जोडीदार - माझ्या नजरेतून

लहानपणी गोष्ट ऐकण्याच्या वयात आपल्याला सिंड्रेला, राजकुमारी-राजकुमार यांच्या गोष्टी सांगितल्या जातात. अगदी आपल्याकडच्या सिनेमांमध्ये नटीला स्वप्न पडतात ती सुद्धा घोड्यावर स्वार झालेल्या एखाद्या राजकुमाराचीच. त्यातला राजकुमार हा कायम हुशार, यशस्वी, देखणा, प्रामाणिक आणि प्रेमळ असतो,अगदी म्हणाल तो गुण त्याच्यात असतोच. त्यामुळेच तर आपल्याला "हिरो" हि कल्पना आवडायला लागते. या कल्पना विश्वातून बाहेर येऊन जेव्हा आपण खरं जग बघतो, त्यात खरीखुरी आपल्या आजूबाजूची माणसं असतात- भावंडं, मित्र आणि असे अनेक आपल्या संपर्कात येणारे पुरुष. या लोकांचं वागणं, बोलणं, जगणं हे गोष्टी पेक्षा खूप वेगळ असतं, खरं असतं. हळूहळू आपल्या मनात नकळत पणे तयार होणारी आपल्या जोडीदाराची कल्पना हि या खऱ्याखुऱ्या व्यक्तींपासून खूप प्रेरित होत असते. 

जरा मोठं व्हायला लागलो कि आपल्या जोडीदारात आपल्याला काय हवं, काय नको याचं अस्पष्ट चित्रं तयार व्हायला सुरुवात होते. मला धूसर दिसत असलेली प्रतिमा चिन्मयच्या रुपानेच स्पष्टं झाली. आमचं arranged marriage असल्यामुळे आम्ही एकमेकांना रोज नव्यानी ओळखायला लागलो. समोर येणारी प्रत्येक गोष्ट नवीन होती. सुरुवातीला एकमेकांना ओळखताना काही गोष्टी पटत नव्हत्या पण खूप गोष्टींचं अप्रूपही वाटत होतं. मुळात आपण त्याला आवडलो आहोत या कल्पनेनी छान वाटत होतं. लग्नाआधी रोज त्याच्याशी होणारे तासंतास फोन, पूर्ण वीकएंड एकत्र घालवणं, त्यात त्यानी प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक माझ्या आवडीची करणं, सगळं खूप नवीन होतं आणि खूप छान होतं. फिरायला जाणे, खरेदी करणे, अगदी घरात एकत्र स्वयंपाक करणे, नुसत्या तासंतास गप्पा मारणे, जुने नविन सिनेमे बघणे, खूप वेळ एकत्र घालवायला लागलो आणि एकमेकांमध्ये गुंतत गेलो. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटायला लागला. आमची दोघांची अशी आपापली काही ठाम मतं होती, विचार होते जे एकमेकांपेक्षा खूपच वेगळे होते, त्यामुळे अनेकदा खटके हि उडाले. काही गोष्टी आवडल्या नाहीत, पटल्या नाहीत, पण अनेक गोष्टी ज्या मनापासून आवडल्या त्या बद्दल एक अनामिक ओढ निर्माण झाली होती आणि मग या न पटणाऱ्या गोष्टी समजूतदारीनी स्विकारणं सोपं होत गेलं. 

खरंतर आम्ही दोघं दोन टोकं आहोत. तो introvert तर मी extrovert आहे. तो टापटिपिचा नीटनेटका आहे, मी थोडी अस्ताव्यस्त आहे, तो आखून रेखून कामं करणारा आहे, मी बेधडक आहे. तो जरा आळशी आहे, मी जरा जास्तच उत्साही आहे, तो खूप काळजी करणारा आहे, मी बिन्धास्त आहे. तो खूप जास्त हुशार आहे, मीही....तशी आहे म्हणा पण....असो. अशा अनेक गोष्टींमध्ये आम्ही वेगवेगळे आहोत. ह्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आम्ही एकमेकांना पूरक ठरतो. त्यामुळे स्वभावाची दोन टोकं असूनही कुठलही पारडं जड किंवा हलकं होत नाही, त्याचा बॅलन्स ठेवायचा आम्ही आपापल्या पद्धतीनी प्रयत्न करतो. एकमेकांच्या आवडींसाठी, थोडी आपापल्या स्वभावांना, सवयींना मुरड घालतो. मुळात हे करण्याआधी आम्ही एकमेकांना "जोडीदार" म्हणून जसे आहोत तसे सर्व गुणदोषांसकट पूर्ण मनापासून, प्रेमानी स्वीकारलं आहे, त्यामुळे हे करताना त्यात कोणताही कमीपणा वाटत नाही, वाईट वाटत नाही. आमच्या मुलाच्या जन्मानंतर तर आम्ही अजून जास्त जवळ आलो, एकमेकांना जास्त समजून घ्यायला लागलो, आणि खऱ्या अर्थानी त्याच्या जन्मानंतर आमचं असं एक विश्व तयार झालं. आता तर चेहऱ्यावरची हललेली एखादी रेष सुद्धा आम्हाला एकमेकांची पसंती/नापसंती सांगते.

जगातला कुठ्लाच माणूस सर्वगुणसंपन्न नसतो. आमचीही भांडणं होतात, वाद होतात, मतभेद होतात. जर दोन व्यक्ती ज्या भिन्न वातावरण आणि संस्कारांमध्ये वाढलेल्या आहेत, ज्यांचे वैयक्तिक अनुभव वेगळे आहेत तर त्यांची काही मतं, विचार, इच्छा वेगवेगळ्या असणं अपेक्षितच आहे. पण आपल्या जोडीदाराच्या मताला, ईच्छेला ,विचारांना योग्य तो आदर देणं तितकच गरजेचं आहे. आम्ही एकमेकांच्या विचारांचा आदर करताना त्याप्रमाणे वागायची मोकळीकही देतो. कुठल्याही छोट्या मोठ्या निर्णयाच्या वेळेस एकमेकांचं मत विचारात घेतो. अशा अनेक गोष्टी एकमेकांसाठी आम्ही आमच्याही नकळत करत असतो. जोडीदाराची व्याख्या काय आहे मला माहित नाही, पण चिन्मय कडे बघून मी हे नक्की सांगू शकते कि, प्रेमाचं नातं जोडून कुठल्याही चांगल्या वाईट परिस्थितीत तितक्याच प्रेमानी ते नातं टिकविणारा तो "जोडीदार" असतो. 


- अनुजा बोकील


२ टिप्पण्या: