- सिंगापूरचा पाऊस -

सिंगापूरचा पाऊस तिथेच घर करून रहातो,
कधीही, कुठेही अवचित गाठतो.
काळ्याभोर रस्त्यावरून धावत सुटतो,
उंच उंच इमारतींवरून अलगद उडी मारतो.
नाईट सफारीत दबा धरून बसतो,
बर्ड्स पार्कमध्ये लपाछपी खेळतो.
सनटेकच्या कारंज्यात नशीब घेऊन उसळतो,
मर-लायनच्या तोंडातून अक्षरशः कोसळतो.
गणरायाच्या उत्सवात टाळ धरून नाचतो,
शब्दगंधच्या मैफलीत कविता होऊन भिजवतो.
सिंगापूरचा पाऊस आपुलकीने बोलावतो,
भावांच्या लाडाने, मुलीच्या प्रेमाने 
जावयाच्या अगत्याने,
मलाही ओलावतो.
सिंगापूरचा पाऊस मनात घर करून रहातो.
- प्रमोदिनी देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा