वसुधैव कुटुम्बकम्

बऱ्याच विचारवंतांकडून असे ऐकायला मिळते की मिसाइल्स आणि आंतरजालाच्या ह्या आधुनिक जमान्यात 'अंतर' हे परिमाण नष्ट झाले आहे. राष्ट्र, धर्म ह्या संकल्पना कालबाह्य झाल्या असून विश्वएकता हाच विचार स्फूर्तिदायक व अनुकरणीय आहे. हे खरंच आहे. तथापि वैश्विक विचार हा आधुनिक चिंतकांनीच प्रथमतः दिला आहे असे मात्र नाही. फार फार पूर्वी म्हणजे इतिहासालाही अज्ञात असलेल्या कालखंडातील ऋषीमुनींनी केलेल्या गंभीर चिंतनातून ऐक्य व विश्व कल्याणाचा विचार विकसित झाला. शतकानुशतकांची आपली एक प्रार्थना आहे -
“सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः। 

सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःखभाग्भवेत्॥ [ऋग्वेद]

केवळ मानव जातच नव्हे तर सर्व जीवित सुखी असावेत; कुणीही दुःखी असू नये अशा सर्वांच्या भल्याची मागणी आपण करतो. आधुनिक विचारवंतांची वैचारिक झेप, "जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त भले" येथ पर्यंतच गेली. ह्या पलीकडे नाही. उपनिषद कालखंडापासून ते आजच्या काळापर्यंत आपण नेहमीच विशाल, भव्य, जगद्व्यापी विचार करत आलो आहोत.

अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥ 

[महाउपनिषद ६-७२]

हा माझा, तो परका असा भेदभाव केवळ कोत्या मनोवृत्तीचे लोक करतात. विशाल दृष्टीकोन असलेले मात्र, सकळ पृथ्वी हे माझे कुटुंबच आहे असे मानतात. संत शिरोमणी ज्ञानेश्वर व समर्थ रामदास ह्यांनी केवळ भारतातच प्रवास केला. भारताबाहेर नाही. तुकारामांनी फार फार तर देहू ते पंढरपूर एवढाच. तरी त्यांचा दृष्टीकोन आकाशाएवढा कसा झाला? समर्थ रामदासस्वामी लहान असताना एकदा लपून बसले, काही केल्या सापडेनात. अखेर सापडले. “काय करीत होतास” असे विचारल्यावर “आई, चिंता करितो विश्वाची” असे उत्तर दिले होते..

"हे विश्वचि माझे घर। ऐसी मति जयाची स्थिर। किंबहुना चराचर। आपण जाहला।।" असे संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणून ठेवले आहे. 

भारतात उदयास आलेली विचारधारा अखंडितपणे हजारो वर्षे जिवंत आहे. ह्या विचारात निसर्गाचे शोषण नाही तर दोहन होते. प्राण्यांची, जमिनीची, वृक्षांचीच काय दगडाचीही पूजा होते. अर्थ [सांपत्तिक संचय] व काम [भौतिक सुख] हे धर्म व मोक्ष ह्याच्या मर्यादेत असावे अशी शिकवण आहे. 

संपूर्ण मानवजात कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे अलिखित नियमांनी बांधलेली आहे. किंबहुना अंगांगी, म्हणजे एक शरीर - अनेक अवयव असा संबंध आहे. कुणी अवयव श्रेष्ठ नाही की कनिष्ठ. प्रत्येकाचे काम ठरलेले असते. एक दुखावला तर दुसऱ्याला त्रास होतो. हिंदू तत्त्वज्ञानाचा असा हा "अविभक्तं विभक्तेषु" एकात्म विचार आहे. विविधतेमध्ये एकात्मता, एकरसता हे आपले वैशिष्ट्य आहे. विविधतेतून येणारी भिन्न भिन्न वैशिष्ट्ये नष्ट न करता त्यांचे जतन करणे व त्यांच्यात समानता नव्हे तर सामंजस्य, समन्वय निर्माण करणे ह्यावर आपला विश्वास आहे. 

आपल्या संस्कृतीची हिमालयासम उन्नत दृष्टी, "एकं सद् विप्रा: बहुदा वदन्ति। [ऋग्वेद १-१६४-४६ ]" ह्या वचनाद्वारे अभिव्यक्त झालेली आहे. तेथपर्यंत पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा जगातील कुठल्याही मत-मतांतराने केलेली नाही. हा भाव व्यक्त करण्यासाठी सहिष्णुता असा शब्दप्रयोग होतो. पण तो एका अर्थी हलक्या प्रतीचा आहे. कारण त्यामध्ये 'अहं'चा भाव आहे व इतरांविषयी 'तुमचे विचार सहन करतो' असा आहे. 'तुमच्या विचारांचाही आदर करतो' हे सहिष्णुतेच्या अधिक उंचीचे आहे. 

हा विषय केवळ तत्त्वज्ञानापुरता मर्यादित नसून आपला व्यवहारही तसाच राहिला आहे. पारशी, ज्यू लोकांना आपण सामावून घेतले. जगातील कुठलाही भूभाग बळकावून बळजबरीने धर्मांतर केले नाही. तर आपल्या पूर्वजांनी "कृण्वन्तो विश्वं आर्यं" व "स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन पृथिव्यां सर्वमानवाः [मनुस्मृतिः २-२०]" ह्या ध्येयाने आपला विचार विश्वभर पसरविला. 

आज विश्वभर आपल्या संस्कृतीसंबंधी जिज्ञासा, उत्सुकता आहे. आपल्या सर्वसमावेशक, वैज्ञानिक तरीही आध्यात्मिक दृष्टीकोनाच्या माध्यमातूनच जगास सतावणाऱ्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकेल अशी आशा अनेक राष्ट्रांना आहे. आपण, विशेषतः विदेशस्थ भारतीयांनी, श्रेष्ठ हिंदू संस्कृतीचा अभिमान हृदयस्थ जागृत ठेवणे, त्याचे प्रकटीकरण आपल्या व्यवहारातून होणे व त्याचे संरक्षण करण्यास सिध्द असणे हे आपले कर्तव्य मानले पाहिजे. 

प्रस्तुत लेख म्हणजे आपल्यासारख्या सूज्ञ वाचकांना काही सांगणे हा भाव नाही तर माझ्या विचारांना सुदृढ करणे असा प्रयत्न आहे.
- गिरीश टिळक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा