- एक गुलज़ार शाम -

गुलज़ार म्हणजे एकटी संध्याकाळ
गुलज़ार म्हणजे चंद्राचा हात धरून ठेवणारी रात्र
गुलज़ार म्हणजे मूर्तिमंत सर्जनशीलता
गुलज़ार म्हणजे भावविश्वातले बारकावे टिपण्याची परिसीमा
गुलज़ार म्हणजे सामाजिक भान आणि तळमळ
गुलज़ार म्हणजे आठवणीतली तीव्र कळ
गुलज़ार म्हणजे कवितेच्या पांघरुणात गुरफटून घेतलेला कवी
गुलज़ार म्हणजे क्षणांचं अस्तर उसवून आतलं गुपित ओळखू शकणारा जादुगार
गुलज़ार म्हणजे विरणाऱ्या धुक्याचा पदर
गुलज़ार म्हणजे उबदार निखाऱ्यावर फुंकर
गुलज़ार म्हणजे दरीतल्या पावसाची गाज
गुलज़ार म्हणजे कवितेचा आवाज !

खूप दिवस वाट बघून शेवटी २६ जुलै ची संध्याकाळ आली आणि सिंगापुरातल्या तमाम रसिकांची पावलं सिंगापूर कॉन्फरन्स सेंटरच्या दिशेने चालू लागली. कार्यक्रमाची वेळ जवळ यायला लागल्यावर सादरकर्त्यांपेक्षा प्रेक्षक-श्रोत्यांच्या काळजातली धडधड वाढण्याच्या दुर्मिळ प्रसंगांपैकी हा एक. सभागृह खचाखच भरलेलं. लगबग, सळसळ, उत्सुकता शिगेला पोचलेली. ओळख, स्वागत वगैरे आधीचे शिष्टाचार चालू असताना अधीरपणे वाट बघणाऱ्या प्रेक्षकांची नजर स्टेजवरच्या दरवाज्यावर खिळलेली … आणि ते येतात. नम्रपणे हात जोडून धीम्या पावलांनी व्यासपीठावर स्थिरावतात तोवर सारे सभागृह अभावितपणे उभे राहिलेले... भारतीय कवितासृष्टीच्या सम्राटाला स्वागताचा सलाम करण्यासाठी!

सलीम अरिफ या नाट्य-दिग्दर्शक मित्राला सोबतीला घेऊन त्यांनी गप्पांना सुरुवात केली आणि पहिलाच प्रश्न सलीम यांनी विचारला की गेल्या ६०-७० वर्षातल्या कोणत्या गोष्टींचा प्रभाव तुमच्या साहित्यावर सर्वात जास्त पडला? गुलज़ारजींनी 'अभ्यासक्रमाबाहेरचं काही विचारू नका' अशी प्रांजळ सुरुवात करून हळू हळू त्या काळाचा पडदा उलगडायला सुरुवात केली. स्वातंत्र्यपूर्व काळातलं भारलेलं वातावरण, नेहरू, मौलाना आझाद, राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांचं काम, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली फाळणीच्या काळातली रक्तरंजित दिल्ली आणि या सगळ्याच गोष्टींचा मनावर उमटलेला खोलवर ठसा याविषयी बोलताना अजूनही त्या आठवणींविषयी असलेली अस्वस्थता जाणवत राहिली. स्वातंत्र्यानंतरच्या भारताविषयी त्यांचं मत विचारल्यावर त्यांनी आशावादी सुरात हे नमूद केलं की भारतासारखा मोठा गाडा चालवणं म्हणजे मोठंच आव्हान आहे. वळणा- वळणाच्या रस्त्याने मोठा पर्वत चढण्यासारखं हे आहे … कधी वरचं आकाश दिसेल तर कधी नाही; पण म्हणून आपण प्रगतीच्या दिशेने पुढे गेलोच नाही असं नक्कीच नाही.

समाजात घडणाऱ्या घटनांवर संवेदनशीलपणे विचार करून प्रतिक्रिया देणं हे कुठल्याही चांगल्या नागरिकाचं लक्षण आहे असं म्हणताना त्यांच्या प्रतिक्रिया या कविता आणि कथांमधून कश्या उतरतात यावर बोलणं सुरु झालं. कविता लिहायला जास्त आवडतात आणि त्या छोट्या असल्यामुळे जे सांगायचं आहे ते पटकन दुसऱ्यापर्यंत पोचवता येतं पण काही वेळा विषयच एवढा खोल असतो की कविता लिहून तो तिथे संपत नाही आणि मग त्यात एखाद्या कथेचं बीज दिसायला लागतं.

गप्पांचा ओघ लवकरच सिनेमाच्या दिशेने वळला आणि संवाद, पटकथा, दिग्दर्शन या टप्प्यांना ओलांडून गाण्यांवर स्थिरावला. चित्रपटासाठी गाणी लिहिताना आपण एखाद्या पात्रासाठी ती लिहितो तेंव्हा त्या गाण्याची भाषा तशी सुसंगत असावी लागते हे सांगताना त्यांनी 'बिडी जलैले', 'गोली मार भेजेमें' किंवा 'आँखें भी कमाल करती है .. पर्सनल से सवाल करती है!' अशी उदाहरणं देऊन वातावरण खुसखुशीत ठेवलं. सध्याच्या चित्रपटात अभ्यासपूर्वक काम क्वचितच दिसतं आणि नव्या फिल्ममेकर्सनी ग्रामीण भारताचाही अभ्यास केला पाहिजे आणि चित्रपटासाठी नवीन साहित्याचा शोध घेतला पाहिजे असा शेराही मारला.

अश्या गप्पांमध्ये रंगून गेलेल्या कार्यक्रमाचा पूर्वार्ध प्रेक्षकांच्या काही प्रश्नोत्तराने संपला. पण उत्तरार्धात तर विशेष पर्वणी मिळाली ती गुलजारांच्या आवाजात त्यांच्या कविता ऐकण्याची. कवितेशी असलेलं त्यांचं अनोखं नातं त्यांच्याकडून ऐकताना प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले.

मैं कबाड़ी जिन्दगीका
खाली डिब्बे बोतलोंमें नज़्में भर के बेचता हूँ

अशी मार्मिक सुरुवात करत त्यांनी एकाहून एक सुंदर कविता ऐकवल्या आणि सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गाजवलं. 'मैं नज़्में ओढ़कर बैठा हुआ हूँ' किंवा 'चलो ना दरिया में कांटा डाले .. नज़्में पकड़ें ' सारख्या नाविन्यपूर्ण इमेजेसमुळे प्रत्येक कविता एक वेगळाच समृद्ध अनुभव देत होती. सूक्ष्म भावनांनासुद्धा नेमक्या शब्दात पकडून सुंदर रचनेत रुपांतरित करणं ही तर गुलज़ारांच्या कवितेची खासियतच आहे जी 'ये पिलपिले लम्हें' सारख्या कवितेतून जाणवत राहिली. त्यांचं सामाजिक भान आणि भारतीय संस्कृतीचं अंतरंग समजण्याची ताकद यांमुळे त्यांच्या वरवर सध्या वाटणाऱ्या रचना एका वेगळ्याच पातळीवर जाऊन पोचतात. मग कधी ते माहेरून रत्नहार न आणू शकलेल्या सुनेविषयी बोलतात तर कधी आताच्या जमान्यात कालबाह्य झालेल्या जुन्या पिढीच्या स्वातंत्र्यपूर्व आठवणींविषयी.

वेगवेगळ्या अनुभवातून त्यांच्या खर्जातल्या आवाजावर तरंगत कार्यक्रम शेवटापर्यंत कधी येऊन पोचला हे कळलंही नाही. खूप सुंदर असं काही ऐकल्यावर अजून जास्त ऐकायला मिळावं आणि कार्यक्रम संपूच नये असं जेंव्हा वाटतं तेंव्हाची ती अतृप्ती ही एक प्रकारे तृप्तीचाच अनुभव देत असते. अश्याच काहीश्या भावनेने ती मैफिल संपली आणि कायम आठवणीत राहील अशी ती संध्याकाळ सभागृहापाशीच रेंगाळत राहिली.

- जुई चितळे

३ टिप्पण्या: