संक्रमण


आकाशातल्या असंख्य चांदण्यांकडे पाहून मी ओठाचा चंबू करून आजोबांना विचारले,

“आजोबा, ह्या चांदण्या कोणाच्या आसतात हो?”

“अरे, ह्या चांदण्या देवबाप्पाच्या आसतात. माणूस देवाघरी गेला ना की देवबाप्पा त्याची एक चांदणी
बनवतो.” आजोबांनी डोळे मिचकावत सांगितले.

“मग चांदोबाचे काय?” माझा प्रश्न

“अरे, चांदोबावर देवबाप्पा राहतो … ” आणि आजोबांनी उत्तर खूप खूप रंगविले.

किती रंगविले ते आज नीट आठवत नाही.

पण आज आकाशातल्या असंख्य चांदण्यांपैकी एक असलेले आजोबा जेंव्हा ओठाचा चंबू करून डोळे

मिचकावतात, तेंव्हा मी एक गोष्ट मनाशी पक्की बांधतो.

उद्या हीच गोष्ट माझ्या मनूला सांगायची. तो ती जपून ठेवेलच. चांदण्या कितीही वाढल्या तरीही … !

चांदण्या कितीही वाढल्या तरीही … !

समीर इनामदार 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा