- कवी आणि कविता -

आमच्या एका मित्राने ३-४ मित्रांना सहकुटुंब सहपरिवार त्याच्या घरी जेवायला बोलवलं होतं. तसं ह्या मित्राकडे आम्ही आधी अनेकदा जेऊन आलो असू पण ह्या वेळची बात काही और होती असं जाणवलं. काहीतरी खास होतं खरं! पण आमचा यजमान मित्र थोडा गप्प गप्प होता. एरव्ही ह्याचा दंगा मुलांपेक्षा जास्त होत असे. आज एकीकडे उंची पार्टी आणि दुसरीकडे अशी शांतता, काही कळेनासं झालं. न राहवून शेवटी एकाने त्याला विचारलंच – “आज गप्प गप्प आहेस”. ह्या प्रश्नांची वाट बघत असल्यासारखा तो एकदम म्हणाला, “आज मला कविता झाली“. आम्ही सगळेच भूतकाळात गेलो. आमच्या ह्या मित्राच्या आजोबांना सगळेजण “काकाजोबा” म्हणत असत. ते उत्तम कविता करायचे. त्यांनी एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या सगळ्यांचा “कविता करा” असा छंदवर्ग घेतला होता. आठवडाभर विचार कसा मांडावा, यमक कसे जुळवावे, छंद-वृत्त ह्याचा ताळमेळ कसा राखावा हे छान समजावून सांगितलं आणि आम्हाला कविता करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आम्ही सगळ्यांनी आपापल्या परीने कविता करायचे प्रयत्न केले. काही जमले, काही फसले. छंदवर्गाचा शेवटचा दिवस आमच्या सगळ्यांच्या आजही पक्का लक्षात आहे. त्या दिवशी काकाजोबा म्हणाले होते, “आज तुम्हाला सगळ्यांना कवितेचं गुपित सांगणार आहे. कविता म्हणजे भावनांचा पूर! थांबवता न येणारा! संवेदनशील मनाला तीव्र भावनांचा अनुभव आला आणि जर त्या भावना शब्दरूप घेऊ शकल्या तर कविता होते. जर भावना ताकदवान असतील तर सगळे नियम, यमक, वृत्त ह्याला फारसं महत्त्व राहत नाही. असे ताकदवान भावनापूर्ण प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याला संधी द्या, त्याला शब्दरूप देण्याचा प्रयत्न करा, कदाचित एक कविता होऊन जाईल. आपल्या प्रत्येकामध्ये एक कवी असतोच; त्याला जागं करण्यासाठी प्रयत्न करा, कविता होण्यासाठी प्रयत्न करा, करण्यासाठी नको”.

त्या वयात सगळ्या शब्दांचा अर्थ कळला नाही पण काकाजोबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्यामुळे प्रत्येक शब्द लक्षात राहिला. जसजसे मोठे झालो तसतसा अर्थ उलगडत गेला. आम्हाला सगळ्यांना मैत्रीच्या बंधात ठेवणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्यातली एक म्हणजे काकाजोबांनी घेतलेला तो छंदवर्ग. पुढे गप्पांमध्ये अनेकदा ह्या विषयावर चर्चा झाली, आठवण काढली गेली. आम्ही बहुतेक सगळ्यांनी व्यवहार ह्या नावाखाली कविता होण्याचा प्रयत्न करणं सोडून दिलं होतं पण आमच्या यजमान मित्रानी कवितेचे प्रयत्न सोडले नव्हते. कदाचित ते त्याला बाळकडू मिळालं असावं. कविता वाचून दाखव असा आग्रह झाला की म्हणायचा, “छान जमली नाही अजून, जेंव्हा जमेल तेंव्हा वाचून दाखवीन”.

आज त्याने आपणहून कविता झाल्याचे सांगणे हे त्याला मनाजोगती कविता झाल्याचं लक्षण होतं. आम्ही त्याला कविता वाचून दाखवा असा आग्रह केला. खिशातून कागद काढून सुरवात करणार तोच आमच्यातला एक जण म्हणाला, “कविता कशी सुचली ह्यावर सांग ना थोडंसं”.

तो म्हणाला, “मागच्या आठवड्यात माझं आणि माझ्या बायकोचं जोरदार भांडण झालं. तसं बघितलं तर चूक माझीच होती पण मान्य कशी करणार? म्हणून वाद घालत राहिलो. शेवटी बायको रडायला लागली. माझा मुलगा हे सगळं बघत होता. त्याच्या आईला रडताना बघून त्याला राहवलं नाही आणि माझ्या अंगावर झेप घेऊन मला फटके-बुक्के मारायला लागला आणि ओरडला, “माझ्या आईला परत रडवलंस तर मी तुझ्याशी मोठ्ठी फाईट करीन.” एरव्ही तो असा कधी बोलत नाही पण ह्यावेळी त्याच्या भावना अतिशय स्पष्ट होत्या. केवळ आईला रडताना बघून तो आक्रमक झाला होता. मला आठवण झाली ती माझ्या लहानपणची. मी जेंव्हा माझ्या आईला पहिल्यांदा रडताना बघितलं तेंव्हा मलाही असंच वाटलं होतं की जो माझ्या आईला रडवेल त्याच्याशी मोठ्ठी फाईट करीन. आई ही कायम हसरीच दिसली पाहिजे. माझ्या मुलाच्या भावना लहानपणी कधी तरी मी ही अनुभवल्या होत्या आणि त्याच्या भावनांशी मी समरूप झालो. आणि..... आणि कविता झाली.”

“छान, मस्त आहे कल्पना, ऐकव...” मी म्हणालो.

डबडबलेले डोळे बघता,
वाटे तिला बिलगावे,
बनून ढाल तिच्या मानाची,
साऱ्या जगाशी लढावे.
पुसून आसवधारा,
दु:खं दूर करावे,
वाहून पदरी आनंद,
आयुष्य पायाशी वेचावे.

छान वाटली कविता! विषयही तसा मनाला भिडणारा होता आणि कुठे तरी काकाजोबांची आठवण येत होती. यजमान मित्र प्रयत्न करत राहिला होता, मुख्य म्हणजे भावनांकडे दुर्लक्ष करत नव्हता. काकाजोबांचे शब्द आठवत होते “ताकदवान भावनापूर्ण प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याला संधी द्या, त्याला शब्दरूप देण्याचा प्रयत्न करा, कदाचित एक कविता होऊन जाईल. आपल्या प्रत्येकामध्ये एक कवी असतोच त्याला जागं करण्यासाठी प्रयत्न करा, कविता होण्यासाठी प्रयत्न करा, करण्यासाठी नको”.
~ लेखक - विश्वास वैद्य








~ कवी – सौ. सई वैद्य

1 टिप्पणी: