माझे लग्न

मी कसे करावे लग्न?

नविन पत्ता, अनोळखी घर,
माझे स्वतःचे कसे वाटणार?
माझ्या बाबांसारखे लाड,
तिथे माझे कोण करणार?

आई शिवाय इथे काही सापडत नाही,
तिथे मी सगळ्यांना कसे सांभाळणार?
इतके वर्ष मनासारखे केले,
आता वेगवेगळ्या भूमिका कशा निभावणार?

प्रेम तर आहे त्याच्यावर खूप,
पण एवढा त्याग जमेल का?
चुका झाल्या छोट्या मोठ्या,
तरीही तो तेवढंच प्रेम करेल का?

मी का करावे लग्न?

आत्ताच आयुष्यात आला तो,
कसा मला खुश ठेवणार?
ना माहीत आवडी-निवडी, न माहिती स्वभाव,
कसा माझ्या ईच्छा तो पुरवणार?

आत्ताच तर माझ्या आई-बाबांना जाणण्याची,
मला समज आली आहे,
आत्ताच तर त्यांची आई बनण्याची,
माझी वेळ आली आहे.

थोडासाच आवडतो मला तो,
मग का लग्नाचा लाडू खाऊ?
हव्याशा त्या चंद्रासाठी,
माझे घर का सोडून जाऊ?

का मी करावे लग्न?

सासू-सासऱ्यांच्या कौतुकात मला,
आई-बाबांची माया मिळेल,
दीर-नणंदेच्या गोड नात्यात,
बहीण-भावाची छाया दिसेल. 

नवीन घराच्या भिंतींमध्ये,
मला नवी नाती सापडतील,
हळू हळू हे सर्व बदलही,
मला आपलेसे वाटतील.

निरागस मनाला नेहमी वाटायचे
लग्न हवे-हवेसे,
एका राजकुमाराचे चित्र रेखाटायचे
स्वप्न नवे-नवेसे!

साडी, बांगड्या अन मेंदीची,
आवड होती सदा,
हळू हळू मोठी झाले मी,
ऐकता सुंदर प्रेमकथा. 

आत्ता कुठे माझ्या अल्लड मनाला,
लागली त्याच्या येण्याची चाहूल. 
मग लहानपणीच्या स्वप्नांसाठी,
ठेऊ का मी मंडपात पाऊल?

सर्वात चांगला, माझा जोडीदार असेल,
कारण मित्र तर झाला तो, 
जरी आत्ताच आयुष्यात आला असेल,
आयुष्य माझे बनला तो. 
हो...हो, मी करणार ना लग्न!


- अनुष्का  कुलकर्णी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा