शिवण

धाव दोऱ्याच्या शिवणी सारखी 
एका रेघेत ठळक पावले टाकत गेलीस 
वाटेत चढ-उतार, घाट-वळणे आलीच नसतील?
कदाचित वामनाच्या पावलांसारखा 
तुझा आवाकाच मोठा असेल 
कदाचित म्हणूनच माझ्या मातीवर 
असा खोल ठसा उमटला असेल 
कदाचित माझ्याच मातीचा स्वभाव 
तसा कच्चा, भाबडा असेल 
किंवा कदाचित आपल्या नकळत 
आपणच तो सरळ रस्ता खोदला असेल 
तू अशी दुसऱ्या टोकाशी पाठमोरी उभी राहा 
शिवण उसवून आतलं बाहेर होणार नाही असं पहा 
मी माझ्या अंगणाच्या सीमारेषा आखून घेईन 
आखताना कदाचित हळव्या भेगांमध्येच बुडून जाईन














- जुई चितळे

1 टिप्पणी: