वेगळ्या वाटा : सुगंधाच्या मागावर

Hi !
कुठे राहतेस? … रिव्हर वॅली.
किती वर्षे झाली? …. ९.
आय. टी. की फायनान्स ? … हा नेहेमीचा प्रश्न असतो आणि जेंव्हा मी सांगते की मी एक फ्रेग्रंस डेवेलपमेंट मॅनेजर (Fragrance Development Manager) म्हणजे सुगंधी द्रव्य निर्मिती व्यवस्थापक आहे तेंव्हा सगळ्यांचे कान उभे राहतात. 'अय्या, वेगळेच प्रोफेशन ना … ?! हे फ्रेग्रंस डेवेलपमेंट म्हणजे नक्की काय असतं?

मग सुरु होते माझी राम कहाणी. तुम्ही जे साबण, शाम्पू, शॉवरजेल इतकंच काय कपडे आणि भांडी धुण्याची पावडर, फरश्या पुसण्याचा साबण किंवा उदबत्ती वापरता ना … त्याचा वास कसा, कोणता असावा हे मी ठरवते. हे ऐकून समोरच्यांचे अंटेना जास्तच उभे राहतात. माझं स्पष्टीकरण सुरूच … म्हणजे बघा, आपल्याकडे ज्या FMCG कंपनीज असतात ना, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या हो …. त्या आम्हाला सांगतात की उदाहरणार्थ - आम्हाला लहान मुलांसाठी एक साबण बनवायचा आहे ज्यामुळे मुलं अंघोळ करताना खुश राहतील. किंवा एक शॉवरजेल काढायचं आहे जे गिर्यारोहण करणाऱ्या माणसांना आवडेल. मग ही टेक्निकल भाषा आम्ही आमच्या पर्फ्युमरला वासांच्या भाषेत समजावतो आणि त्या प्रमाणे तो परफ्युम बनवतो. मग अपेक्षेप्रमाणे ते बनलं आहे की नाही हे बघणं आमचं काम असतं. त्याकरता ते वापरून बघावं लागतं. पॅक उघडल्यापासून ते बाथरूममध्ये अंघोळीनंतर किती वेळ तो वास राहतो आणि कसा अनुभव देतो हे सारं आम्ही तपासून बघतो. त्यातल्या निष्कर्षाप्रमाणे पर्फ्युमर काही बदल आणि सुधारणा करतो. आम्ही दिवसातून किती शाम्पू, किती साबण वापरतो आणि किती कपडे धुतो ते विचारू नका. ही प्रोसेस २ आठवडे ते २-३ वर्षे सुद्धा चालते. कंपनीने दिलेला आराखडा ते शेवटची तयार सुगंधाची विक्री यांना जोडणारा दुवा आम्ही असतो.

जगात ५ मोठ्या आणि भरपूर इतर छोट्या कंपन्याही आहेत ज्या फ्रेग्रंसेस किंवा सुगंधी द्रव्ये बनवतात. वर जे काम सांगितलं ना, त्याला म्हणतात फंक्शनल परफ्युमरी. असाच प्रकार दुसऱ्या बाजूलाही घडतो ज्याला फाईन फ्राग परफ्युमरी म्हणतात. तिथे उच्च प्रतीचे सुवास, अत्तरे बनवतात. जसे की Drakkar Noir, कूल वॉटर आणि तत्सम फाईन फ्रेग्रंसेस.

वाह! छान आहे की जॉब. मस्त रोज नवीन नवीन छान वास घ्यायचे! पण अहो…. दुरून डोंगर साजरे. घाणेरड्या टाळूच्या त्वचेचा वास, घामाचे वास, कांदा - लसणाचे वास, लहान मुलांच्या शी-शू चे वास …. अहो असे सगळे वास पण घ्यावे लागतात महाराज ! हे सगळे घाणेरडे वास झाकून त्यावर मात करेल अश्या सुवासाची परीक्षा घायला आधी त्या दीव्यातून जावंच लागतं.

इथे आमच्या नाकाला म्हणजे वेगवेगळे वास ओळखून त्याचं वर्गीकरण (identification & classification) करता येण्याला फार महत्त्व असतं. 'ज्यात त्यात नाक खुपसणे' ही आमच्या कामाला अगदी साजेशी म्हण आहे. कामात सर्वात जास्त आनंद कधी मिळतो विचाराल तर जेंव्हा तुम्ही निवडलेला वास बाजारात येतो आणि लोकांना तो आवडतो, तो क्षण मूल्यवान!

वेगवेगळे वास वेगवेगळ्या भावना जागृत करतात आणि आमचं काम हेच आहे की त्या भावनांना ओळखणे आणि तुमच्यापर्यंत सुवासाद्वारे आणणे. उदाहरणार्थ : तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे हीरो होते बारटक्के सर. मनाने तरुण पण जबाबदार, संवेदनशील आणि प्रेमळ, अशी व्यक्ती जिच्यावर भरवसा करता येईल. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' च्या १००० व्या प्रयोगानिमित्त आम्ही मधुकर तोरडमल यांच्यासाठी एक खास सेंट बनवलं त्यात या साऱ्या गोष्टी ध्यानात ठेवल्या आणि आम्हाला आनंद आहे की त्यांनाही ते सेंट फार आवडलं. कामातून मिळणाऱ्या आनंदाच्या आणि समाधानाच्या गोष्टींमधली ती नक्कीच एक जपून ठेवण्यासारखी आठवण आहे.

- लीना बाकरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा