सिंगापूरशी माझं नातं

'जिंदगी मे एक बार जाना सिंगापूर' हे गाणं जेंव्हा ऐकलं तेंव्हा मी कधी सिंगापूरला जाईन, थोडं-थोडकं नव्हे, ९ वर्षे राहीन असं कधी वाटलं नव्हतं. माझं लग्न झाल्यावर नवऱ्याबरोबर दोहा, कतार इथे राहत असताना अचानक त्याने सांगितलं की आपण सिंगापूरला जात आहोत. दोह्याला खरं तर मी कंटाळले होते. विषम हवामानाचा कंटाळा आला होता.

सिंगापूरला आलो तेंव्हा माझी मुलगी १.५ वर्षांची होती. सकाळच्या फ्लाईटने सिंगापूरला आलो तेंव्हा विमान उतरत असताना एखाद्या जंगलात उतरतंय का काय असं वाटत होतं. आपण ज्या हाय टेक शहराविषयी ऐकलं ते हेच का? हा प्रश्न मनात आला.

असं काय आहे सिंगापूरमध्ये ज्यामुळे लोक इथलेच होऊन जातात … हे हळूहळू उलगडायला लागलं. मुलगी थोडी मोठी झाल्यावर महाराष्ट्र मंडळाच्या फेऱ्या वाढू लागल्या. ऋतुगंध मासिकासाठी सिंगापूरविषयी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अंक प्रकाशित झाले तेंव्हा विविध लेखातून सिंगापूरशी जास्त ओळख होत गेली. बरीच वर्षे स्थायिक असलेल्या लोकांकडून इथली खाद्य संस्कृती, वेगवेगळी अस्पर्शित ठिकाणं, कला, भाषा याविषयी माहिती मिळत गेली.

भारतासारखी शेती, पाणी, खनिज अशी संपदा सिंगापूरमध्ये नाही. सिंगापूरला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचा मात्र अतिशय कल्पकतेने वापर केला आहे त्यामुळे हे एक मोठे सागरी माल-वाहतूक केंद्र किंवा शिपिंग हब बनले आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची ऑफिसेस इथे आहेत. मानव निर्मित आकर्षणे बनवून सिंगापूर हे एक उत्तम पर्यटन स्थळही बनले आहे. त्यामुळे जोडीने हॉटेल उद्योग, मोठे मोठे मॉल, शॉपिंग सेंटर्स सुद्धा भरपूर आहेत.
हे सगळं झालं सिंगापूर विषयी, त्याच्या जडण-घडणी विषयी ….

सिंगापूरशी माझंही एक वेगळं नातं ९ वर्षात जुळलं. वेळी अवेळी येणारा पाऊस आमच्या घराच्या खिडकीतून बघणं हा माझा आवडता उद्योग होता. सिंगापूरमध्ये असताना वेगवेगळे हौसेने साजरे केलेले सण - उत्सव याच्या अविस्मरणीय आठवणीही आहेत. मुलीचं 'टीन-एज' च्या आधीचं सगळं बालपण सिंगापुरात फुललेलं चलचित्रासारखं नजरेसमोर येतं. वर्षं सरत गेली तसा लोक संग्रहही वाढत गेला. वेगवेगळे दर्जेदार गायक, नर्तक यांचे कार्यक्रम ऐकायला - बघायला मिळाले. भारताबाहेर राहून कधी भारताबाहेर असल्यासारखं वाटलं नाही इतकं हे सुद्धा घरच होऊन गेलं. भरपूर हिंदू मंदिरे आणि लिटल इंडिया मधली भारतीय दुकाने यांनी तर सतत भारताच्या जवळ ठेवलं.

सिंगापूरने भरपूर मैत्रिणी दिल्या. आज सिंगापुरात राहत नसूनही त्यांच्याशी असलेला संपर्क निखळ आनंद देतो. नवरा अजून सिंगापुरात असल्यामुळे पुन्हा पुन्हा इथे भेट द्यायचा योग येतो. दर वेळी सिंगापुरात आलं की खूप आनंद होतो. मैत्रिणींना भेटणं, ECP ला मनसोक्त सायकलिंग करणं आणि शहरात भटकणं ह्यात कधी दिवस संपतात हे कळत नाही.

सिंगापूरशी जुळलेलं नातं अतूट आहे. आठवणींच्या गाभाऱ्यात ते चिरंतन राहणार नक्की.

- हेमांगी वेलणकर


२ टिप्पण्या:

  1. हेमांगी ताई, अप्रतिम लिहिलय!
    ३ च वर्षे सिंगापुरला राहून एक अख्खे आयुष्य जगल्याचा भास् मलाही होतो कायम..!

    धन्यवाद,
    भगवंत कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा