ऋणानुबंध

त्या दिवशी मी क्रांजी ते चोआ-चू-कांग प्रवास MRT ने करत होतो. रात्रीची साधारण ८.३० ची वेळ होती, डब्यात फारशी गर्दी नव्हती. मी माझ्या सवयीप्रमाणे ट्रेनच्या दारात वाचत उभा होतो. MRT क्रांजी स्टेशनवर नेहमीप्रमाणे थांबली होती. दार बंद होण्याच्या फक्त काही क्षण आधी एक सुमारे ३ वर्षांची छोटी मुलगी पळत येऊन अकस्मात डब्यात घुसली, यंत्रवत दारे बंद झाली आणि ट्रेन सुरु झाली. दाराच्या काचेतून मी सहज बघितलं तर एक बाई ओरडत, एका बाळाला बाबागाडीतून सांभाळत ट्रेनच्या मागे पळत येताना दिसली. हे सगळ निमिषार्धात घडलं होतं. ती बाई, जी त्या मुलीची आई असावी, बाबागाडीतून बाळाला आणि ह्या छोट्या मुलीला घेऊन येत होती, ट्रेनची दारे उघडी दिसल्यावर ही लहान मुलगी आईचा हात सोडून धावत ट्रेनमध्ये शिरली होती. बाळ आणि बाबागाडीमुळे त्या बाईला मुलीचा वेग साधता आला नाही किंवा त्या मुलीला वेळीच थांबवता आलं नाही. परिणामी ती लहान मुलगी चालत्या गाडीत, आई फलाटावर आणि ही संपूर्ण परिस्थिती कळलेला मी एकमेव!

गाडीच्या डब्यातलं आपत्कालीन (इमरजन्सी) बटण दाबून मी चालकाला झालेल्या प्रकाराची कल्पना दिली. त्याने मला पुढच्या - युटी स्टेशनवर उतरण्याची सूचना केली. आपली आई मागे राहिल्याचं लक्षात आल्यावर ह्या मुलीने खणखणीत आवाजात भोकाड पसरलं होतं. मला त्या बिचारीची दया आली. अजाणतेपणी ती एका मोठ्या संकटात सापडली होती. अश्या वेळी माझ्यातली माणुसकी जागी झाली नसती तरच नवल! चवड्यांवर बसून मी तिची उंची गाठण्याचा प्रयत्न केला. तिला “रडू नको, तुझी आई तुला भेटेल” असं तिला समजेल अश्या इंग्लिशमध्ये सांगायचा प्रयत्न केला. पण त्या बिचारीला इंग्लिश भाषेचा काही लवलेशही नव्हता. शेवटी मी यूटी स्टेशन येईपर्यंत काहीतरी टिवल्या-बावल्या करत त्या छोटीला व्यस्त ठेवलं. ती माझ्याकडे अतिशय परक्या नजरेनी बघत होती पण सुदैवाने रडायची थांबली होती. 

यूटी स्टेशनला गाडी आली तेंव्हा माझ्या डब्यापाशी MRT चे सहाय्यक आमची वाट बघत उभे होते. डब्याची दारं उघडताच सहाय्यक डब्यात शिरले आणि त्या मुलीला बाहेर येण्यासाठी प्रवृत्त करायला लागले. त्या लालभडक शर्टमधल्या लोकांना घाबरून ती लहानगी माझ्यामागे लपली. जसजसे ते तिला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले तसतसा तिने माझ्या मांडीला दोन्ही हातानी घट्ट मिठी मारून बाहेर जायला ठामपणे अबोल नकार दिला. त्या परक्यांसमोर तिला आता मी ओळखीचा – विश्वासाचा वाटत होतो. नाईलाजाने त्या मुलीबरोबर मीसुद्धा फलाटावर उतरलो. दार बंद होऊन गाडी निघून गेली.

दम्यान MRT च्या सहाय्यकांनी एकमेकांशी संपर्क साधून ह्या माय-लेकींचे मीलन यूटी स्टेशनवर घडविण्याचे योजले होते. पुढच्या काही मिनिटात दुसरी ट्रेन आली. ट्रेनमधून ती आई बाळ आणि बाबागाडी घेऊन खाली उतरली. हातातली बाबागाडी अक्षरश: पळवत ती आमच्या जवळ आली. आईने मुलीला घट्ट मिठी मारली. अनेक भावना अश्रूंच्या रूपाने ओघळत होत्या. काय टोकाचं वाईट होऊ शकलं असतं ह्याचा थरार, स्वत:च्या निष्काळजीपणाबद्दलचा राग, प्रसंगातून सहीसलामत सुटल्याचा नि:श्वास – आनंद.. एका मातेच्या किती भावना एक पुरुष समजून घेऊ शकेल! काही क्षणात त्या माऊलीने लेकीला आसवात पूर्ण भिजवून टाकलं होतं. त्या अबोल-ओल्या-मिश्र भावनांचा पूर बघून मी हेलावून गेलो होतो. ती आई मला खूप वेळा thank you म्हणाली. बाकी भावना व्यक्त करायला तिला तिच्या मातृभाषेचा आधार घ्यावा लागला, जिचा मला गंधही नव्हता. पण तिला काय म्हणायचं आहे हे कळायला मला शब्दार्थ कळायची गरज नव्हती, गरज होती ती भावार्थ जाणून घेण्याची.

मी पुढची ट्रेन घेतली तेंव्हा दिसेनासा होईपर्यंत त्या मायलेकी मला फलाटावरून छान हसत “अच्छा” करत राहिल्या. त्यांच्या चेहेऱ्यावरचं समाधानचं हसू मी कधीच विसरू शकणार नाही. ती लहान मुलगी मला एका विचित्र अपघाताने भेटली होती. त्या प्रसंगात मी जे काही केलं ते जरी माणुसकीच्या नात्यानी केलं असलं तरी थोड्याफार प्रतीक्षेनंतर ती मुलगी तिच्या आईकडे सुखरूप जाणार आहे हे मी पक्कं गृहीत धरलं होतं. म्हणूनच संपूर्ण प्रसंगाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन - 'पडली जबाबदारी समर्थपणे पार पाडा' इतकाच रुक्ष होता. पण त्या छोटीला शांत करण्याच्या प्रयत्नात ती माझ्यावर विश्वास टाकेल अशी पुसटशी शक्यतासुध्दा माझ्या मनाला शिवली नव्हती. एका ३ वर्षाच्या चिमुरडीने एकही शब्द न बोलता मला रुक्ष जबादारीच्या पुढचा एक पाठ शिकवला होता. लहान मुलं सहजा-सहजी परक्या माणसावर विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणून लहान मुलांचा विश्वास जिंकण्यात मला नेहमीच धन्यता वाटते. ह्या मुलीचा विश्वास संपादन केला असल्याच्या जाणीवेने मला गहिवरून आलं होतं.

कुटुंब म्हणजे तरी काय - प्रेम आणि विश्वासावर बांधलेले ऋणानुबंध! मग असे ऋणानुबंध जिथे जुळतील तिथे कुटुंबच! म्हणजे प्रेम आणि विश्वासावर नाती बांधू शकण्याची माणसाची क्षमता ही एकमेव मर्यादा! जर ह्या मर्यादेवर माणूस विजय मिळवू शकला तर - वसुधैव कुटुंबकम!

-  विश्वास वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा