मराठी कवितेचे बेमिसाल त्रिकूट

मराठी कवितेचे बेमिसाल त्रिकूट

७०-७५ सालात मुंबईत आजच्या मानाने बरेच सोज्वळ असे सार्वजनिक गणपती उत्सव होत असत की काय अशी मला आजकाल शंका येते. कारण आम्ही आठवी-नववीतल्या मुली, वर बांधलेल्या वेण्या, रिबिनी वगैरे अवतारात उत्साहाने आपापल्या मैत्रिणींबरोबर किंवा रसिक हौशी आईवडिलांबरोबर रात्री साडेआठच्या सुमारास, कोपर्‍यावरच्या ब्राह्मण सेवा मंडळाच्या गणपती उत्सवातल्या कार्यक्रमाला जात असू. बाकी काय कार्यक्रम असतील नसतील पण कार्यक्रम पत्रिका जेव्हा पोस्टाने घरी येई तेव्हा त्यावर झडप घालून पहिल्यांदा आपण ज्याची वाट बघतोय तो कार्यक्रम याही वर्षी आहे ना, ते बघून तो दिवस पक्का लक्षात ठेवत असू.
मराठीतले तेव्हाचे आघाडीचे, सर्व मराठी काव्यप्रेमींचे लाडके असे तीन कवी एकत्र कविता वाचन करणार ! ही विलक्षण पर्वणी वाटत असे. इंटरनेटच्या जाळ्यात जग सापडण्यास अजून अवकाश होता. त्यामुळे घे लॅपटॉप, कर क्लिक आणि आण हवा तो कवी पडद्यावर अशी गुलामगिरीची अवस्था कवींवर ओढवलेली नव्हती.
मग ज्या दिवशी रात्री तो कार्यक्रम असे त्या दिवशी जर शाळेला सुट्टी असेल तर घरातच असतील नसतील ती या कवींची पुस्तके नुसतीच हाताळायची. तर कधी त्यांचे फोटोच न्याहाळायचे आणि "या जाड भिंगांमुळे यांचे डोळे जास्तच मिश्किल दिसतात', अशा सारखी टिपणी डोक्यात ठेवून मैत्रीण भेटली रे भेटली की खुसखुस सुरु करायची... दुसरे कवी कविता वाचत तेव्हा त्यांच्या जबड्याची एक विशिष्ट अशी हालचाल होई. त्यांच्या दाताची कवळी तर नसेल अशी काहीतरी आचरट शंका येऊन तिचे निरसन करायला कधी एकदा मैत्रीण भेटते असे होऊन जाई. तिसर्‍या कवींबद्दल आमचे खास बांधलेले अगदी शेरलॉक होम्स टाईप अंदाज होते. त्यांचे डोळे अतिशय स्वप्नाळू आणि भावुक दिसत तर ते खरेच तसे असतील का; का ते तसे दिसतात ते त्यांच्या चष्म्याच्या सुंदर सोनेरी फ्रेममुळे...? जर सुट्टीचा दिवस नसेल आणि शाळेत जावेच लागले तर शाळेत फार वेळ अभ्यासात वाया न घालवता, रात्री ज्या कवींना ऐकायचे आहे त्यांचा सर्व पंचनामा आम्ही शाळेतच पार पाडून मगच रात्रीच्या काव्य वाचनाचा आस्वाद घ्यायाला सज्ज व्हायचो.
कविता ऐकण्याची आणि जाताना मोगर्‍याची किवा चाफ्याची वगैरे फुले जवळ ठेवण्याची आमच्या घरी बहुदा कुणाला तरी सवय असावी. अशी फुले कुणीतरी आणून एकमेकांना वाटत असू. ब्राम्हण सेवा मंडळाची तशी बरीच प्रशस्त जागा बरीच भरून गेलेली असे. आम्हाला कवींना नुसतेच ऐकायचे नाही तर नीट पहायचेही असे. त्यामुळे आम्ही मुले मुसंडी मारून पुढच्या जागा मिळवण्यासाठी धडपडायचो. वडील नेहमीप्रमाणे "अहो, त्यात बघायचं काय? माईक आहेच ना', असे म्हणत सर्वात मागे त्यांचा कट्टा जमवायचे. स्टेज तसे बरेच उंचावर असे. त्याला काही साधेसुधे डेकोरेशन असे. स्टेजवर फक्त तीन खुर्च्या आणि एक उभा माईक. बस्स. कुणीतरी कार्यकर्ते माइकपाशी येऊन काहीबाही बोलायचे पण ऐकतो कोण? आमची तर आपापसात पैज लागलेली असायची की पहिली कविता म्हणणार कोण? मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर की वसंत बापट?
मग पुढचे दोन तीन तास कवितांचा धुवाधार वर्षाव होत असे. विंदा करंदीकर हातात माइक घेऊन सुरुवात करत...
"देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे...'. निसर्गाने मुक्त उधळलेल्या निरपेक्ष दानाचे सुक्त उच्चारत "घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे' असा शेवट झाला की श्रोते उचंबळून टाळ्यांचा कडकडाट करत. त्यानंतर "धोंड्या न्हावी...', "तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे...' अशा एकापेक्षा एक सर्वांच्या आवडत्या कविता येत. वरवर साध्या, हलक्या-फुलक्या वाटणार्‍या या कवितांमध्ये एकाच वेळी श्रोत्यांच्या ओठावर स्मित तर मनात खळबळ माजवण्याचे सामर्थ्य होते.
विंदाची सामाजिक कविता अतिशय अर्थगर्भ आणि विदारक असे. स्वतंत्र भारतात लोकशाहीचे जे धिंडवडे माजले त्यावर खेदपूर्ण अशी "सब घोडे बारा टक्के' ही कविता तर ते फार प्रभावीपणे वाचत.
"...जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी,
ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता
पुन्हा पुन्हा जुनाच वार, मंद घोडा अंध स्वार
याच्या लत्ता, त्याचे बुक्के, सब घोडे बारा टक्के …. !!'

कवीचे एकमेव शक्तिस्थान म्हणजे त्याचे शब्द. त्या शब्दब्रम्हाचे परिमाण सांगताना ते नवी उंची गाठत.
"...पाहिजेत शब्द सात्विक सोवळे, ओंगळ ओवळे
...विश्वाला आवळणारे, अणुला उचलणारे
गरोदर भाषेला लागतात डोहाळे सगुण शब्दांचे...!'

साधा धुवट लेंगा, खादीचा झब्बा, चपला अशा अगदी साध्या, शून्य स्टार व्हॅल्यु असलेल्या वेशात विंदा उभे राहत आणि अर्थगर्भ कवितेचे महाल लीलया उभे करत. त्यांच्या सर्वात भिडल्या आणि लक्षात राहिल्या त्या सामाजिक कविता. "झपताल'सारखी एखादी (प्रेमकविताच ती) , तिच्या वेगळेपणामुळे आवडली. या ज्येष्ठ, उत्तुंग प्रतिभेचे वरदान लाभलेल्या व्यासंगी कवीला कवितेच्या अफाट क्षितिजाची खोलवर जाणीव होती. या महासागरात आपले अगदी अल्प असे योगदान आहे असे ते नम्रपणे म्हणत. या जाणिवेचा पूर्ण अभाव असलेल्यांची आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणार्‍या कवींची संख्या कमी नाही. अशा कवीगणांना एक हलका चिमटा विंदानी "विरुपिकेत' काढला आहे. ही कविता तिच्यात लपलेल्या भेदकतेमुळे लक्षात राहिली आहे.
"तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे लघवी केली
आणि आपली उर्वरित वर्ष
त्यामुळे दर्याची उंची किती वाढली, ते मोजण्यात खर्ची घातली'

विंदा करंदीकर इंग्रजीचे प्राध्यापक होते हे माहित होते त्यामुळे त्यांनी काही इंग्रजी कविता लिहिली असेल तर...असं मनात येई; पण तसं कधी ऐकायला मिळाले नाही पण त्यांची शेक्सपीअर आणि तुकारामावर एक अप्रतिम कविता ऐकली आहे आणि ती कायमची स्मरणात राहिली आहे. त्या कवितेतल्या काही ओळी :
"...तुका म्हणे, ते त्वा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला.
विठ्ठल अट्टल, त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया.
शेक्सपिअर म्हणे, अरे तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले शब्दातीत
तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळाली...'

मग कवी मंगेश पाडगावकर कविता म्हणायला उभे रहात. त्यांच्या दाढीमुळे की काय पण त्यांचे व्यक्तिमत्व एखाद्या चित्रकारासारखे वाटे आणि खरोखरच एखाद्या निष्णात कॅरिकेचर्स करणाऱ्या चित्रकाराप्रमाणे त्यांची शब्दातली उपहासगर्भ कॅरिकेचर्स उमटू लागत.
"कोण्या एका कवीची भलतीच होती धमक, तो जुळावी यमाकामागून यमक
शेवटी लोक विटले, त्यांनी त्याला पिटले; तर तो म्हणे यशाचे माझ्या हेच गमक'
किंवा
"एक होता मुका, त्याने आधी केल्या फक्त दोन चुका
पहिली - लावून घेतला लग्नाचा ताप, दुसरी - तो झाला बाप
सध्या तो मुका - बायको धरून त्याच्या एकूण नऊ चुका'

पाडगावकरांची आणखी एक कविता जिची आम्ही वाट पाहत असू ती म्हणजे "सलाम'! त्यातील अभिव्यक्ती आणि मनोरंजकताच आम्हाला भावत असे का अधिक काही खोलवर डोकावून पाहता येई हे आता सांगणे कठीण! पण कुठेतरी आत काहीतरी झिरपत गेले हे खरे. भय आणि शोषण याचा पाया असलेली आपली दुर्दैवी समाजव्यवस्था; तिचेच खरेतर हे भयकारी चित्र...
" सबको सलाम - ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम - वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम
देवाचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्‍यांना सलाम - भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम
सामान्य माणसाची मौत सस्ती करणाऱ्या - सर्वाना सलाम...'

एका मागून एक शब्द आदळत राहायचे. कवितेच्या सुरवातीला काही हलका हशा पिकायचा आणि कविता संपे तेव्हा सुन्न असा सन्नाटा जाणवायचा.  पाडगावकरांच्या कवितेने माणूस महत्वाचा मानला. "कोलाहलात सार्‍या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी...' सामान्य माणसाचे उपेक्षित जगणे, पलायनवाद, पराभव सारे काही त्यांच्या कवितेने आपलेसे केले. याबरोबरच पाडगावकरांच्या प्रेम कवितेने, निसर्गकवितेने रसिकांना डोलावयास लावले. "दिवस तुझे हे फुलायचे', "शुक्रतारा मंद वारा', "मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे', "झाली फुले कळ्यांची झाडे घरात आली', "शब्दावाचून घडले सारे' अशा कितीतरी कितीतरी कविता ! त्यांचं कलंदरपण, जिप्सीपण मुक्त अशा भावकवितेतून श्रोत्यांपर्यंत पोहचत असे. त्या आनंदयात्रेचा घोष कानी पडू नये म्हणून घट्ट कान बंद करणार्‍यांचे मात्र त्यांना काही उमजत नाही.
"याचं असं का होतं काळात नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही
कसल्याही आनंदाला हे सदैव भीत असतात आणि एरंडेल प्यावा तसं आयुष्य पीत असतात'

बाकी मात्र "एक जिप्सी आहे माझ्या मनात खोल दडून...' असे म्हणत पाडगावकर रुक्ष जीवनाच्या साखळीत अडकलेल्यांना मुक्त आनंदयात्रेसाठी साद घालतात. "आयुष्य कसं जगायचं, सांगा, कण्हत कण्हत की गाणं म्हणत?' असा थेट प्रश्न करतात आणि "गाय जवळ घेते नि वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं' असा विश्वास आणि दिलासाही देतात. "दारी केशराचे मोर' झुलताना ज्याची पहाट उजाडते अन् "झर्‍यातून सतारीचे दिडदा सूर' ज्याच्या कानी बरसतात त्या आनंदयात्रीच्या प्रवासात काही पावलं त्याच्या मागे चालता आली ती त्याच्या कवितांचा हात धरुन. हे ऋण कसे फेडावे!
वसंत बापट - मराठी मातीवर मनापासून प्रेम करणारे कवी. राष्ट्र सेवादल, साने गुरुजी, ४२ची चळवळ याच्या प्रभावाखाली या कवीची जडणघडण झाली होती. त्याशिवाय संस्कृतचा उत्तम अभ्यास, स्वभावातील उमदेपणा, मिश्कीलपणा, प्रणय रंगाचे जिवंत हिरवे अंकुर अशा वेगवेगळ्या संपन्न छटा लाभलेली त्यांची कविता समृद्ध आणि रसरशीत असे. मग शरदाच्या सौंदर्याचे असेच रसरशीत रूप समोर प्रगट होई...
"शरदामधली पहाट आली तरणीताठी, हिरवे हिरवे चुडे चमकती दोन्ही हाती
शिरी मोत्यांचे कणीस तरारत खुलते आहे, खांद्यावरती शुभ्र कबुतर खुलते आहे...'
प्रणयरंग, नात्याची नवलाई, प्रीतीचा अन् मैत्रीचा दरवळ याने घुमारलेल्या कित्येक कविता! त्यांचा नादमय झुला श्रोत्यांना झुलवीत राही. "येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील', "अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते', "घन गर्द कदंबाखाली, अंधारा आली भरती', "सावळा चंद्र राधेचा, मावळला यमुनेवारती' ऐकताना वातावरण गहिरे गहिरे होऊन जाई.

वसंत बापटांचे व्यक्तिमत्व रंगभूमीवरील नटासारखे वाटे. कवितेचे सादरीकरण याबद्दल ते अधिक जागरूक असावेत असे वाटे. त्यामुळे कविता अधिक परिणामकारक होऊन श्रोत्यांपर्यंत पोचत असाव्यात. विफल प्रेमाची काहीशी आर्त करणारी एक कविताही ऐकली...
"तू बस म्हणालीस म्हणून मी बसलो, हसलीस म्हणून मी हसलो
बस्स इतकंच, बाकी मन जराही नव्हते थाऱ्यावर...'

कवी बापटांची एक सर्वांना आवडणारी आणि हमखास टाळी घेणारी कविता म्हणजे आगगाडीच्या "धकधक धकधक' या लयीने जाणारी "दख्खन राणी'...
"दख्खन राणीच्या बसून कुशीत, शेकडो पिल्ले ही चालली खुशीत
...निसर्ग नटला बाहेर घाटात, पर्वत गर्वात ठाकले थाटात...'

या कवितेचा ठेका, लय, त्यातल्या प्रतिमांचे विभ्रम सारे काही श्रोत्यांना पोटभर आनंद देई. कित्येकदा कवितावाचन ऐकून घरी परतताना अनेकांच्या मनात या कवितेचा ठेका आणि गम्मत ठाण मांडून बसलेली असे. अशीच एक अगदी तोंडात घोळत राही ती त्यांची एक अवखळ बालकविता "इत्तुक्का इवली चीत्तुक्का चिमणी'. आता खरं तर नीटशी आठवत नाही पण तेव्हा ऐकायला फार मजा वाटायची.
बापटांनी तरुण वयात स्वातंत्र्य चळवळीत निष्ठेने भाग घेतला पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची जी परवड झाली त्याने या सार्‍या देशभक्तीने भारावलेल्या मनांवर खोल आघात केले. त्याचे पडसाद त्यांच्या "सावंत'सारख्या कवितेत ऐकू येत आणि मनात घर करून रहात. "सावंत' या कवितेत त्यांच्या चळवळीतील एके काळचा साथी, कुणी एक वीर सावंत, खूप खूप वर्षांनी भेटलेला...
"सावंत...सावंतच नं तू? किती दिवसांनी भेटतोयस? अरे, स्वराज्य आले आणि जुने देखील झाले
...सिंहासने पुन्हा पुन्हा भरली आणि रिती झाली, मैफिलीत तुझा पत्ताच नाही...
खरं सांगतो हिवाळ्या पुलाखाली डायनामाइट पेरण्याची तुझी कल्पनाच ग्रेट होती
मोतीराम फितूर झाला नसता तर...
कसला पच्चकन थुंकला होतास तू त्याच्या नावावर, तो आता मंत्री झालाय...जग फार बदललं रे सावंत...'

वसंत बापटांच्या कवितेतले शब्दांचे पोत इतक्या विविध रुपात समोर येतात की थक्क व्हायला होते. एका तरुण स्त्रीच्या सौंदर्याचे गीत गाताना त्यांची रसरशीत कोमल कविता म्हणते:
"रंगाने तू गव्हाळ, त्यातून अंगावरती सोनसळा, टवटवीत घवघवीत मुखडा, चाफ्याचा जणू सोनकळा'
ते बाभूळ झाडाच्या अंतरंगात वृद्धत्वाची छाया बघतात तेव्हा त्यांचे शब्द वेगळाच पोत धारण करतात.
"वारा खात गारा खात, बाभूळ झाड उभेच आहे, अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा, टणक पाठ...'
बापटांमधला कवी खूपदा एखाद्या शाहिराचे रूप धारण करून येई. हा शाहीर होता एकदम मराठमोळा, अस्सल मराठी मातीशी नाते सांगणारा. सह्याद्रीच्या कड्यांशी आणि तुकोबाच्या अभंगांशी अगदी आतड्याचे नाते सांगणारा..
"भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजीन रायगडा
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला'

मराठी मातीचे, भाषेचे प्रेम व्यक्त करताना कवीला बदलत्या काळाचे भान आहे. झपाट्याने जवळ येणाऱ्या आणि ग्लोबल व्हिलेज बनू पाहणाऱ्या जगाचे भान ठेवत ते म्हणत:
"कळे मला काळाचे पाऊल द्रुत वेगाने पुढती पडे, कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकच उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी, मीही माझे बाहु पसरून अवघ्या विश्वाते कवळी'

पण म्हणून कोणी माझ्या अस्मितेवरच प्रहार करील तर...येथे कवीमधला लढणारा वीरगर्जना करतो...
"मात्र भाबड्या हृदयात, तेवत आहे जी ज्योत ती विझवाया पाहाल जो कोणी,
मुक्त करून झंझावात, कोटी कोटी छात्यांचा येथे, कोट उभारू निमिषात..'

जमलेल्या सार्‍या मराठी रसिकांची भरघोस दाद मिळे. आजही जगाच्या काना-कोपर्‍या सगळीकडे मराठी माणसांची एकत्र येऊन ती क्षीण ज्योत तेवती ठेवण्याची धडपड दिसते तेव्हा कवी वसंत बापटांचे शब्द मनात पुन्हा पुन्हा गुंजत राहतात.
कधी कधी कार्यक्रमाच्या शेवटी शेवटी त्यांची एक अगदी लोकप्रिय कविता "आम्ही जाणारच की कवातरी पटदिशी' ही ते अगदी मजेत सादर करत. पटदिशी जाण्याचा नुसता पुस्तकी अर्थच माहित होता पण तो अजून आमच्यापर्यंत पुरेसा भिडत नव्हता बहुतेक...पण कविता ऐकताना आईने डोळ्याला पदर लावलेला मात्र पाहिला होता.
" मैतरहो खातरजमा करू कशी, आम्ही जाणारच की कवातरी पटदिशी...
...दो हाती लुटली आणि लुटवली खुशी, आता जायचच की कवातरी पटदिशी...'

दोन्ही हातांनी लुटत आणि लुटवत या तीन कवींनी असे खूप काही दिले. हातचे न राखता देत राहिले, देतच राहिले. कवितेला त्यांनी अगदी आमच्या घरापर्यंत, मनापर्यंत चालवत आणले. कित्येक सजलेल्या सुसज्ज वाचनालयांनी किंवा "मुलांच्या मनात साहित्याची गोडी कशी निर्माण कराल' अशांसारख्या लेखमालांनी किंवा महागड्या बालशिबिरांनी जे कधी साधले नाही, ते साधले ते केवळ वर्षातून एकदा आमच्यासमोर दत्तात्रयाप्रमाणे प्रकट होणार्‍या या कवींच्या त्रिकूटाने!
मोहिनी केळकर

1 टिप्पणी: