गते शोको न कर्तव्यो, भविष्यं नैव चिन्तयेत

गते शोको न कर्तव्यो, भविष्यं नैव चिन्तयेत|
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः ||
गेले त्याचे दुखः नको, ना येईल त्याची चिंता|
ज्ञानियांचे वागणे असे आजच्या प्रमाणे||

भूतकाळाचा शोक व भविष्याची चिंता यात अडकून न पडता, सद्य:स्थितीनुसार वागता येणं अतिशय महत्वाचं. हे सुभाषित ऐकल्यावर असं वाटलं, ह्याच्यात आपल्या आयुष्याचं सगळं सार सामावलं आहे. माणूस नको त्या गोष्टींची काळजी करण्यात आपल्या आयुष्याचे किती मोलाचे क्षण वाया घालवतो ना! आयुष्य हीच ईश्वराकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. त्याला पूर्णपणे एन्जॉय केलं पाहिजे. वर्तमानाला म्हणूनच तर present म्हणतात. present म्हणजे गिफ्ट. हा क्षण ही सगळ्यात मोठी देणगी आहे असं समजून जगा, आणि मग पहा, आयुष्य कसं सुंदर वाटेल!

ह्या सुभाषितावरून मी लहानपणी ऐकलेली एक छानशी गोष्ट आठवली. एक आटपाट नगर होतं. त्याचा राजा अतिशय दयाळू व बुद्धिवान होता. प्रजा पण सुखात नांदत होती. त्या नगरात एका मजुराचं घर होतं. घरात तो, त्याची बायको व दोन मुलं होती. त्यांच्या घरासमोर एक मातीची छोटी टेकडी होती. एकदा सकाळी मजुराच्या बायकोनी पाहिलं की मजूर त्या टेकडीच्या पायथ्याशी बसला होता व अतिशय चिंताक्रांत दिसत होता. तिनी त्याला कारण विचारलं पण त्यानी सांगितलं नाही. एक दिवस झाला, दोन दिवस झाले. मजुराच्या चेहऱ्यावरची काळजी वाढतच होती. त्याला जेवण पण जात नव्हतं. मग मात्र बायकोनी हट्ट धरला की मला कारण कळलंच पाहिजे. मजूर म्हणाला, "आपल्याला पैसे पुरत नाहीत, म्हणून मी एक लहानशी चोरी केली. महाराजांनी मला दरबारात बोलावले व चोरी कबूल करायला सांगितले. मी खूप घाबरलो होतो, म्हणून काहीच बोललो नाही. मग त्यांनी मला शिक्षा सुनावली की तुझ्या घराजवळ जी मातीची लहानशी टेकडी आहे, ती मी सांगतो त्या ठिकाणी नेऊन ठेव. तू जर हे काम पूर्ण केलंस तर मी तुला १०० सुवर्णमुद्रा देईन. नाहीतर तुरुंगात टाकीन." मजूर बायकोला म्हणाला, "मी सारखा विचार करतोय, मी जर त्या दिवशी खरं बोललो असतो, तर महाराजांनी मला सोडून दिलं असतं. म्हणून मला पश्चात्ताप होतोय आणि भीतीही वाटतीये की काम पूर्ण नाही झालं, तर मला तुरुंगात जावं लागेल. मग तुम्हा तिघांचं काय होईल? ह्या काळजीनी मला काही सुचत नाहीये." मजुराची बायको अतिशय हुशार होती. (बायका हुशार असतातच म्हणा.) तिनी आतून दोन्ही मुलांना बोलावले. चार फावडी, कुदळी, घमेली घेऊन आली व म्हणाली, "आता टेकडी कडे बघत न बसता पायथ्याशी खोदायला सुरवात करा." चौघांनी मिळून काम सुरु केलं. व दिवस संपेपर्यंत दुसरी मातीची छोटीशी टेकडी, ठरल्या जागी आकार घेऊ लागली. काही दिवसातच राजानी सांगितल्या जागी टेकडी उभी राहिली. मजूर दरबारात गेला. राजानी त्याला १०० सुवर्ण मुद्रा दिल्या व ते म्हणाले, "शिक्षेतून मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तू गरीब असलास तरी, तुम्ही सगळे एकजूट होऊन काम कराल तर तुला कुटुंबाला पोसण्यासाठी चोरी करायची गरज नाही."

ह्या साध्या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की झालं त्याबद्दल पश्चात्ताप करून काहीच फायदा नाही, कारण आपण ती गोष्ट बदलू शकत नाही. आणि भविष्यात काय होणार हे नक्की कुणीच सांगू शकत नाही. म्हणून त्याची चिंता करण्यात वेळ वाया घालवू नये. त्यापेक्षा सद्य परिस्थितीत जे उत्तम वाटेल ते करावे. "Time is money and more than money" अशी प्रसिद्ध म्हण आहे. वेळ हा पैशापेक्षा कितीतरी मौल्यवान आहे. पैसे तुम्ही परत कमवू शकता. पण गेलेली वेळ कधीही परत येत नाही. वर्तमानाचा खूप मोठा फायदा म्हणजे तो आपला असतो. त्या मिळालेल्या वेळाचं आपण काय करतो, हे खूप महत्वाचं आहे. समजा, आपल्याकडे जर फक्त १५ मिनिटे फ्री असली, तरी त्यात तुम्ही चांगलं काही वाचू शकता, लिहू शकता, कविता करू शकता, चित्र काढू शकता, व्यायाम करू शकता. म्हणजे काहीतरी क्रिएटीव करू शकता, नाहीतर हीच १५ मिनीटं तुम्ही केलेल्या चुकांबद्दल स्वतःला दोष देण्यात, रडण्यात, भांडण्यात, दुसऱ्याला दोष देण्यात, दुसऱ्यांचा द्वेष करण्यात पण घालवू शकता. Choice is entirely ours.

जेव्हा तुम्ही वर्तमान क्षणाचा आदर करायला शिकता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानी एक positive व्यक्ती होता. तुम्हाला एकेका मिनिटाची, तासाची, दिवसाची कदर वाटू लागते. मी मधून मधून एक लिस्ट करते की आपल्याला नवीन काय काय शिकायचं आहे, काय सुधारणा करायच्या आहेत. आणि मग ते achieve करायचा प्रयत्न करते. कारण म्हणतात ना - life should not only be lived, it should be celebrated. आयुष्य नुसतं रटाळपणे जगू नका, त्याचा पुरेपूर आनंद घ्या. सध्याच्या काळात, वर्तमानात जगणे, म्हणजे नवीन technologies शिकणे हे सुध्दा आलं. परदेशी राहणाऱ्या आपल्या मुलांशी आपण Whatsapp, facebook, Skype ह्या सगळ्यांनी सतत connected असतो. हे सगळं शिकताना थोडा त्रास होतो, पण एकदा अंगवळणी पडलं की सोपं वाटतं. आपण वर्तमानाशी जितकं लवकर जूळवून घेऊ तितकं आपल्याला व इतरांना सोपं जातं. आता net banking, online payments हे सर्व प्रकार अगदी रोजचे झाले आहेत. नवीन फॅशन्स, नवीन चालीरीती, नवीन technologies तरुण मंडळींकडून शिकायला हव्या.

परवाच माझी बहीण सुवर्णा मला फोनवर हसून सांगत होती की "ताई, आमच्या घरी बरंच जुनं फर्निचर आणि बाकी सामान पडलं होतं व ते कुणाला द्यावं कळत नव्हतं." तर तिचा एक आठवीतला विद्यार्थी म्हणाला, "Madam, OLX वर सगळ्या सामानाचे फोटो टाकू" आणि खरच सगळं सामान सहज विकलं गेलं. वर्तमानाप्रमाणे स्वतःला बदलणं व स्वतःला flexible ठेवणं खूप महत्वाचं आहे. हे ज्याला साधलं तो माणूस कुठल्याही वयोगटात सहज सामावू शकतो. वेळेची खरी किंमत वर्तमान पत्राला विचारा. जे सकाळी उकळत्या चहाबरोबर दिवाणखान्याच्या टेबलवर दिमाखात मिरवत असतं. तेच रात्री रद्दीच्या ढीगावर पडलेलं आढळतं.

ह्यावर मला एक चारोळी सुचली.
नको करूस पश्चात्ताप भूतकाळात केलेल्या चुकांचा
नको करूस अति विचार येणाऱ्या भविष्याचा
दिलखुलास जग आयुष्य, आनंद घे ह्या क्षणाचा
नको विसरूस हा आहे अनमोल नजराणा ईश्वराचा


मेघना असेरकर