अंधारातून तेजाकडे

दुपारच्या रणरणत्या उन्हाला शह देणारा थंडगार सावलीचा आधार मिळावा म्हणून मी घराला वाळ्याचे पडदे लावून घेतले होते. ते दिवस भयंकर उन्हाळ्याचे - मार्च अखेरीचे म्हणजे माझ्या सारख्या सेकंडरी शाळेच्या शिक्षिकेसाठी अगदी कसोटीचे दिवस. परीक्षा जवळ आली की माझ्या विद्यार्थी वर्गापेक्षा त्यांचे पालक अचानक खडबडून जागे होत आणि आपल्या पाल्याला कसे जास्तीत जास्त गुण मिळवता येतील ह्या विचारांच्या वावटळीत सापडून स्वतःचे हाल करून घेत हा माझा आजपर्यंतचा अनुभव होता. अर्थात ह्याला अपवाद काही पालक होतेच.

वाळ्याचे पडदे शरीराला थंडावा देत होते पण मनाला मात्र अनामिके बरोबर नुकतीच झालेली बोलणी आठवून चटके बसत होते. अनामिका माझ्याकडे खाजगी शिकवणीला येऊ इच्छिणारी विद्यार्थिनी.

अनामिकेच्या बाबतीत काय घडले ते थोडक्यात सांगते.

तिची आई तिला घेऊन माझ्याकडे आली. सुदृढ, सावळी दिसणारी अनामिका मान खाली घालून बसली होती. मी तिला बोलते करायचा प्रयत्न केला.

'नाव काय ग तुझे? ""
"अनामिका "तिची आई म्हणाली .
"कितवीत आहेस?"
"आठवीत," इति आई.

मी अनामिकेला प्रश्न विचारत होते आणि तिची आईच उत्तरे देत होती .

"छान नाव आहे ग तुला, मग तू अनामिका कशी ग?" ह्या माझ्या बोलण्यावर अनामिका खुदकन हसली. सावळ्या चेहऱ्यावर शुभ्र मोगऱ्याच्या कळ्या उमलल्या. चला, तेव्हढाच आमचा संवाद तर सुरु झाला. शिक्षक - विद्यार्थी असो वा पालक - पाल्य असो. संवादाच्या बीजातून सामंजस्याचे रोप तरारते. मी त्या संवादाचे बोट धरून एक पाऊल पुढे टाकीत इंग्रजीत म्हणाले, "मला सविस्तर सांग बरे, तुला अभ्यासात कसली अडचण येते ती?" तिने तोंड उघडायच्या आधीच तिच्या आईचे कथाकथन चालू झाले. त्या कथाकथनाचा अर्थ असा की अनामिका गणित आणि विज्ञान सोडून बाकीच्या विषयात बरी (!) होती.

मी तिच्या आईला विचारले, "ती ह्या विषयांचा अभ्यास कसा करते?" (कारण आई मला अनामिकेशी बोलूनच देत नव्हती.)
"अहो, मी तिला दिवसातून आठ ते दहा तास अभ्यास करायला बसवते पण त्याचा काही उपयोग होत नाही हो हिच्या बाबतीत. माझ्या भाचीला कसे नेहमी पैकीच्या पैकी गुण मिळतात पाच सहा तास अभ्यास करून?"

मी विचारात पडले. तिच्या आईला नेमके कशाचे दुःख होत होते? तिच्या भाचीला अनामिकेपेक्षा जास्त गुण मिळतात ह्याचे की ती इतके तास अभ्यास करूनही कमी गुण मिळवते ह्याचे की आणखी काही? शिवाय अनामिकेच्या अभ्यासातील प्रगतीचे निकष तिच्या आईनेच ठरवले होते. तिच्या आवडी निवडी, तिचे भविष्य सर्व काही आईने स्वतःच्या मुठीत धरून ठेवले होते. तेरा वर्षांच्या मुलीला आपली आवड काय आहे, कोणता विषय कशा तऱ्हेने अभ्यासावा ह्याचे स्वातंत्र्य हवे. आई-वडिलांनी आधार देणाऱ्या स्तंभासारखे अढळ मात्र जरूर असावे.

पालकांनी थोडा वेळ आपल्या मुलांबरोबर घालवून त्यांना जाणून घेऊन त्यांच्या बरोबर संवाद साधावा (नुसताच दहशतवाद नको), असे नुकतेच कुठल्यातरी शाळेत एका अध्यक्षांना बोलताना मी ऐकले होते. त्याची मला ह्या प्रसंगामुळे आठवण झाली.

"बाई, एक मिनिट थांबा. मला जरा अनामिकेशी बोलू द्याल का प्लीज?"
"काय टीचर. चेष्टा करताय का? तिला काय कळतंय तिच्या अभ्यासातलं? एव्हढं कळत असतं तर आमचं नशीब फळफळलं असतं," बाई उद्वेगाने म्हणाल्या.
"बाई,शांत व्हा." मी त्यांना पाणी देत म्हणाले. "कधी कधी आपण मुलांना गृहीत धरतो. त्यांना काही कळत नाही असे म्हणत राहतो. पण प्रत्यक्षात लहान मुलांना खूप काही कळतं. जरा तुमचे लहानपण आठवून बघा. तुम्ही अनामिकेच्या वयाच्या असताना तुमची सुखदु:खं, तुमच्या भावना, तुमची अभ्यासातील आवड निवड! आपण आपल्याला मुलांच्या जागी ठेवून बघितले तर मला वाटते त्त्यांच्या भावना, त्यांची सुखदुःखे आपल्याला कळतील."

अनामिका माझ्याकडे एकटक बघत होती. तिची आई आता स्तब्ध झाली होती. थोडा वेळ बसून त्या आपल्या मुलीला घेऊन परत गेल्या.

त्या प्रसंगाची आठवण मला वारंवार होत होती. मनाला रुखरुख लागली होती. अनामिका कसा अभ्यास करेल? तिचे भविष्य तिचे कसे स्वागत करेल?

दाराची बेल पुन्हा एकदा वाजली आणि मी विचारांच्या तंद्रीतून जागी झाले. दार उघडले. दारात प्रसन्न मुद्रेने अनामिका उभी होती. कलत्या सूर्याची उन्हे तिच्या सावळ्या चेहऱ्यावर तेज पसरवत होती.

"मॅम, तुमच्या बोलण्याने चमत्कार झाला. आईने मला एकटीला तुमच्याकडे पाठवले आहे. म्हणाली, टीचरशी बोलून घे. परीक्षेसाठी कशी तयारी करायची हे आता तुलाच ठरवायचे आहे. आम्ही घरी तुझी वाट बघतोय."

मी हसून तेजाच्या ह्या कोवळ्या किरणाला घरात घेतले.













मोहना कारखानीस

1 टिप्पणी: