संपादकीय - नव्याचे स्वागत!

भारतीय संस्कृतीत काळ चक्राकार आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीन अवस्थांतून तो फिरत असतो ह्याची खोलवर जाणीव आपल्यात कुठेतरी आहे. “नेमेचि येतो मग पावसाळा” पासून “पुनरपि जननं पुनरपि मरणं” पर्यंत ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतच असतं. ह्या विशाल अनादि-अनंत चक्राच्या एकेका आवर्तनाशी निसर्गातल्या बदलांची आवर्तने व साहजिकपणे मानवी भाव-भावनांची, जीवनानुभवांची आवर्तने घट्ट बांधलेली असतात. काळाच्या पाळण्यात बसून वर जाताना उरात दाटून येणारी भावना प्रत्येकवेळी मात्र नवीच. अशा बदलत्या निसर्गाचा, खऱ्या वा कल्पित भाव-भावना-अनुभवांचा व उत्सवांचा शब्दचित्रालेख काळाच्या ह्या आवर्तनात रेखाटायच्या ऋतुगंधच्या संकल्पमालेतलं हे पहिलं पुष्प.

वसंत म्हणजे निसर्गाचा नवनिर्मितीचा ऋतु; म्हणून ह्या अंकात नाविन्याची, नव्या सुरुवातींची, नवनिर्मितीची व नव्या अनुभवांची वेगवेगळी रुपे वाचायला मिळतील. पहिल्या अपत्याच्या चाहुलीपासून त्याच्या बोबड्या बोलांनी सुखावून जाण्याच्या भारलेल्या काळातली कविता वा एका स्वप्नातून आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी कथा वा एका आईच्या पन्नासाव्या वाढदिवशी तिला तिच्या मुलाने मिळवून दिलेला अफलातून अनुभव वा लेखकाच्या पहिल्या(च) लग्नाचा मजेशीर अनुभव वृत्तांत वा कोकणातल्या आपल्या गावातल्या चैत्रोत्सवांचे रसभरित वर्णन अशा विविध कलाकृतींनी हा अंक सजवल्याबद्दल आमच्या लेखक-कवींचे आम्ही शतश: ऋणी आहोत.

काळाच्या ह्या नव्या आवर्तनात आमच्या वाचकांना अनेकानेक नवनवीन संकल्पना, अनुभव, ज्ञान व आनंदाचा लाभ होवो ही मनोकामना व नववर्षाच्या पुनरेकवार हार्दिक शुभेच्छा!

आपली,
ऋतुगंध २०१८ समिती.


२ टिप्पण्या:

  1. एक सत्यकथा लिहिण्याची इच्छा आहे आपल्या मासिकात. कृपया काय करायचे त्यासाठी हे कळवा.

    आपला,

    हेमंत घायाळ
    हैदराबाद
    suhemin@yahoo.co.in

    उत्तर द्याहटवा