- माझी आवडती कवयित्री : इंदिरा संत -

मराठी साहित्याचे तारांगण अनेक दिग्गज साहित्यिकांनी झगमगत आहे. या भव्य तारांगणातील अनेक तेजस्वी तारे आपल्या तेजाने तुमचे डोळे दिपवून टाकत असताना कोणी तुम्हाला विचारले की यातील तुम्हाला आवडणारा तारा कोणता, तर तुम्ही कसे पेचात पडाल, नाही? तशीच काहीशी आज माझी परिस्थिती झाली आहे. तरीही ‘ऋतुगंध’च्या ह्या लेखासाठी मी मला आवडणारी तेजस्वी तारका निवडली आहे ती म्हणजे 'इंदिरा संत.' ह्याचे कारण सांगायचे झाले तर लहानपणीच माझे "बाहुल्या" खेळायचे वय असताना "मेंदी"चा रंग माझ्या तळहातावर रंगला. तारुण्यात पदार्पण करताना हळूहळू लक्षात आले की आपण साहित्याची आवडती वाट सोडून "मृगजळाच्या"मागे पळत आहोत आणि मग हे समजल्यावर स्वतःला साहित्य वाचनाच्या नादात गुंतवून घेतले. "निराकार," "घुंगुरवाळा" वाचण्याच्या नादात मी ''रंगबावरी" कधी झाले माझे मलाच कळले नाही. साहित्याचा हा गर्भ "रेशमी शेला " हळुवारपणे लडिवाळ साहित्यिक ऊब देत गेला आणि त्या उबदार वातावरणात मला इंदिरा संतांच्या 'मारव्याचा 'सुगंध अक्षरशः वेड लावत गेला. मग मला इंदिरा संत ह्या महान कवयित्रीने घातलेले निसर्गाचे उखाणे जळी-स्थळी सुचू लागले. जसे की

आला शिशिर संपत
पानगळती सरली
ऋतू राजाची चाहूल
झाडावेलीला लागली.

मनाच्या दोलायमान स्थितीचे वर्णन कवयित्रीने किती सार्थपणे केले आहे. मनाचा पानगळतीचा ऋतू संपून म्हणजे नैराश्याचा मौसम संपून आता मनाला उभारी आणणारा ऋतुराज येत आहे. इथे कवयित्रीने निसर्गाच्या आड राहून आपल्या मनाचे खेळ अगदी अलगद साकार केले आहेत. तर कधी वसंताचे स्वागत करताना

कुहु गाऊन कोकिळ
करी वसंत स्वागत
तिलाही मी विनविते
शिकव ना मला गीत

कवयित्रीला कोकिळेसारखेच आपल्या मधुर कंठाने म्हणजे अतिशय रसभरित उत्कंठेने नवीन बदलाचे स्वागत करायचे आहे.

आता ह्या गुणी कवयित्रीच्या जन्माविषयी थोडेसे जाणून घेऊया. या निसर्गप्रेमी, संवेदनशील कवयित्रीचा जन्म ४ जानेवारी १९१४ ला बेळगावातील एका लहानशा गावी झाला. त्यांचे माहेरचे नाव इंदिरा दीक्षित. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या भावी पतीशी म्हणजे नारायण संत ह्यांच्याशी नियतीने त्यांची गाठ घालून दिली. दोघांनी मिळून त्यांच्या कविता 'सहवास' ह्या काव्यसंग्रहात प्रकाशित केल्या. दुर्देवाने १९४६ मध्ये त्यांचा पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या हातून पतिवियोग आणि प्रेमभरित कवितेची निर्मिती होत गेली. त्यांनी २५ पुस्तके लिहिली. प्रत्येक काव्यसंग्रहावर वेगळी कादंबरी लिहिता येईल.

आयुष्याच्या कठीण काळात सुरुवातीला त्यांनी प्रोफेसर म्हणून काम केले. नंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रिन्सिपलचे पद भूषवले. संत दाम्पत्याला तीन मुले झाली. त्यामधील एका मुलाने म्हणजे प्रकाशने चार पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांची नावे अनुक्रमे वनवास, शारदा, पंखा आणि झुंबर अशी आहेत. त्यांची धाकटी बहीण कमला फडके ही सुप्रसिद्ध लेखक - कादंबरीकार ना. सी. फडके ह्यांची पत्नी होती.

इंदिरा संतांना १९८४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्याशिवाय 'गर्भरेशमी' ला अनंत काणेकर पुरस्कार, जनस्थान पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले. सुरुवातीला उल्लेखिल्याप्रमाणे त्यांचे काही कविता संग्रह: शेले (१९५१), मेंदी (१९५५), मृगजळ (१९५५), रंगबावरी (१९६४), बाहुल्या (१९७२), गर्भरेशमी (१९८२), मालनगाथा, वंशकुसुम, मारवा, निराकार आणि घुंगुरवाळा आहेत.

इंदिरा संतांच्या ह्या कवितांच्या अद्भुत दुनियेतून सैर करताना आपण कुणी दुसरेच होऊन जातो.. 

अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर, आज घुमे का पावा मंजुळ
मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकुन अपुले तनमन

हे त्यांचे शब्द मनाला भुरळ घालून थेट मावळतीच्या चंद्राचे दर्शन देतात आणि पायाला पाण्याच्या रेशमी स्पर्शाच्या गुदगुल्या करतात.
विश्वचि अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधले थेंब सुखाचे
"हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव."

प्रेमाचे अनेक आविष्कार असतात. त्यापैकी एक कुब्जेच्या मुरलीधरावरील प्रेमाचा आविष्कार. त्याच्यावरील प्रेमापोटी ती विषाचा प्याला प्याली, असे कवयित्रीला म्हणायचे असेल का? किती सुंदर, तरल शब्द! मला त्यांची आणखी एक कविता आठवतेय.

उंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला
झोका चढता-उतरता, झाला पदर वारा वारा
झोक्याला देते वेग, पाय टेकून धरणीला
लाल मातीच्या परागाचा रंग चढतो पावलाला
झोका चढतो पूर्वेवर, जाईजुईंनी सावर

पुन्हा एकदा उत्कट शब्दांचा झुला त्या आपल्या समोर बांधत आहेत. त्या शब्दांच्या झुल्यावर झुलताना आपल्या पावलांना मात्र कवयित्रीच्या शब्दांचा गंध आणि रंग चढत आहे. तर वेळी-अवेळी कोसळणाऱ्या पावसाच्या धिंगाण्याला तोंड देताना एका गरीब स्त्रीची व्याकूळ परिस्थिती वर्णिताना कवयित्री म्हणते

नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली

इंदिरा संतांच्या कविता आपल्याला निसर्गाच्या समीप घेऊन जातात. त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला निसर्ग भेटतो. तसेच सख्याला भेटण्याची ओढसुद्धा त्यांच्या कवितेतून साद घालते. म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते
निसर्गाची रम्य रांगोळी
तू काव्यातून रेखाटली
अंतरीच्या मृदू बोलातून
सख्याला साद तू घातली
गर्भ रेशमी संस्कारातून
रसिक जनांची मने
तू जिंकली
स्मृतीस तुझ्या अभिवादन करुनी
मी थांबविते लेखणी
मी थांबविते लेखणी
- मोहना कारखानीस

३ टिप्पण्या:

  1. फ़ार सुंदर ! मी त्यानिच लीहिलेल्या कवितेचि वाट बघत आहे . सूरवातिच्या ओळी : . कुरकुरला मग पलंग किंचित , सोबतिस ते वेडे होते.. कुणी ही कविता पूर्ण लिहुन देईल का ?

    उत्तर द्याहटवा