जगा आणि जगू द्या

“वसुधैव कुटुंबकम्” याचा शब्दश: अर्थ “या पृथ्वीवरचे जग हे माझे कुटुंबच आहे.” भारतातील संतांनीही “हे विश्वचि माझे घर” असे म्हंटले आहे.

ही संकल्पना आपल्या घरापासूनच सुरु होते. घर म्हटले की घरात आपली जवळची माणसं असतात. आपण एकमेकांना धरुन राहतो, काळजी घेतो. यांत प्रेमाची, आपुलकीची भावना असते. थोडक्यात कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी आपण झटतो. आता घरातल्या व्यक्तींच्या नंतर इतर नातेवाईक आणि मित्रमंडळी येतात. शेजारी पण आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असतात. त्यांच्याशी एकोप्याने राहणे, मदत करणे यातूनही आनंद मिळतो. यांत जात कोणती किंवा धर्म कुठला असा अडथळा नसावा. एक उदाहरण म्हणजे त्यांच्याही सणवारात आपण उत्साहाने सहभागी झालो तर आपुलकी निर्माण होते.

यानंतर आपला भारत देश आहे त्याचा विचार करूया. आजच्या युगात भारतात ही संकल्पना प्रत्यक्षात रुजवणे फार आवश्यक आहे. भारतात अनेक धर्माचे लोक आहेत. प्रत्येक धर्माची वेगवेगळी विचारधारा आहे. जात, धर्म या गोष्टींचा अडथळा प्रत्येक बाबतीत येतो आहे. आरक्षण या मुद्द्यामुळे जातीभेद वाढत चालला आहे. आज प्रत्येकाला स्वतंत्र प्रांत हवा आहे. महाराष्ट्रात स्वतंत्र विदर्भाची मागणी आहे तर आंध्रात तेलंगणा प्रांत वेगळा झालासुध्दा आहे. यासाठी लोकांची काहीही करायची तयारी आहे. हिंसेचा मार्ग तर आहेच. यातून काय मिळते आहे? सुखशांती नक्कीच नाही! निरपराध लोकांचे बळी जात आहेत. प्रत्येक राज्याचे छोटे तुकडे होऊन विभाजन होण्याची शक्यताही आहेच. म्हणूनच एकोप्याने राहणे व आपुलकीने संबंध चांगले करणे यांत निश्चितच राष्ट्राची प्रगती आहे. याच संकल्पनेने प्रेरित होऊन प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तेव्हा पुढचा विचार म्हणजे शेजारची राष्ट्रे आणि बाकीचे देश. शेजारच्या राष्ट्रांशी संबंध आपुलकीचे असले म्हणजे त्यांच्याकडून मदतीचा हात मिळतो तसेच आक्रमणाची शक्यता कमी होते. त्यांनाही मदत करता येते. दोन्ही देशातील पर्यटन वाढल्यानंतर देशातील अर्थव्यवस्था चांगली राहते. थोडक्यात बाहेरुन असणारे धोके नसताना राष्ट्राच्या प्रगतीकडे लक्ष देता येते. आपण जसे कुदुंबाच्या कल्याणासाठी झटतो तसेच आपल्या देशासाठी झटलो तर संरक्षणासाठी लागणारा पैसा अन्य चांगल्या कामांसाठी वापरता येईल. असेच सगळ्या विश्वाबद्दलही म्हणता येईल. प्रत्येक राष्ट्राने “जगा आणि जगू द्या” या मूलमंत्राप्रमाणे धोरण ठेवले तर कोणाचेच नुकसान होणार नाही उलट प्रगतीच होईल.

बलवान देश नेहमीच गरीब देशातील लोकांचे, त्यांच्या नैसर्गिक संपत्तीचे शोषण करत असतात. त्यांना त्या देशातील लोकांचे काय होईल याची पर्वा नसते. काही अतिरेकी संघटनांनी फैलावलेला दहशतवाद ही तर जगात मोठी समस्या आहे ज्यातून फक्त विनाशच होऊ शकतो. सध्या एका अतिरेकी संघटनेने वाट्टेल तशा कत्तली करुन इराक व सिरियाचा बराच प्रदेश जिंकून घेतला आहे. अशाच पध्दतीने त्यांचा जग जिंकून घ्यायचा हेतू आहे. प्रश्न असा आहे की अशा कत्तली करुन काय मिळणार आहे? पूर्ण जगातील वातावरण अस्थिर असणार आहे आणि कुठल्याच देशाची प्रगती होणार नाही. त्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने जर विश्वबंधुत्वाची भावना ठेवली आणि आजूबाजूच्या सगळ्यांना सुखासमाधानाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे असे मानले आणि गुण्यागोविंदाने रहायचे ठरवले तर शांतता नांदेल. दहशतवादातून सगळ्यांची सुटका होईल.

सिंगापूर - जिथे आपण राहतो - तो एक लहानसा देश आहे पण इथे अनेक जातीधर्माचे लोक आहेत. त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत, पण प्रत्येक नागरिक 'सिंगापूर हा माझा देश आहे' असे मानूनच गुण्यागोविंदाने रहातो आहे. अनेक परदेशी लोकांची संख्या दरवर्षी वाढते आहे. त्या सगळ्यांशी इथे जुळवून घेतले जाते म्हणूनच विश्वबंधुत्वाची कल्पना मानणारे सिंगापूर हे मूर्तिमंत उदहारण आहे असे म्हणता येईल. असेच प्रयत्न जागतिक पातळीवर झाले तर प्रत्येकाचे जीवन सुखी होईल, नाही का?

- आरती शुक्ल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा