तो आणि ती

शाळा कॉलेजचे सोनेरी दिवस कधी संपतात कळत नाही. मंतरलेले दिवस असतात ते ...... या मंतरलेल्या दिवसात मैत्रीची पाळेमुळे घट्ट होतात.या मैत्रीतून काहींना आयुष्यभराचा जोडीदार मिळतो. असा जोडीदार जो मनपसंत असतो, मग काय सुरुवातीचे सहजीवन स्वर्ग सुखाची अनुभूती देतं. हे दिवस मनाच्या गाभाऱ्यात कायमस्वरूपी कोरले जातात. पण सगळ्यांना मैत्रीतून जोडीदार मिळत नाही; मग चहा पोह्यांच्या कार्यक्रमातून जोडीदाराची निवड केली जाते. हल्ली त्याचंही रूप बदलत आहे, आधी मुलगा मुलगी गाठी भेटी घेऊन एकमेकांना जाणून घेऊन मग नव्या नात्यावर शिक्का मोर्तब करतात.

निसर्गात हर प्रजातीमध्ये नर-मादी आढळतात आणि निसर्ग नियमाप्रमाणे ठराविक काळानंतर आपला जोडीदार निवडून सहजीवन सुरु करतात. मानवही याला अपवाद नाही परंतु मानवाला देवाने दिलेली वाचा आणि बुद्धी यामुळे त्याचे जोडीदारा बरोबरचे सहजीवन हेवेगवेगळ्या प्रसंगातून "कधी बहर---कधी शिशिर " या ओळींचा प्रत्यय घेत पुढे सरकत जाते. आपल्याकडे "लग्न" या संस्काराने सहजीवनाची सुरवात "पूर्वी " व्हायची. "पूर्वी" शब्दामुळे चमकलात ना? म्हणजे अगदी "पूर्वी" म्हणण्याइतकी वेळ आलेली नाही पण " लिव्ह इन रिलेशन" या नव्या नात्याने सहजीवनाच्या समाजमान्य पद्धतीमध्ये वेगाने आक्रमण केले आहे आणि हळूहळू या नव्या नात्याला समाजाने स्वीकारायला सुरवात केली आहे.

कुठल्याही प्रकाराने सहजीवन सुरु केले तरी एकमेकाविषयी असलेला आदर, प्रेम, समजूतदारपणा व परस्परांबरोबर आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी यावर हे नाते रुजते, फुलते आणि बहरत जाते. हल्ली आजूबाजूला विभक्त होणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. धकाधकीचं जीवन, कामातली स्पर्धा, जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा याचा परिणाम सहजीवनावर दिसू लागला आहे. सुरवातीचे रंगबिरंगी आयुष्य का बरं बेरंगी होतं?,नातं टिकविण्यासाठी लागणारा संयम कमी झाला आहे की तो आम्ही मुलांना वाढवताना पेरायला विसरतो आहोत. सगळंच इन्स्टंट हवं आहे, २ मिनिट लाईट गेले, नेट थांबलं, रांगेत उभं राहावं लागलं की लगेच अस्वथ होणारी मंडळी पहिली की लक्षात येतं श्रद्धा आणि सबुरी याचे बाळकडू लहानपणापासून देणे आता गरजेचे होणार आहे.

लग्न झाल्यावर मी माझ्या नवऱ्याबरोबर गल्फला गेले तेंव्हा मी भारतातल्या गजबजलेल्या जीवनाला खूप "मिस" करायचे, माझ्या मनाची अवस्था माझ्या नवऱ्याला मी न सांगता कळायची, मला "लॉन्ग ड्राईव्ह" ला न्यायचा, त्याच्या व्यस्त दिनक्रमात मला आठवणीने फोन करायचा. पुढे मुलीला घेऊन आम्ही सिंगापूरला गेलो. तिच्या संगोपनात माझ्या बरोबरीने त्याने दिलेली साथ खूप महत्त्वाची वाटते. सहजीवन म्हणजे काही ठरवलं होतं का मी? किंवा कोणीच ठरवून त्याप्रमाणे आयुष्य घालवत नाही. एकमेकाबरोबर राहता राहता स्वभाव, आवडीनिवडी कळायला लागतात, अगदी एका सारख्या आवडी निवडी असू शकत नाहीत, पण सहवासाने वाढत जाणारे प्रेम मुरड घालायला शिकवतं. कधी त्याच्या आवडीप्रमाणे तर कधी तिच्या आवडीप्रमाणे नकळत वागताना किंवा काही करताना त्रास होत नाही. आपल्या जोडीदाराविषयी कौतुकाने बोलणाऱ्या बायका किंवा पुरुष पाहिले की लक्षात येत "लग्न"रुपी लोणचं मुरायला लागलं आहे.

मी काही मोडलेले डाव पण बघितले आहे. मोडलेल्या डावाचे दुःख, एकट्यावर पडलेली जबाबदारी पाहिली की वाटतं अशी वेळ कोणावर येऊ नये. माझ्या १/२ मैत्रिणीचे घटस्फोट झाले आहेत, कारणं वैयक्तिक आहेत, ८/९ वर्ष झाली त्या एकट्या राहात आहेत, पण हल्ली त्यांना परत दुसरा जोडीदार असावं असं वाटायला लागलं आहे. मैत्र-मैत्रिणी, नातेवाईक सगळे असले तरी कोणीतरी आपलं असावं असं त्यांना वाटायला लागलं आहे. सगळे असूनही जोडीदाराची का बरं गरज भासावी? शेवटी आजूबाजूच्या प्रत्येकाला आपलं आयुष्य असतं,मग काही सांगायला, बोलायला अगदी रडायला तरी कोणी तरी आपलं हक्काचं माणूस हवं ही भावना जागी व्हायला लागली आहे. डाव पुन्हा मांडणं सोपं नाही याची जाणीव त्यांना आहे. पण कठीणही नक्कीच नाही.

आज माझ्या आजूबाजूला असलेल्या वृद्ध जोडप्याचं सहजीवन पाहतांना जाणवतं की आयुष्य जसं वार्धक्याकडे झुकू लागतं तसतशी जोडीदाराची सोबत महत्त्वाची ठरते. मुलं आपापल्या मार्गाला लागलेली असतात, आयुष्याच्या सुरुवातीला धावपळीत काही राहून गेलेले छंद आता पूर्ण करायला वेळ असतो. वेगवेगळी पुस्तक वाचायला,चांगला सिनेमा, नाटक पाहायला व त्याचे समवयस्क मंडळी बरोबर रसग्रहण करायला वेळ असतो आणि हे सगळं करणारी जोडपी पहिली की जाणवत जोडीदारची गरज आयुष्याच्या संध्याकाळी किती महत्त्वाची असते. एकमेकांच्या आजारपणाने काळजीत पडणारी, एकमेकाला जपणारी, जोडीदाराविषयी भरभरून बोलणारी आजूबाजूची वयोवृद्ध मंडळी जोडीदाराची साथ किती महत्वाचं आहे याची जाणीव करून देतात.

"तो आणि ती" ची निर्मिती निसर्गाने सर्व प्रजातींमध्ये केली आहे, परिपूर्ण घरं ही सुसंकृत समाज घडवायला मदत करतात. दिवसेंदिवस प्रगत होणाऱ्या मानवाने इतर प्रजातीप्रमाणे या निर्मितीचा मान राखून सामाजिक तसेच नैसर्गिक समतोल साधून सुसंकृत "समाज " बांधणीचे काम करणे गरजेचे आहे."तो आणि ती" या दोघांच्या हातात सुखी संसाराची, आनंदी आणि सुसंकृत समाजाची जबाबदारी आहे. त्याने तिला आणि तिने त्याला समजून घेतले तर "अवघा रंग एक झाला" ही अनुभूती नक्कीच होईल. 


- हेमांगी वेलणकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा