श्री समर्थ रामदास आणि श्रीमत् दासबोध


श्री समर्थ रामदास आणि श्रीमत् दासबोध
श्री संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना करून मराठी भाषेला एक अत्युच्च परिमाण दिले तर "ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झालासे कळस' हे सर्वश्रुत आहेच! त्याच बरोबर श्री समर्थ रामदासांचे मराठी काव्य-साहित्य आणि मराठी संस्कृतीची जडण-घडण यातील योगदान अतुलनीय आणि अजरामर आहे . समर्थ रामदास हे आज आपल्यासाठी नुसतेच आदरणीय नाही तर देवतुल्य व्यक्तिमत्व ठरले आहे.
प्रचलित भाषेत समर्थांच्या "साहित्यिक' कारकीर्दीचा आढावा घ्यायचा म्हंटला तर ओव्या, अभंग, भारुड, निरुपण, भूपाळ्या, आरत्या आणि स्तोत्रे असे अनेक काव्य प्रकार त्यांनी लीलया हाताळले. त्यांची ओघवती रसाळ शब्दरचना एखाद्या मृदू जलधारेप्रमाणे आपले तनमन पुलकित करून जाते आणि आपले जीवन ज्ञान-प्रकाशमय देखील करते.
"सुखकर्ता दुखहर्ता' म्हणताना जो मंगलमय आणि आश्वासक भाव आपल्या मनात दाटून येतो त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. करुणाष्टके म्हणताना आपण नुसते नादलहरींमध्ये गुंगून जात नाही तर नकळतच परमेश्वरचरणी लीन होऊन पूर्ण शरणागतीचा अनुभव घेतो. मनाचे श्लोक वाचताना आपला आत्मा खडबडून जागा झाला नाही तरच नवल...पण ग्रंथराज श्रीमत् दासबोध हा त्यांच्या साहित्यरचनेचा मेरुमणी आणि मराठी अस्मितेची मुळे बळकट करणारा अजरामर ग्रंथ आहे यात शंकाच नाही!
तत्कालीन बोलीभाषेशी जवळीक असलेली शब्दरचना, भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि अध्यात्म अशा गहन विषयांची अत्यंत सोप्या व सामान्यजनांना समजेल अशा भाषेत केलेली मीमांसा, सोप्या उदाहरणांनी उलगडून दाखविलेला त्यांचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध आणि काळाच्या पुढे असलेला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोण ही दासबोधाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचमुळे ग्रंथश्रेष्ठ श्री दासबोध हा आधुनिक व्यवस्थापन शास्त्रासाठी संदर्भ ग्रंथ ठरणारा कालातीत आणि अमूल्य असा ग्रंथ आहे असे मला वाटते.
दासबोध खरं तर एखाद्या जादुगाराच्या पोतडीप्रमाणे आहे - ज्याने त्याने त्याला पाहिजे ते घ्यावे!
कुण्या अभ्यासू प्रबंधकाराने ग्रंथ कसा असावा याचा परिपाठ घ्यावा.
जेणे होये उपरती || अवगुण पालटती ||
जेणे चुके अधोगती || त्या नाव ग्रंथ ||
जेणे परत्रसाधन || जेणे ग्रंथे होये ज्ञान ||
जेणे होईजे पावन || या नाव ग्रंथ ||
कुण्या विद्यार्थ्याने सुंदर अक्षर कसे असावे त्याचे धडे घ्यावे!
वाटोळे सरळे मोकळे || वोतले मसीचे काळे ||
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे || मुक्तमाळा जैशा ||
अक्षरमात्र तितुके नीट || नेमस्त पैस काणे नीट ||
आडव्या मात्र त्याही नीट || आकुर्ली वेलांड्या ||
पहिले अक्षर जे काढिले || ग्रंथ संपेतो पाहत गेले ||
एका टाकेचि लिहिले || ऐसें वाटे ||
अक्षराचे काळेपण || टाकाचे ठोसरपण ||
तैसेचि वळण वाकण || सारिखेचि ||

सामाजिक व्यवहार, मूल्ये आणि शिष्टाचार यांचे अतिशय मार्मिक मार्गदर्शन श्री रामदासांनी या ग्रंथात केले आहे.
विचारेविण बोलो नये || विवंचनेविण चलो नये ||
मर्यादेविण हलो नये || काही एक ||
प्रीतीविण रुसो नये || चोरास वोळखी पुसू नये ||
रात्री पंथ क्रमू नये || येकायेकी ||
जनी आर्जव तोडू नये || पापद्रव्य जोडू नये ||
पुण्यमार्ग सोडू नये || कदाकाळी ||
निंदाद्वेष करू नये || असत्संग धरू नये ||
द्रव्यदारा हरू नये || बळात्कारे ||
वक्तयास खोडू नये || ऐक्यतेसी फोडू नये ||
विद्याभ्यास सोडू नये || काही केल्या ||
तोंडाळासी भांडो नये || वाचाळासी तंडो नये ||
संतसंग खंडू नये || अंतर्यामी ||
अति क्रोध करू नये || जिवलगांस खेदू नये ||
मनी वीट मानू नये || सिकवणेचा ||
क्षणोक्षणी रुसो नये || लटिका पुरुषार्थ बोलो नये ||
केल्याविण सांगो नये || आपला पराक्रमु ||

त्यांनी सांगितलेल्या शिकवणीचे आपण काही अंशी जरी पालन करण्याचा प्रयत्न केला तरी समाजात आपण एक समतोल, सन्माननीय आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व ठरून जाऊ यात मला तरी शंका वाटत नाही.
आजच्या आपल्या कार्यव्यस्त आणि कार्यप्रधान जीवनशैलीमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन आपल्याला दासबोधात आढळेल. ‘Interpersonal Skills’, ‘Team-playing’, ‘Change management’ हे नवीन व्यवस्थापन शास्त्रामध्ये परवलीचे शब्द झाले आहेत. आपल्या कार्यस्थानी आपला अहंकार आड येऊ न देता निर्णय कसे घ्यावे, बदलांना सामोरे कसे जावे, संघसमन्वयामध्ये (Team-playing) आपले वर्तन कसे असावे याचे उत्तम मार्गदर्शन आपल्याला दासबोधात मिळू शकते.
विरक्ते समय जाणावा || विरक्ते प्रसंग वोळखावा ||
विरक्त चतुर असावा || सर्व प्रकारे ||
विरक्ते येकदेसी नसावे || विरक्ते सर्व अभ्यासावे ||
विरक्ते अवघे जाणावे || ज्याचे त्यापरी ||
विरक्ते असावे नित्यमुक्त || अलिप्तपणे ||
विरक्ते शास्त्रे धांडोळावी || विरक्ते मते विभांडावी ||
विरक्ते मुमुक्षे लावावी || शुद्धमार्गे ||
विरक्ते शुद्धमार्ग सांगावा || विरक्ते संशय छेदावा ||
विरक्ते आपला म्हणावा || विश्वजन ||
विरक्ते निंदक वंदावे || विरक्ते साधक बोधावे ||
विरक्ते बद्ध चेतवावे || मुमुक्षनिरूपणे ||
विर्कते उत्तम गुण घ्यावे || विरक्ते अवगुण त्यागावे ||
नाना अपाय भंगावे || विवेकबळे ||

समाजकारण आणि राजकारण ही कार्यक्षेत्रे असेल्या व्यक्तींनी कसे आचरण करावे याचे सुंदर विवेचन दासबोधात समर्थांनी केलेले आहे.
फड नासोचि नेदावा || पडिला प्रसंग सावरावा ||
अतिवाद न करावा || कोणियेकासी ||
दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे || बहुतांचे बहुत सोसावे ||
न सोसे तरी जावे || दिगंतराप्रती ||
दुःख दुसऱ्याचे जाणावे || ऐकोन तरी वाटून घ्यावे ||
बरे वाईट सोसावे || समुदायाचे ||
अपार असावे पाठांतर || सन्निधचि असावा विचार ||
सदा सर्वदा तत्पर || परोपकारासी ||
शांती करून करवावी || तऱ्हे सांडून सांडवावी ||
क्रिया करून करवावी || बहुतांकरवी ||
करणे असेल अपाये || तरी बोलोन दाखऊ नये ||
परस्परेचि प्रत्यये || प्रचितीस आणावा ||
राजकारण बहुत करावे || परंतु कळोच नेदावे ||
परपीडेवरी नसावे || अंत:करण ||
लोक पारखून सांडावे || राजकारणे अभिमान झाडावे ||
पुनः मेळवून घ्यावे || दुरील दोरे ||

आपण घेतलेले व्यावसायिक ज्ञान, मग त्यात आपण कितीही पारंगत असलो, तरी ते खरे ज्ञान नव्हे. जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी, त्याला आत्मज्ञानाची आणि वैराग्यपूर्ण वृत्तीची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे असा महत्वपूर्ण उपदेश त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, अंधश्रद्धा, दांभिक मूर्तीपूजा, व्रतवैकल्ये म्हणजेच परमार्थसाधना किंवा ज्ञानसाधना नव्हे असा त्या काळाच्या पुढे असलेला क्रांतिकारी आणि विज्ञाननिष्ठ विचार त्यांनी मांडला आहे. आजच्या काळात बुवाबाजीच्या विरुद्ध असलेला विचार असेही याला म्हणता येईल.
आता कैसे घडे सार्थक || दोष केले निरर्थक ||
पाहो जाता विवेक || उरला नाही ||
कोणे उपाये करावा || कैसा परलोक पावावा ||
कोण्या गुणे देवाधिदेवा || पाविजेल ||
नाही सद्भाव उपजला || आवघा लोकिक संपादिला ||
दंभ वरपांगे केला || खटाटोप कर्मचा ||
कीर्तन केले पोटासाठी || देव मांडिले हाटवटी ||
आहे देवा बुद्धी खोटी || माझी मीच जाणे ||
पोटी धरूनि अभिमान || शब्दी बोले निराभिमान ||
अंतरी वांछुनिया धन || ध्यानस्त झाले ||
वित्पत्तीने लोक भोंदिले || पोटासाठी संत निंदिले ||
माझे पोटी दोष भरले || नाना प्रकारीचे ||
सत्य तेचि उछेदिले || मिथ्य तेचि प्रतिपादिले ||
ऐसें नाना कर्म केले || उदारभरणाकारणे ||
अशा तऱ्हेने श्री समर्थ रामदासांनी त्या काळात क्रांतिकारी आणि परखड विचार मांडून निष्क्रीय आणि दैववादी समाजात चेतना उत्पन्न करण्याचे अतिशय महत्वाचे कार्य केले.
आजच्या काळात आणि पुढील काळातही त्यांची शिकवण आपल्याला मार्गदर्शक ठरेल यात तीळमात्र शंका नाही. परमार्थ, मोक्षप्राप्ती इथपर्यंत आपण विचार करू अथवा नाही, पण दैनंदिन जीवनात यशस्वी होण्यासाठी श्री दासबोध आणि समर्थांची सर्वच शिकवण हा एक दीपस्तंभ आहे असे मला वाटते.
||जय जय रघुवीर समर्थ||


निरंजन भाटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा