'मी कशी? मी कोण?' - एक आगळी वेगळी आठवण

प्रत्येक माणूस हा चांगल्या वाईट गोष्टींचे एक अजब रसायन असतो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणूस बदलत असतो. आपल्या अवती - भवती बदलणाऱ्या परिस्थितीप्रमाणे कधी आपल्याला आपणहून बदलावे लागते किंवा तो बदल आपल्यात आपोआप घडतो. हा बदल सकारात्मक असेल तर आपण त्या बदलाचे स्वागत केले पाहिजे. आपल्यात असणारे गुण तर वेळीच ओळखून निगुतीने जपावेत. सर्व थोर संतांनी सांगून ठेवले आहे की वाईट ते सोडून द्यावे आणि चांगले ते धरून ठेवावे.

आता मुख्य विषयाकडे वळूया. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझी मलाच नव्याने ओळख होत गेली. माझ्या आयुष्यात मी मागे वळून बघितले तेव्हा जाणवले की वयाबरोबर, परिस्थितीप्रमाणे मी बदलले. परंतु आयुष्यात पुढे जाताना माझ्या स्वभावाचे काही ठळक विशेष जे लहानपणी किंवा काही वर्षांपूर्वी मला जाणवले नाहीत ते नंतर उलगडत गेले. मी कोण, मी कशी… हा प्रश्न कधी पडलाच तर लहानपणीच्या किंवा पूर्वीच्या काही आठवणी आपली ओळख पटवायला उद्युक्त करतात. स्वभावाचे काही पैलू डोळ्यासमोर येतात. ते चांगले की वाईट हे मी पुन्हा पुन्हा तपासून बघते.

अनेक प्रसंग आले. पण एक ठळक प्रसंग सांगते. त्या गोष्टीला खूप वर्षे झाली. त्या प्रसंगातून एक शिष्य म्हणून, एक विद्यार्थी म्हणून माझी मलाच नव्याने ओळख झाली. तसेच माझे आई बाबांशी असलेले नातेसंबध अधिक दृढ झाले. मी असेन सात आठ वर्षांची. मला वाचनाची आणि अभ्यासाची अतोनात आवड. शाळा सुरु व्हायच्या आधीच मला पाठ्यपुस्तकातील कविता आणि धडे तोंडपाठ असत. असो. त्यावेळी माझी अभ्यासातील प्रगती पाहून आईला वाटले मी चौथीची स्कॉलरशिप परीक्षा द्यावी. त्यावेळी मला त्या परीक्षेचे महत्त्व न कळता, काहीतरी नवे करायला मिळतेय, अभ्यासायला मिळतेय म्हणून उत्सुकता होती. आईने मला आमच्या जवळ राहणाऱ्या आण्णा मास्तरांची शिकवणी लावली. मास्तर सत्तरी ओलांडलेले. भलतेच कडक. त्यांच्या गंभीर चेहऱ्याकडे बघून मला घाम फुटलेला अजूनही आठवतो. मी नाखुशीनेच त्यांच्याकडे शिकायला जाऊ लागले. मला वाटायचे मास्तर कसे हसतमुख असावेत. कोणतीही गोष्ट हसत खेळत शिकवली तर आपल्या चांगली लक्षात राहते. परंतु हे मास्तर जवळच छडी घेऊन बसायचे. ती छडी बघून माझे अभ्यासात लक्षच लागत नसे.

मी अभ्यासात अतिशय वक्तशीर होते. कधी पहिला नंबर सोडला नव्हता. दिलेले कोणतेही गणित मी पटकन सोडवून दाखवत असे. असे असताना मास्तर माझे कौतुक न करता माझ्याकडे रागाने बघत. त्यामुळे मला समजेना माझे कुठे चुकतेय? नंतर लक्षात आले, मास्तरांनी दाखवलेल्या पद्धतीने गणित सोडवले तरच ते खुश होत. बाकीची मुले त्यांनी शिकवलेल्या पद्धतीचे काटेकोरपणे पालन करत. परंतु माझ्या मनाला ते पटत नसे. माझी गणित सोडवायची पद्धत वेगळी असली तरी ती बरोबर आहे अशी माझी ठाम समजूत होती आणि ती बरोबर असावी. कारण उत्तर अचूक येत असे. मी माझ्या मताशी ठाम राहिले आणि मास्तर रागाने लालेलाल होऊ लागले. माझा वारंवार पाणउतारा करू लागले. एकदा त्यांनी माझ्या आईला बोलावून घेतले.

"तुमची मुलगी ढ आहे. तिची अभ्यासात प्रगती होणे अशक्य आहे . मग तिला कधी स्कॉलरशिप मिळेल हे तर विसरूनच जा. " अशा शब्दात त्यांनी आईला समज दिली. आई बिचारी खूपच नर्वस झाली. मला तर हे ऐकून मास्तर हे कसे काय बोलतात तेच कळेना. अशा वेळी खरे तर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्यावर आपल्या आपुलकीची, मायेची चादर पांघरून त्यांना प्रोत्साहन द्यायचे असते एवढे मात्र मला कळत होते.

"मी ह्या मास्तरांकडे जाणार नाही" मी निर्वाणीचे सांगितले. यावर आई काय बोलणार? आईचा माझ्यावर जास्त विश्वास. (असे मला वाटले) . "तिला तिच्या पद्धतीने अभ्यास करू दे ." बाबा म्हणाले. झाले.… माझी चार दिवसांची शिकवणी अशा प्रकारे संपुष्टात आली. मी अभ्यास करत राहिले. आमच्या शेजारीपाजारी, नातेवाईकांमध्ये माझी शिकवणी हा एक खास करमणुकीचा विषय होऊन बसला. "मोहना, अण्णा आले बघ तुला बोलवायला." असे बोलून सगळे मला खिजवायला लागले. आईने परीक्षेचे नमुना पेपर माझ्यासाठी गोळा केले. मी सगळे पेपर मन लावून सोडवत होते. खूप आवडीने अभ्यास केला. बघता बघता स्कॉलरशिपची परीक्षा पार पडली. सुट्टी लागली. मी खेळण्यात दंग झाले. आणि एका संध्याकाळी माझा काका स्कॉलरशिपचा निकाल घेऊन आला. आल्या आल्या त्याने मला शाबासकी दिली. "ढ मुलीने चक्क स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवली. शिक्षकाचे भाकीत साफ चुकीचे ठरले." असे म्हणून सगळे खो खो हसू लागले. मला त्यातले काहीच न कळून मी पुन्हा खेळायला पळाले. मला ह्या घरात अण्णा हा विषय पुन्हा नको होता.

आज ह्या गोष्टीला खूप वर्षे लोटली आहेत. मागे वळून पाहताना मला अनेक गोष्टी नव्याने लक्षात येत आहेत.
एक म्हणजे माझा माझ्या अभ्यास करण्याच्या पद्धतीवर असलेला विश्वास आणि त्याचबरोबर आई बाबांनी माझ्यावर ठेवलेला भरवसा.
दुसरे म्हणजे शिक्षकांनी सगळ्यांच्या देखत मला ढ म्हटले तरी मी निराश न होता थक प्रयत्न आणि मेहनत करणे चालू ठेवले.
तिसरे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यश आणि अपयश ह्या दोन्ही परिस्थितीत मी निर्विकार राहिले.

- मोहना कारखानीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा