प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ७ - "रोमानी" लोकांची रोमांचकारी कहाणी

मागील भागात आपण प्राचीन भारतीय संस्कृतीबरोबरचा पूर्व आशिया आणि आग्नेय आशिया खंडातील प्रवास पूर्ण केला. आता आपण भारतीय संस्कृतीच्या पश्चिमी जगतातील सफरीवर निघणार आहोत.

पण त्यापूर्वी मी तुम्हाला 'रोमानी' जनसमुदायाची रोमांचकारी कहाणी सांगणार आहे. साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आले असणार. कोण हे 'रोमानी' लोक ? त्यांचा भारतीय संस्कृतीशी काय संबंध? थोडा धीर धरा. या भागात तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

'बंजारा' समाजातील स्त्री-पुरुषांची चित्रे, छायाचित्रे आपण पाहिलीच असतील. आपल्यापैकी काही प्रवासी लोकांनी कदाचित यांना प्रत्यक्ष पाहिलेसुद्धा असेल. राजस्थान, उत्तर गुजरात आणि सौराष्ट्र, पश्चिम मध्यप्रदेश, आणि काही प्रमाणात महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात भटके विमुक्त म्हणून हे लोक समाजात अत्यंत खालच्या स्तरातील समजले जातात. काही प्रमाणात गुन्हेगारीशीसुद्धा आपण यांचा संबंध जोडतो. आपल्यापैकी ज्यांना या समाजाबद्दल जास्त माहिती नाही, त्यांनी कमीत कमी या समाजाचे अत्यंत हास्यास्पद चित्रण हिंदी चित्रपटांमधून तर नक्कीच पाहिले असेल.

पण याच बंजारा समाजाचे आणि उत्तर पश्चिम राजस्थान (कच्छचे रण - सध्याचे राजस्थान आणि पाकिस्तान मिश्र), पश्चिम पंजाब, उत्तर-पश्चिम सौराष्ट्र, मध्यप्रदेश मधील दलित विमुक्त समाजाचे (डोंब - डोम - डोंबारी - रोमा -रोमानी) वंशज संपूर्ण जगभरात, जवळजवळ १० ते १२ दशलक्ष संख्येने रोमा, रोमानी, सिन्ति (सिंधी), जिप्सी, मानुष, काले, जीतानो अशा नावांनी पसरले आहेत, आणि जवळजवळ दीड हजार वर्षे अनन्वित अत्याचार सहन करूनही त्यांनी आपली भाषा आणि प्राचीन रीती-रिवाज टिकवून ठेवले आहेत, हे आपल्याला माहिती आहे का?

रशियासह संपूर्ण युरोपमध्ये अंदाजे ८ दशलक्ष (ठळकपणे रोमानिया - २.५ दशलक्ष, स्पेन - ८ लक्ष, तुर्कस्तान - ५ लक्ष, बाल्कन देश - ३ दशलक्ष, रशिया - ४ लक्ष, हंगेरी - ६ लक्ष, जर्मनी - २ लक्ष, फ्रांस - ३ लक्ष) तसेच अमेरिका आणि कॅनडा - १.२ दशलक्ष, ब्राझील - ८ लक्ष, शिवाय साउथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अशा देशांमधून ते अल्पसंख्य नागरिक म्हणून वास्तव्य करून आहेत.

ख्रिस्त पश्चात आठव्या ते अकराव्या शतकापासून या लोकांनी भारतातून पश्चिमेकडे स्थलांतर करायला सुरुवात केली असे काही मानववंश शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. गुरे आणि शेळ्यामेंढ्या राखणे, कसरतीचे खेळ करणे, पडतील ती मोलमजुरीची कामे करणे, फासेपारध करणे आणि पाले ठोकून भटके वास्तव्य करणे अशी जीवन पद्धती असलेल्या या लोकांनी हळू हळू अफगाणिस्तान, इराण, इराक, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकिस्तान, बिझेन्तीन साम्राज्य, अल्बेनिया, तुर्कस्तान, आर्मेनिया, रशिया, ग्रीस असे करत करत चौदाव्या ते पंधराव्या शतकापर्यंत युरोपपर्यंतची मजल पूर्ण केली. काही वेळा आपणहून, तर काही वेळा आक्रमक राज्यकर्त्यांबरोबर गुलाम म्हणून!

या सर्व काळात त्यांच्यावर जागोजागीच्या लोकांनी अनन्वित अत्याचार केले. मुळात शिथिल धर्मबंधन असलेल्या या 'रोमानीं'नी काळाच्या गरजेनुसार आणि अत्याचारापासून बचाव म्हणून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मांचा स्वीकार केला असला तरी आपले जुने रिती-रिवाज टिकवून ठेवले. आजही ते आपल्या भारतीय भाषांशी साधर्म्य असलेली 'इंडो-जर्मन' भाषासमूहातील 'रोमानी' भाषा बोलतात.

युरोपमध्ये प्रथम त्यांना इजिप्तमधून आलेले म्हणून 'जिप्सी' (इजिप्ती - जिप्सी) संबोधले गेले. पण अठराव्या शतकातील संशोधकांनी या 'रोमानी' लोकांचे भारतीयांशी असलेले साधर्म्य लक्षात घेऊन त्यांचे मूळ भारत आहे असे सिद्ध केले. आता तर जनुक-विज्ञानानेही हे सिद्ध केले आहे.

त्यांच्याच भाषेतील शब्दानुसार फ्रांसमध्ये त्यांना 'मानुष' संबोधतात, तर काही युरोपीय देशांमध्ये त्यांना 'सिन्ति (सिंधी) तर 'काले' (काळे?) असेही म्हणतात.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींनी ज्युंबरोबर या रोमानी लोकांवरही खूप अत्याचार केले आणि त्यांचा अमानुष संहारही केला. आता सर्व युरोपीय देशांमध्ये त्यांना अल्पसंख्य नागरिक म्हणून मान्यता मिळाली असून त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकात हे रोमानी लोक अमेरिका, कॅनडा, ब्राझील, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या देशांतसुद्धा जाऊन पोहोचले. परंतु आजही रोमानी हे बहुतांश दारिद्र्य रेषेच्या खालील निर्वासित याच पद्धतीने राहतात.

या सर्व धुमश्चक्रीमध्ये 'रोमानीं'नी आपली वेगळी ओळख, एक वेगळे (अस्तित्वात नसलेले) राष्ट्र, स्वतःचा वेगळा ध्वज, स्वतःचे राष्ट्रगीत सुद्धा जोपासले आहे. नवशिक्षित रोमानी तरुण आता मोठ्या संख्येने एकत्र येउन आपल्या समाजाच्या पुनर्वसनासाठी आणि प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांचे राष्ट्रगीत पुढील प्रमाणे –

"ग्येलेम, ग्येलेम, लोन्गोने द्रोमेंसा
मालादिलेम बाख्ताले रोमेंसा
ओ रोमाले, कातार तुमेन आवेन?
ए त्सारेंसा, बाख्ताले द्रोमेंसा
ओ रोमाले,
ओ छावाले,
वि मानसा सु बारी फामिलिया,
मुदारदाला ए काली लेगीया
आवेन मानसा सार ए लुम्न्यात्से रोमा
काई फुताईले ए रोमाने द्रोमेंसा
आके विरामा , उस्ति रोम आकाना
आमेन खुदासा मिस्तो काई केरसा
ओ रोमाले
ओ छावाले"

आणि त्याचे इंग्रजी भाषांतर पुढील प्रमाणे:

I travelled, travelled long roads,
Everywhere meeting happy Romanis.
Oh Romanis, where do you come from?
With tents on this happy road?
Oh Romanis,
Oh my boys.
Once I had a great family,
But they were killed by the Black Legion;
Come with me, all Romanis of the world,
Help swell the Romani roads.
Now is the time, rise up Romanis,
We will rise high through action.
Oh Romanis,
Oh my boys!

अशी आहे भारतीय वंशाच्या 'रोमानी' लोकांची चित्तथरारक कहाणी!












निरंजन भाटे




1 टिप्पणी: