चंद्र, त्रिकोणी ध्वज आणि ढाल-तलवार, अशी ती मोहोर होती. ते पत्र उघडून त्यांनी मजकूर वाचला आणि समाधानाने मान डोलावली. अजून १३ चंद्रकलांनी अतिपूर्वेकडच्या वितीषा नगरीचे राजदूत येऊन राजेसाहेबांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर एक संपूर्ण दिवस गुप्त वाटाघाटी करणार असल्याचे वर्तमान त्यात होते. ‘आता घटीकापात्र बुडाले’ असा सूचक शेवट होता.

त्यांनी लगेचच ते पत्र तेवत्या दिव्याच्या ज्योतीवर धरून नष्ट केले. त्यांनी एका गुप्त फडताळातून काही काचेच्या कुपी बाहेर काढल्या. त्यातील विविध रसायने ठराविक प्रमाणात एकत्र करून ती काही काळ उकळली. तयार झालेले रसायन रंगहीन आणि रुचीहीन असे होते. त्यांनी अनेक वर्षांच्या संशोधनाने ते सिद्ध केले होते. ते अत्यंत सावकाश परिणाम करणारे, अत्यंत घातक, असे उच्च प्रतीचे विष होते. एकदा हे विष पोटात गेल्यावर मनुष्याचा मृत्यू अटळच होता. त्यावर कोणताच उतारा नव्हता. रंगहीन आणि रुचीहीन असल्याने ते कोणत्याही पदार्थातून देता येत असे. दिल्यापासून सुमारे पंधरवड्यामध्ये त्याचा परिणाम दिसून येत असे. विषप्रयोगाचे एकच लक्षण म्हणजे मृताच्या हातापायांच्या बोटांची टोके निळी पडत असत. तसेच लक्षण असणारे आणि एक-दोन दिवसात परिणाम करणारे एक विष अतिपूर्वेकडच्या राज्यांमध्ये सर्रास वापरतात हे त्यांना माहिती होते.

ते विष राजेसाहेबांच्या औषधात एकत्र करून, नवीन औषध एका कुपीत घेऊन ते राजवाड्याकडे निघाले. राजवैद्य असल्याने त्यांना राजवाड्यात कधीही कुठेही जाण्याची मोकळीक होती. राणीसरकार कृष्णजन्म सोहळ्यासाठी बोबड्या कृष्णाच्या मंदिरात गेल्या होत्या आणि राजेसाहेब जेवण करत असतील हे त्यांना माहिती होते. त्यांनी शय्यागृहात प्रवेश केला तेव्हा दोन सेवक बाहेर पहाऱ्यावर होते. रोजच्याप्रमाणे राजवैद्यांनी संपलेल्या औषधाची कुपी उचलून तेथे बरोबर आणलेली नवीन कुपी ठेवली. राजेसाहेबांचे जेवण संपतच आले होते. त्यांना नवीन कुपीतून थोडे औषध देऊन राजवैद्य कार्यशाळेत परत आले, तेव्हा मध्यरात्र होत आली होती. “वाकड्या तोंडाच्या राजा, आता तुझ्या पापांचा घडा भरला, घटीकापात्र बुडाले!” असे उद्गार त्यांच्या तोंडातून बाहेर पडले, त्याचवेळी कृष्णजन्माचा गजर बाहेर सुरु झाला आणि त्यांच्या कार्यशाळेतील घटीकापात्र बुडाले.

- शेरलॉक फेणे 

(विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रसिद्ध पावलेल्या गोविंद नारायण दातारशास्त्री ह्यांच्या कादंबऱ्यांच्या धर्तीवर लिहिलेल्या आमच्या ‘उलथापालथ’ ह्या आगामी कादंबरीतून..)




पुढील भाग:
उलथापालथ - प्रकरण १ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा