सर्वेऽपि सुखिनः सन्तु

“अयं बन्धुरयं नेति गणना लघुचेतसाम् | उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||”

हे हितोपदेशातील मूळ सुभाषित आहे. हा माझा, हा परका हा आप-परभाव कोत्या मनाच्या लोकांमध्ये असतो. ज्यांचे मन विशाल असते त्यांना सारे जग सामावून घेता येते. त्यांच्यासाठी पृथ्वी हे कुटुंब असते. 

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हल्ली जग जवळ आले आहे. लहान झाले आहे, चांगले जोडले गेले आहे असे आपण म्हणतो. वाहतुकीची साधने, पत्रव्यवहार, संगणक, दूरध्वनी, भ्रमण दूरध्वनी ह्यामुळे साता समुद्रापलीकडे असलेले आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या आपण सतत संपर्कात असतो. आपल्या जीवनातील घडामोडी, सुखदुःखे, चांगल्या-वाईट बातम्या कळविणे, अडीअडचणीला मदत मागणे हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. ऑफिसेसमधूनही टेलीकॉनद्वारे जगातील कुठल्याही देशात असलेल्या माणसांबरोबर काम करता येते. हल्ली घरबसल्या खरेदी-विक्री, बँकांचे व्यवहार, कुठल्याही विषयावर माहिती मिळवणे हे सर्व करता येते. आजकाल नोकरी-व्यवसायानिमित्त लोक वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्य करत आहेत. भिन्न भिन्न लोकांच्या संपर्कात येत आहेत. आपल्या देश-बांधवांसोबत तिथे नवीन विश्व निर्माण करत आहेत. शिवाय स्थानिक व इतर लोकांबरोबर भाषा, संस्कृती, सण-उत्सव, खाद्यपदार्थ यांची देवाणघेवाण करत आहेत. सिंगापूर याचे उत्तम उदाहरण आहे. भारतापासून आपण खूप दूर आहोत असे कधी वाटतच नाही. खास करून तरुण पिढी शिक्षणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशात जाऊन त्यांची दुनिया निर्माण करत आहे. आपले जीवन सोबती निवडून वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक होत आहे. तरीही मातृभूमीशी त्यांची नाळ जोडलेली आहे. ह्या गोष्टींचा विचार करता जग अतिशय जवळ आले आहे आणि अंतर कमी होऊन चांगले जोडले गेले आहे. 

पण हाच अर्थ 'वसुधैव कुटुम्बकम्' ह्या उक्तीचा आहे का? यापुढे जाऊन आध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार केला जाणे गरजेचे आहे. परमेश्वर किंवा परमात्मा सगळीकडे भरून राहिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांचा अंश आहे. आत्मा अमर आहे. शरीर हे तात्पुरते धारण केलेले वस्त्र आहे ज्याचा कधी ना कधी नाश ठरलेला आहे. असे आहे तर व्यक्ती व्यक्तीमध्ये फरक का केला जातो? जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जीवनाच्या मूलभूत गरजा भागून सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार आहे. पण प्रगत देशांमध्ये लोक ऐशारामात जगताहेत तर इतर देशात अन्नपाण्याविना मरताहेत. देशादेशांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे तंटे चालू आहेत. त्याचे रुपांतर युद्धात आणि पर्यायाने विनाशात होत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांचा उपयोग प्रत्येक माणसाच्या हितासाठीच झाला पाहिजे त्याच्या विनाशासाठी नाही. युद्धाचे परिणाम वाईटच असतात. त्यात कुणाचेच हित नसते. 

वर्णभेद, जातिभेद, वंशभेद, धर्मभेद, भाषाभेद सगळे भेदभाव विसरून माणसाने परस्परांच्या कल्याणाचा व सुखाचा विचार केला पाहिजे. जगातील सगळ्या देशांनी आपापसातले वाद, भांडणतंटे मिटवून परस्पर सामंजस्याने व सहकार्याने राहायला पाहिजे. महात्मा गांधींनी सांगितलेले अहिंसा हे तत्त्व अंगिकारले पाहिजे. मानवजातीला धोकादायक असलेल्या सर्व गोष्टी नष्ट केल्या पाहिजेत. एकच जागतिक सरकार व पृथ्वीवरील सर्व माणसे नागरिक असे होऊन जागतिक शांती प्रस्थापित होणे ही आदर्श संकल्पना 'वसुधैव कुटुम्बकम्' यामध्ये अभिप्रेत आहे. 
सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः |

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग भवेत् ||

असे जेंव्हा प्रत्यक्षात होईल तेंव्हाच 'वसुधैव कुटुम्बकम्' चे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल.

- गीता पटवर्धन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा