कॉपीरायटिंगच्या जगात पहिलं पाऊल

पहिली नोकरी प्रत्येकाचा आयुष्यात फार खास असते. पगार, बोनस, अलौन्स अशा सगळ्या भौतिक सुखांपेक्षा आपण काम करू लागणार ही भावना त्या नव्याने उमलू पाहणाऱ्या मनाभोवती पिंगा घालत असते. टीव्हीत पाहून आणि इकडे तिकडे ऐकून वाचून प्रत्येकानेच मनातल्या मनात ऑफिसबद्दल एक कल्पना रंगविलेली असते. अगदीच सेल्समनचा जॉब असेल तरी त्या वेगळ्या आयुष्याबद्दल त्या व्यक्तीने एक काल्पनिक विश्व रेखाटून ठेवलेलं असतं.

माझेही यापेक्षा फार काही वेगळं नव्हते… तब्बल १० वर्षांपूर्वी, नंदुरबार सारख्या अतिशय दुर्गम भागात आयुष्याची पहिली १८ वर्ष घालवल्यावर मी जळगावला कायद्याची पदवी घ्यायला आले होते.. जळगाव हे अगदी पुणे मुंबई सारखे उच्चभ्रू आणि विद्वान शहर नसले तरी आम्हा डोंगरकपारीतल्या माणसांना तिकडे गेल्यावर लॉटरी लागल्यासारखे वाटायचे. उत्तर महाराष्ट्रातले ते एक प्रगत शहर होते आणि आता तर फारच प्रगत झालंय.

पहिले तीन महिने कॉलेजमध्ये रमल्यानंतर, रुटीन लागल्यावर मग उरलेल्या वेळात काय करावे हा प्रश्न मला पडू लागला.. मी पाच वर्षांचा कोर्स निवडल्याने पहिली दोन वर्ष कॉलेजला अभ्यासक्रमात फक्त सामाजिक शास्त्रांवर भर होता. सामाजिक शास्त्र म्हणजे माझ्यासाठी रोजच्या जगण्यातला भाग... मी तीच तीच सामाजिक शास्त्राची पुस्तक वाचून कंटाळले होते आणि मग आई बाबांपुढे माझा वेळ जात नाही म्हणून टुमणे लावले होते. आधी आई बाबांनी काही पुस्तक वाचायला आणून दिली. मी त्यांचाही फडशा पडला आणि मग मी स्वतःच थोडेफार लिहू लागले. पण तरीही मनासारखं असं काही अजूनही घडत नव्हतं. पण म्हणतात ना कि तुम्ही मनापासून काही मागितले तर नियती ते तुमच्या पुढ्यात आणून ठेवते..आणि तसच झालं. 

एक दिवस वर्तमानपत्रात एका कोपऱ्यात नोकरीची एक आकर्षक जाहिरात आली होती, “तुमच्या लेखणीने तुम्ही ग्राहकांना आकर्षित करू शकत असाल तर तुमचे आम्ही स्वागत करतो”... हे वाचले आणि माझ्या मनाने सांगितले, आता इथे पोहचायलाच हवे..पाहू बरं आपण लेखणीने कुणाला आकर्षित करू शकतो का?

दुसऱ्याच दिवशी इंटरव्यू होणार होते आणि कंपनीचं कार्यालय घरापासून फार अंतरावर नव्हतं. आईला आणि बाबांना फोन करून कल्पना दिली व थेट इंटरव्यूला पोहचले. हि कंपनी म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर एक जाहिरात कंपनी होती. जाहिरात कंपनी आणि ती देखील खान्देशात... माझ्यासाठी हा अजून एक सुखद धक्का होता. मला जाहिरातींबद्दल खूप तपशीलपूर्वक माहित नसले तरी मी अनेकदा अंदाज बांधायचे कि वर्तमानपत्रात येणाऱ्या किंवा टीव्हीवरच्या जाहिराती कुणीतरी नक्की लिहीत असणार.. हे पण बहुतेक असेच काही असेल.

दुसऱ्या दिवशी इंटरव्यूला आल्यावर, मस्त एसी ऑफिस, तिथली अगदी वेगळ्या रंगढंगातली “पॉश” माणसं पाहून मला मी खान्देशातल्या एका दुर्गम खेड्यातली मुलगी आहे याची त्याक्षणी जाणीव झाली आणि कालपासून संचारलेलं आत्मविश्वासाचं भूत तत्क्षणी गळून पडलं. पण खिंडीपर्यंत पोहचलेच आहे तर खिंड लढवायलाच हवी म्हणून मी माझा हाताने लिहिलेला रिस्युम आणि माझी याआधी मिळवलेल्या अचिएव्हमेंट्सची फाईल त्यांच्याकडे दिली. पुढे तासाभरात लेखी परीक्षा पार पडली. मला त्या परीक्षेत जाहिराती संदर्भातील एकाही थेअरीच्या प्रश्नांची उत्तरे आली नसली तरी मी कल्पकता वापरून लिहिलेल्या जाहिरातींनी मात्र सर्व परीक्षकांना भुरळ घातली होती. माझी मुलाखातीच्या राउंडसाठी निवड झाली. माझी मुलाखत घेतल्यावर मी लवकरच ह्या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात रुळेल याची त्यांना खात्री वाटली आणि अवघ्या ३ हजार रुपये महिन्याचा कॉपीरायटरचा जॉब मला देण्यात आला.

माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता.. घरी कळल्यावर तर आई बाबांना देखील खूप आनंद झाला कारण माझा वेळ जात नाही असं टुमणं लावायला मी घरी नसणार नव्हते आणि मुख्य म्हणजे मला आवड आहे असं काहीतरी मी करणार होते.

आज १० वर्षानंतर, जाहिरात कंपनी म्हटलं की लोकांना सहज कळतं कि हे एक ग्लॅमरस क्षेत्र आहे आणि इकडे काल्पनिक जगाचा आधार घेऊन उत्पादनाचा खप कसा वाढेल यासाठी सगळ्यांची झटपट चाललेली असते. पण १० वर्षांपूर्वी चित्र असे नव्हते. मी कामावर रुजू झाली तशी मला छोटी छोटी काम दिली जाऊ लागली. दिवसाला जास्तीत जास्त दोन किंवा तीन जाहिराती लिहायच्या. मला सुरवातीला वाटले, छ्या मी काय तासाभरात संपवेन काम आणि मग ऑफिसच्या वाचनालयाचा फडशा पाडेन.. मी पहिल्या दिवशी दोन तीन जाहिरातीचे नमुने घेऊन जेव्हा बॉससमोर गेले तेव्हा त्याने ते वाचून कचऱ्यात टाकले आणि परत प्रयत्न कर असे सांगून कामाला लावले. तब्बल ६ वेळा माझे वेगवेगळे नमुने रिजेक्ट केल्यावर ऑफिसचे तास जसे संपत आले तसे बॉस माझ्याकडे आले आणि म्हणाले,

“ हे शेवटचे सॅम्पल जरा बरे झाले आहे पण तुझी स्ट्रॅटेजी आणि पॉसिबल आऊटकम हे मला उद्या तपशीलवार एका प्रेसेंटेशन मध्ये समजावून सांग.” 

झाले! मला डोक्यात लख्ख प्रकाश पडला. काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात. मी तडक वाचनालय गाठले… तिथून जाहिरातींबद्दलची चार पुस्तक घेतली आणि माझा जाहिरात क्षेत्राच्या दिशेने खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला.. जाहिरात लिहिणे हे काही कविता किंवा कथा लिहिण्या इतके सोपे नाही हे मला कळून चुकले. प्रत्येक जाहिरातीमागे एक विचार असतो. त्या विचारातून जर विक्रेत्याला नफा झाला तरच पुढची जाहिरात आपल्याला करायला मिळणार असते हे आधी कळले ( मी यात जन्मदिवस, पुण्यस्मरण याचे भडक शब्दबंबाळ फ्लेक्स यांचा विचार करत नाही आहे.. त्या जाहिराती म्हणजे कॉपीरायटिंग क्षेत्राला काळिमा आहे असे मला वाटते.) आता आपल्या कामाबद्दल अधिकच आदर मला वाटू लागला. जबाबदारीच भान आलं. माझा अभ्यास वाढला तसं माझ्या कामातलं वेगळेपण मलाही जाणवू लागलं. 

इकडे माझा कायद्याचा अभ्यास आणि पार्ट टाइम जॉब छान चालला होता आणि तिकडे ओळखीच्या, परिचयाच्या लोकांमध्ये माझ्या कामाबद्दल आणि त्याच्या स्वरूपाबद्द्ल कधीचाच “ध” चा “मा” व्हायला सुरुवात झाली होती. मी टाईपरायटिंग करते म्हणून अनेक लोकांनी मला नको नको ते सल्ले दिले होते. मी जेव्हा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना असा काही लिहायला नोकरी दिली जाते पटत नव्हते. खान्देश सारख्या थोड्या जुन्या वळणाच्या भागात हे सगळं नवीन होत आणि ते नवीन समजून घेताना आणि समजावून सांगताना रोज वेगवेगळे किस्से घडत होते, गमतीजमती घडत होत्या.. सगळं मजेशीर चाललं होतं. पगार किती, पॅकेज काय यापेक्षा मला मिळणारा अनुभव मला लाख मोलाचा वाटत होता. 

मी तीन वर्ष या क्षेत्रात काम केलं.. ५०० हुन अधिक लहान मोठ्या जाहिराती लिहिल्या. रेडिओसाठी जिंगल्स लिहिल्या. जाहिरात क्षेत्रातले इतर पैलू देखील समजून घेतले. खूप मजा आली हे सगळं करताना. पुढे अजून काही वेगळं करायचं म्हणून प्रसारमाध्यम क्षेत्रातच राहिले पण वृत्तपत्रात नोकरी धरली. त्यानंतर ऑनलाईन वृत्तपत्रात काम केलं. मी कायद्याचं जरी शिक्षण पूर्ण केलं असल तरी नंतर प्रसारमाध्यम आणि मार्केटिंग संबंधीत क्षेत्रातच करियर करायचा निर्णय घेतला तो माझ्या पहिल्या नोकरीतल्या अनुभवाचा जोरावर. 

आता मी मार्केटिंग मध्ये एमबीए करून डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करते. आज पहिल्या पगाराच्या तुलनेत कितीतरी पटीत उत्पन्न मिळत आहे. डिजिटल मार्केटिंग देखील अप्रत्यक्षपणे जाहिराती आणि कॉपीरायटिंगशी निगडित आहे असे माझे ठाम मत आहे. आज डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करताना ज्या भन्नाट कल्पना मला सुचतात, अगदी रोजच्या जगण्यात जेव्हा मी काही वेगळ्या कल्पना वापरते आणि कुणी त्यांचे कौतुक करतात तेव्हा मला लगेचच माझ्या ह्या पहिल्या नोकरीतल्या अनुभवांना थँक्स म्हणावेसे वाटते.

ह्या पहिल्या आगळ्या वेगळ्या नोकरीनेच माझ्या आयुष्याची आणि विचारांची दिशा बदलली.

- दीपिका अभिजीत कुलकर्णी


२ टिप्पण्या: