काव्य स्पर्धेतील कविता

प्रथम क्रमांक - तत्त्वज्ञानाची वही

परवा पुस्तकांच्या पसाऱ्यात
सापडली एक तत्त्वज्ञानाची वही,
तेंव्हापासून आम्हां मनुष्य प्राण्यांना 
माणूस म्हणण्याची 
इछाच राहिली नाही ! 

आम्ही झालोय एक यंत्र 
पैसे बनविणारे .. 
पैशासाठी एकमेकांचेच 
गळे कापणारे! 

माणुसकीच्या हजार 
कत्तलींनंतर आम्हास 
मिळालेत अमुचे धर्म 
त्या धर्माची व्याख्या 
ऐकून निर्लज्ज 
हसतोय अधर्म! 

निसर्गाला आली आहे 
स्वतःचीच शिसारी 
तो मनात कंठत बसलाय 
यापेक्षा माझी नग्नता 
असती बरी! 

आमच्या मध्ये आता 
जरी नसले स्त्री पुरुष बंधन 
कारण खुलेआम आम्ही 
चालवतोय वासनांचे बेधुंद प्रदर्शन! 

आता आम्हाला उजेडापेक्षा 
रात्रीचा दिवेरी प्रकाश गोड वाटतो 
कारण उच्चविद्याविभूषितही 
तिथे झिंगत नाचतो ! 

प्रत्येकजण बोलण्यापेक्षा 
गप्प बसण्यात धन्यता मानतो 
कारण जो गप्प बसतो 
त्याला यशाचा मार्ग पहिल्यांदा 
मोकळा होतो ! 

माणसातले माणूसपण 
संपण्याची सगळ्यांनाच 
झाली आहे घाई 
या तत्त्वज्ञानाच्या वहीला 
रद्दीचीही किंमत नाही! 
- अभिजित अरविंद कुलकर्णी









द्वितीय क्रमांक - ते मीठ खारे नव्हते 

हे लुटण्या आले अमुच्या देशा, उर्मट सोजीर गोरे
कां लोकही अमुचे मिंधे झाले, स्वत्व विकूनी सारे ?
हे गरिबा शोषुनी, फिरती मजेने मिजास दावित मारे,
कां अम्हा न लाभे मीठभाकरी, हे भरती ह्यांचे डेरे... 

तो फकीर आला, झंझावाती राष्ट्रभक्तीचे वारे
ही ठोका परतुनी परकी सत्ता, सारा देश पुकारे
तो बापु महात्मा म्हणे अनोखे शस्त्र अहिंसा घ्यारे
हे शरमेने मग झुकवुनी माना पळती घरा बघारे... 

ते घराघरांतुनी शूरवीर मग जमले घेऊनी झेंडे...
ते शस्त्रहीन अहिंसक सैनिक, रक्तही त्यांचे सांडे
ते झुकले नाही, देशभक्तीपर गायन करिती तांडे
तो सिंहनाद करी भारत अमुचा, तोफ़ांसंगे भांडे... 

ते ठोकीती करांस, जाचक घेती गरिबांकडुनी दंड,
ते मीठही खाणे अपमानास्पद, हसती गोरे गुंड
ये बापू धावूनी उपाय सांगीत, पुकारले की बंड
हे मीठ सागरी धन अमुचे कां अम्ही निर्मिणे बंद... 

जमले बापुमागे हजारो मीठ निर्मीती करण्याला
तो मानवसागर घाम गाळीतो, मुक्त कराया मीठाला
हो लज्जीतही सागर हा तेव्हा, मीठ मिसळले मीठाला
हे मुठीतले ते अमुचे धन हो, सांगा जाऊनी गो-याला... 

ते संग्रामी सारे मुक्त कराया मीठ, धावले दांडीतटी
ते अश्वसैन्य धावले चिरडण्या गरिबांच्या उघड्या पाठी
ते गर्जती जयजयकार, आवळित मुठी साहती लाठी
त्या खा-या जखमा गाती होती, मीठास मिठास मोठी...
त्या खा-या जखमा गाती होती, मीठास मिठास मोठी... 
- अरुण मनोहर









तृतीय क्रमांक - वळचणीचे इंद्रधनुष्य 

सुनीत (Sonnet). 
चाल: “श्रावणमासी...” 

मोर्चे काढुनि, भान हरपुनी “इंद्रधनू” जल्लोष करी!
“घटना” अशक्य कोटीतिल हो कायद्यातुनी होय खरी!
हो नर नारी वा हो किन्नर, “सरळसोट” वा हो तिरके 
नांदतील सौख्याने आता, “वळचणीतली” पण युगुले!
कोणी म्हणती, विवाहसंस्था कोष्टक तोडुनि विकासली 
“मिया – मिया” राजी झाले तर काझीची हरकत कसली?

कंपित झाले इंद्रासन अन् ब्रह्माशी “व्हॉट्सॅप” जुळे – 
“प्रजापिता, हे कसे निर्मिले चिरंजीव भलतेच खुळे”
“वय आता हो अमुचे झाले, डुलकी लागे क्षणोक्षणी, 
म्हणोनि म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट बनती पदोपदी”
“ मनुजाने ताडले बरोबर, सर्वच माझा दोष असे ”
असे म्हणोनी ब्रह्मानेही मनुजा “क्रेडिट” दिले कसे! 

क्षणात परि हे कोडे सुटले – ब्रह्मदेव निर्धार करी – 
कलियुग बुडवी प्रलयी, निरलस नव इंद्रधनू हास्य करी! 
- प्रद्युम्न महाजन


उल्लेखनीय - विपश्यना 

मला आवडते हॉटेलचा एक कोपरा पकडून
निरीक्षण करायला गजबजाचे नुसतेच
अर्थाची विचक्षणा न करता 
कित्येक जण आले आणि गेले
त्यांनी केल्या चर्चा, शोधण्यासाठी अन्वयार्थ
माझ्यासाठी मात्र कोलाहलच यथार्थ 
कुणी म्हणाले - शरीर नश्वर आहे
कुणी म्हणाले - आत्मा अमर आहे
कुणी म्हणाले - कर्मण्ये वाधिकारस्ते 
मी तसाच बसून - निरीक्षण करीत
अर्थाची विचक्षणा न करता 
कुणी म्हणाले - जीवन यातनामय आहे
कुणी म्हणाले - प्रेम हेच जीवन आहे
कुणी म्हणाले - मरावे परी कीर्तिरूपे उरावे 
ते आले आणि गेले,
त्यांनी मांडले आपले म्हणणे
आग्रहाने आणि हिरीरीने 
मी तसाच बसून - निरीक्षण करीत
अर्थाची विचक्षणा न करताच 
मग दुसरे आले
कुणी म्हणाले - या जन्मावर प्रेम करावे
कुणी म्हणाले - दम मारो दम 
कुणी म्हणाले - विज्ञान म्हणजे जीवन
कुणी म्हणाले - श्रद्धा म्हणजे जीवन 
कुणी म्हणाले - भोगाकडून समाधीकडे 
चर्चा रंगल्या परत परत
कधी कधी त्यांनी मलाही विचारले
उत्तरादाखल मी हसलो फक्त 
आणि गुणगुणल्या काही कविता
उष:कालाच्या आणि विनाशाच्या

जीवनाच्या आणि मृत्युच्या
इतिहासाच्या आणि भविष्याच्या 
काही अर्थ होता का त्यांचा ?
कुणास ठाऊक? 
मग त्यांनी केला प्रयत्न
कवितांचा अर्थ लावण्याचा 
मी तसाच बसून
अर्थाची विचक्षणा न करताच 
मग ते म्हणाले - मी शिष्ट आहे
मग ते म्हणाले - मी दुष्ट आहे
मग ते म्हणाले - मी वेडा आहे 
मग ते गेले आणि दुसरे आले
मला आवडते हॉटेलचा एक कोपरा पकडून
नुसतेच बसायला विपश्यना करित
अर्थाची विचक्षणा न करताच ! 
- निरंजन भाटे











उल्लेखनीय - काळ 

माणसा, मी तुझा शत्रू नाही,
पण तू मला मित्र म्हणून कधी वागवले नाहीस,
तूच माझे नाव 'काळ' असे ठेवलेस
आणि माझ्या नावाला 'काळं' फासलेस. 
मी आपला एकटा असाच फिरत होतो, अखंड होतो.
तूच माझ्यात आलास आणि माझे अनेक भाग केलेस,
तुकडे केलेस वर्षांचे, तासांचे, मिनीट आणि सेकंदांचे.
मी तुला धरले नाही,
तू केलेल्या माझ्या तुकड्यांमधे तूच अडकलास,
स्वतः बंदी बनलास
आणि मला देखील कालगणनेच्या नियमात बद्ध केलेस 
तुझे बरे-वाईट झाले, त्यात मला दोषी ठरवलंस,
मी वाईट होतो म्हणालास
खरं म्हणजे तुझं वाईट मलाही बघवत नाही
तू माझेच लेकरू आहेस,
दुःखातून तुला वर काढतो, तेव्हाच
तुझ्यासाठी नवीन 'संधी' देखील तयार ठेवतो 
माझीच लेकरं अशी, खुंटित, मला बघवत नाहीत
तू सशक्त हो, मोठा हो,
वाढिता वाढिता बुद्धी ही अशी वाढव
माझ्याहून तू मोठा हो
माझ्या कक्षेतून मोकळा हो,
मग मी ही तुझ्यातून मोकळा होईन 
तुझाच काळ, 
नव्हे, आज किंवा उद्या 
- धनश्री जगताप










(पारितोषिक विजेत्या आणि उल्लेखनीय कवितांखेरीज परीक्षकांनी इतर कवितांचे क्रमांक कळवलेले नाहीत. त्या कविता वाचनानंदाकरता कोणत्याही क्रमवारीशिवाय देतो आहोत.)


- रस्त्यांचा जयजयकार - 

(कवी कुसुमाग्रज यांच्या "क्रांतीचा जयजयकार" कवितेचे विडंबन) 

गर्जा जयजयकार रस्त्यांचा गर्जा जयजयकार|
अन् खड्डयांचे वाहनावरती घ्या झेलून प्रहार|| 

खड़खडु दया वाहने आता रस्त्यारस्त्यात
खड्ड्यांची हो काय तमा या पुण्यनगरीत
खड्य्यामधुनी वाहने ही चालवा सावकाश
फुटेल टायर परी वाहनातील अभंग आवेश
खड्ड्यामध्ये कोसळेल का एखादी मोटार
सांगा एखादी मोटार ||1|| 

पदोपदी पसरली खड़ी ही,झाली त्याची माती
होउनिया अपघात मी पडले लक्ष्मीपथावरती
थांबून तेव्हा विश्रांतीस्तव पाहिले पुढे मागे
बांधून टाकले अन् हाताला बँडेजचे धागे
एकच रस्ता समोर आणिक खड्डयाचा आधार
होता खड्ड्याचा आधार ||2|| 

वाहनानो जा मोर्च्यासंगे म्युन्सिपाल्टीत
महापौरांना कळवा आमुच्या हृदयातील खंत
सांगा सारे तुझे नागरिक रस्त्यारस्त्यात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
बुजवा खड्डे मगच मानू शतशः आभार
तुमचे शतशः आभार ||3|| 
- विनया रायदुर्ग












- पाऊस आठवांचा -

पावसाचा आभास होता 
अलवार हुरळते माती 
स्मरणांचा वास दरवळतो 
मन शोधत बसते मजसी.... 

भरून येते आभाळ 
दाटती कडवट आठव 
नकळत पाणवूनी डोळे 
जखमांची निघते सल .... 

सैरभैर वादळाशी झुंजत 
मी बसते दारापाशी 
दुःखावर डोळे पसरून 
मन रुंजते क्षितिजापाशी … 

नभ अनावरते क्षणांत काही 
पण आठव वाहून जात नाही 
जखमांची ती ओली भळभळ 
संपता संपत नाही... 

निःशब्द किनारे आजही 
शोधती गलबत हरविलेले 
दुःख आठवांचे तसेच ठेऊन 
सरते सत्र पावसाचे.... 
- दीपिका अभिजित कुलकर्णी













- जिथे सागरा धरणी मिळते - 

अरुणा ढेरेंच्या कृष्ण किनारा पुस्तकात त्यांनी राधा आणि कृष्ण यांची द्वारकेच्या सागरकाठी भेट झाली असा प्रसंग रेखाटला आहे. पण त्या भेटीआधी राधेच्या मनाची घालमेल झाली असेल का? तिच्या मनात काय आले असेल? या अनेक प्रश्नांनी जेव्हा ग्रासले तेव्हा ही कविता जन्मली …. 

अंबाडा सैल करून 
मानेवर रुळवला , 
मग उगाचच कपाळावरच्या मेणावर, 
परत कुंकवाचा थर दिला. 
नाकातली बेसर गोल फिरवली. 
कानातल्या ठेपीला सैल करून, 
परत घट्ट केली. 
हातातला चुडा वाजवला, 
अन टिचक्या बांगडीला वाढवली. 
नखावर जमलेल्या बगळ्याना पाहून खिन्न हसली. 
पायातल्या जोडव्याचा एक वेढ कमी करून, 
हुळहुळणा-या बोटावर हलकेच फुंकर घातली, 
आणि उगाचच पदराशी चाळा करत, 
कोपराला एक खुणगाठ बांधली. 
मग नजर घरभर फिरली. 
... 

... 
कोनाड्यात लागलेलं जाळं, 
तावदानापलिकडच्या स्वयंपाकघरातला विझलेला निखारा, 
बाजूलाच लटकलेलं रिकामं शिंकाळं, 
देवघरात विनाकारण टिमटिमणारी तेलवात, 
परसातली घरात डोकावू पाहणारी तुळस, 
उंबरठ्यावर माप ओलांडून आल्यावर, 
भिंतीवर फिकटलेले कुंकवाच्या हातांचे ठसे. 
सगळं सगळं गच्च मुठीत बंद केलं, 
आणि पावलं दिशेने चालवली. 
दिवस सावळा व्हायच्या आत गाठायचं होतं आज … 
तिथे, तिथेच…. जिथे सागरा धरणी मिळते 
- मुक्ता पाठक शर्मा













- गणपती - 

तू शंकराचा अभिमान 
तू पार्वतीचे प्राण
गजानना, कर जोडून
तुला करते सादर प्रणाम ।। 

प्रत्येक आरंभ विशेष
ज्याची सुरूवात 'श्री गणेश'
विनायका, ते सर्व मंगल 
ज्यात वसतो तुझा हा वेश ।। 

तू सूर्याचा प्रकाश
तुझ्यात सामावते अवघे आकाश
गौरीतनया, तुझ्याच कृपेने 
सर्व दुखांचा होतो नाश ।। 

किर्ती तुझी इतकी महान
पण मूषक वाहन तुझे लहान
लंबोदरा, तुझी ही विनम्रता 
प्रत्येक हदयात मिळवते स्थान।। 

तूच मधुरता स्वरांची 
तूच चैतन्य, तूच प्रेरणा सर्वांची 
वक्रतुंडा, तूच आहेस
शोभा या चराचराची।। 

तूच जगाची शक्ती 
तुझ्यामुळे सफल होते व्यक्ती
गणराया, निजदास तुझी ही 
करते पवित्र मनाने भक्ती।। 

तुझ्या येण्याची बघतोय आतुरतेने वाट
तुझ्या पुजेस सजविले मोदकाचे ताट 
गणपती बाप्पा, पुन्हा नव्याने बांधू दे 
ईश्वर व भक्ताची ही गाठ ।। 
- अनुष्का अविनाश कुलकर्णी













- उपासना - 

शारीरिक - मानसिक शुद्धीसाठी,
असते खरी भक्तीची उपासना । 

नेमकी तीच सोडून जडली,
मानवाला विषयसुखाची वासना । 

आनंद आहे तुझ्या दारी होण्या चाकर,
मात्र संसारात शोधतोय पोटाची भाकर । 

आठवण होते देवा तुझी आज खूप,
पण वेळ नाही मला भागवायची आहे भूक । 

रोज ठरवतो देईन वेळ तुला,
काय करू पण प्रपंच जडला आहे मला । 

निर्माण केलीस तू सुंदर ही सृष्टी,
ते जाणण्याची दे जरा दृष्टी । 

सर्वत्र वरदहस्त असतो म्हणतात तुझा,
मग मनुष्यालाच का ही सजा । 

नाम तुझे गोड आहे जगी रूढ,
का नाही त्याची मानवाला ओढ
का नाही त्याची मानवाला ओढ ।। 
- नंदिनी नागपूरकर













- समाज - 

पृथ्वीच्या पाठीवर समाज नावाचे बंद घर 
बंद घरावर साचलेला धुळीचा तो अखंड थर 
या कोंदट घरात कोमेजलेला हा समाज 
घराबाहेरील सुंदर निसर्ग, वारंवार प्रश्न विचारतोय आज 
मान-अपमान, जात- पात यालाच का जीवन म्हणतात? 
दुसऱ्याच्या आकांक्षा पुरायला…. का सगळे खड्डे खणतात? 
अत्याचार, लाचारी, राजकारण, भ्रष्टाचार …हीच आहे ना समाजाची पीडा 
मग धूळ साचवणारा या धुळीच्या थरावर …समाजानेच निर्माण केलाय ना किडा? 
दंगे करायचे, मारामाऱ्या करायच्या … एकमेकांच्या नावाने बोंबा मारायच्या, 
सगळं शांत झाल्यावर मग 'एकता ठेवा' म्हणून दवंड्या पिटवायच्या, 
हे सगळं करून काय मिळणार ह्या मनुष्याला ? 
असल्या क्रूर बिया पेरून, फुटणार का अंकुर आयुष्याला …? 
कोणी उघडणारच नाही का, ही बंद दारं ? 
अनुभवणारच नाही का हे प्रसन्न वारं ? 
धुळीवर फुंकर मारून तर बघा … निसर्गाच्या छायेत चालून तर बघा, 
संकेत मिळतील आपणास सुंदर आयुष्याचे, 
शिकवेल तो निसर्ग …. कसे दुसऱ्या करता जगायचे 
बघुया का आपण निसर्गाचं ऐकून थोडं ? 
सुटेल कदाचित मग हे आयुष्याचं कोडं!!! 
- मुग्धा जहागीरदार













- मृत्युंजय - 

अनेक देही आलो गेलो 
पुन्हा जन्मलो आणिक मेलो 
सर्व जन्म ते व्यर्थचि गेले 
ना जगण्याचे मर्म उमगले 

काय उपेग अशा जगण्याचा 
श्वास एक ना संतोषाचा 
ठसा एक ही ना स्मृतीचा 
मार्ग रिता तो जन्मांतरीचा 

रवि ना दिसले, कवीने पाहिले 
विचाररूपी प्रकट जाहले 
अमूर्तातुनी मूर्त वर्म ते 
लेखणीतुनी मग जे झरले 

अमृतकण ज्ञानाने भरले 
गुणी कवी अजरामर झाले 
काव्यरूपी ते जगात उरले 
मृत्यूलाही तया जिंकले . 
- युगंधरा परब











- तू - 

प्रेम तू, कारुण्य तू अन् तू दयेचा स्त्रोत रे 
ध्यास तू, ध्यासांत तू, तू अंतरीचा द्योत रे 

क्षुद्र मी तर बाहुली तव, तूच माझा करविता
नाकळे या पामराला कोणते गणगोत रे? 

घुसमटे बघ प्राण माझा, देह झाला पिंजरा
जीव नाही जीवनाला, चेतनेला ओत रे 

रूप ऐसे चांदण्याचे, उजळती दाही दिशा
एक तुझे नाम देवा, मखमलीचा पोत रे 

मागते ते दे मला तू, हे दयेच्या सागरा
सेविका ही लीन आता, तव पदांसी होत रे 
सौ. वनिता तेंडुलकर-बिवलकर












- पूर्वज - 

पाचशे वर्ष जुन्या 
प्राचीन वटवृक्षाप्रमाणे असतात
आपले पूर्वज 
आपले आईवडील 

आपल्या नसानसांत 
रुजलेली असतात त्यांची पाळंमुळं
आणि लाल रक्ताच्या
पांढर्‍या आणि तांबड्या पेशीतून
वाहत असतो
त्यांनीच दिलेला प्राणवायू 

ते नसूनही आपल्याच आजूबाजुला असतात
ते असतात आपल्या आत्मविश्वासात
ते असतात आपल्या तत्त्वात आणि व्यक्तिमत्त्वात
ते असतात आपल्या दैनंदिन आचारविचारात 

त्यांना रोज पाहता .. अनुभवता येतं 
आपल्या डोळयांच्या रंगात
त्वचेच्या स्पर्शात
हसण्याच्या खळखळाटात 
केसांच्या सुगंधात
स्पंदणार्‍या हृदयात
आपल्या प्रत्येक सवयीत
हालचालीत तेच तर असतात! 

आपलं चालणं बोलणं दिसणं हसणं रडणं नाचणं गाणं
आपलं सुखदु:ख
हरेक .. हरेक गोष्टीशी
चिवटपणे
जोडलेले असतात त्यांचे धागे! 

पूर्वज आपल्याला सोडून कुठे जातात?
त्यांची शिकवण पिढ्यान् पिढ्या सोबतीला असते
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच पुढचं पाऊल उचलता येतं 
त्यांच्या नावामुळेच आपलं नाव उंचावलं जातं 
पूर्वज पाचशे वर्ष जुन्या वटवृक्षाप्रमाणे असतात
ते मरत नसतात..
ते आपल्यामधूनच परत परत जन्म घेत असतात..
घेत राहतात!!! 
- यशवंत काकड











- कुणाची तरी वाट कुणीतरी पाहतं… -

कुणाची तरी वाट कुणीतरी पाहतं 
नजरेच्या टोकाला, आशेची आस 
अपेक्षेचं कोंदण, विश्वासाचं आंदण 
हृदयाच्या आतपर्यंत भरून राहतं, "म्हणूनच" 

कुणाची तरी वाट कुणीतरी पाहतं 
शब्दांची झोंबणारी कडवट जखम 
जाता जाता रागाला उसळून जाते 
मनाची चिरून, पुरती दुखवून 
जाणीव कुठं तरी मिटवून जाते, "तरीसुद्धा"

कुणाची तरी वाट कुणीतरी पाहतं 
गाभारा घुमतोय गंधित आतुर 
तिथं कुणी नादावतं रुणझुण नुपूर 
नात्याची गाठ बांधता सोडता 
सापडतो मनाच्या कमानीचा गोपूर 
तुझं माझं, जिथं सगळं भरून राहतं , "तिथंच" 

कुणाची तरी वाट कुणीतरी पाहतं 
आयुष्य भोगलं, श्वासानं जगलं 
स्पर्शाच्या आधाराचं मोल पालवलं 
डोळ्यातलं सुख ओठानं टिपलं 
ओठांवरचं दूख अश्रूंनी पुसलं 
असं देखणं आयुष्य आता एकाकी जगत, "कुठं तरी"
कुणाची तरी वाट कुणीतरी पाहतं 
- शाल्मली वैद्य












- गोधडी - 

उसवलेल्या धाग्यांनी, 
शिवत राहायची गोधडी, 
आठवणींची ठिगळं ठिगळं जोडून; 

मनातलं चित्रं नाही साधलं 
की पुन्हा उसवणं आलंच 
आणि धागे उसवले, की पुन्हा 
त्यांचं गुंतणंही आलंच; 

मग उसवलेल्या धाग्यांचा 
गुंता सोडवायचा, 
पुन्हा ठिगळांच्या जोडकामाचा, 
सारीपाट मांडायचा... 
कितीदा हा डाव नव्याने खेळायचा? 
- अर्चना रानडे












- लाजरी मेंदी - 

हिरवा चुडा भरता हाती
स्वप्ने नयनी तरल तरंगती 
पापण्या तिच्या सहज झुकती
भार त्यांचा होई नयनी 
मेंदी रंगता कोमल हाती
अल्लड प्रीत रंगी येई 
घेता तिचा हात हाती
आयुष्याची पहाट होई 
जास्वंद फुले प्राचीच्या उदरी
मेंदी लाजून लाल होई 
केशरी ऊन पसरे अंगांगी 
कोकीळ गाई 
सप्तसूर तव रंगी 
सुरंगीच्या वळेसरावर 
विरघळे तिचा मंद गंध 
टिपताना तिचा हळवा स्वर 
अवचित तोही गहिवरी 

मेंदी अनवट वाटा दाखवी 
मेंदी मिलनाची साक्ष देई 
- मोहना कारखानीस












- हो यशस्वी …. - 

हो यशस्वी हो युवका, गतिमान नव-युगात 
जपून स्वप्ने मात-पित्यांची, सदैव तू हृदयात 

तान्हेपणी तुज खेळविलेले , कधी ह्या तळहातांनी 
हर्षले होते गाल आमुचे , तव तळव्यांच्या स्पर्शांनी 

बालपणी मग खेळ तुझे , ते अंगाखांद्यांवर 
कोरले कैक क्षण ते स्मृतीत , या मनःपटलावर 

जलद गतीचे जीवन आता , स्पर्धा अटी-तटीची 
काळ निराळा अमुचा होता , मजाच आगळी त्याची 

मशालवीर तुम्ही विज्ञानाचे , उत्कर्ष पहाल विश्वाचा 
सहलीस करतील नातवंडे अमुची , प्रवास अंतरिक्षाचा 

जगत जाहले लघुतम मेळा , पुसल्या सीमा-रेषा 
भवितव्य तुमचे ठरेल होता , उलाढाली दूरच्या देशां 

अधिक बोलतो पैसा आता , अनिवार्य असे मानणे 
विसर नको परि मूलतत्वांचा , संपत्ती तिज जाणणे 

साध्य होईल जितुके तितुके, संस्कृतीस आपुल्या जपणे 
प्रिय आजी-आजोबांची देण , तिज समजून जोपासणे 

आयुष्याचा रथ हा इथवर , हाकून आणिला आम्ही 
सारथ्य कर्तब आता तुमचे ,दावाच आंम्हा तुम्ही 

अमूल्य काही जगास देणे , आकांक्षा असावी तुमची 
लिहुनी टाका आभाळावर , स्वाक्षरी नव्या पिढीची 

पुत्र असो वा कन्या समान , हे बोल जन्मदात्यांचे 
याहुनी शुद्ध आशीर्वचन ते , केवळ भगवंतांचे …. 
- नंदकुमार देशपांडे 













- सावित्रीचा वसा - 

द्रौपदीचा सखा बनायची हिंमत सर्वांमध्ये नाही 
राजारामाला जो तो काष्ठी पाषाणी पाही 

सोळा सहस्त्रांचा तोच होता पाठीराखा 
सात जन्माचा सोबती नाही सीतेचा सख्खा 

पदस्पर्शाने ज्याच्या शीलामुक्त झाली अहिल्या 
सीतेला वनवासी करून पुन्हा नामानिराळा राहिला 

मंत्रमुग्ध गोपींसाठी वाजवला पावा 
चीरहरण प्रसंगी द्रौपदीने केला हरीचाच धावा 

समाज म्हणाला म्हणून सीता झाली भूमिकन्या 
अग्नितूनही तळपली अशी नाही अनन्या 

शबरीच्या बोरांवर दिसले त्याला चावे 
गर्भार सीतेने काय पचवले त्याला नाही ठावे 

आपल्या माणसांना त्रास देण्यातला पुरुषार्थ 
बायकांच्या मते त्या जगण्याला ना अर्थ 

आई बहीण बायको बनून जी तुला तारते 
सती बनून सरणावर तुझ्या सवे चढते 

यमाशी ही भांडायचा सावित्रीचा वसा 
राम असो की श्याम असो करते आपलासा 

सावित्रीबाई फुले होऊन लढ समाजाशी 
बायकांना शिकवून जमव पुण्याच्या राशी 
- मृणाल देशपांडे








- एकदा तरी भेट - 

तू जवळ असताना तुझ्याशी धड बोललोही नाही, 
वर्षं कशी सरली, लक्षसुध्दा दिलं नाही. 
कधी होतीस तू शोडषीय सुंदर तरुणी, 
पण नुसतीच कर्तव्यं आणि उणी दुणी. 
तुझ्या सौंदर्याचं, स्वयंपाकाचं केलं नाही कौतुक 
त्यात मी काय मिळवलं, कुणास ठाऊक? 
वाटायचं, कधी तुझा हात धरावा, 
अन तुझ्या केसात मोगरा, अबोलीचा गजरा माळावा. 
पण नुसतं मनातच राहिलं, 
कृतीत करायचं राहूनच गेलं. 

tv, सिनेमा पाहताना वाटतं, 
ह्या हिरोंना बरं हे सगळं जमतं. 
मला मात्र काही जमलं नाही. 
का मी प्रयत्नच केला नाही? 
थकलीस मग तू संसाराचा गाडा ओढता ओढता, 
मी काना डोळाच केला, सगळं उघड्या डोळ्यांनी बघता. 
काळेभोर केस तुझे पांढरे झाले, 
पण I love you म्हणायचे मात्र राहूनच गेले. 

हळूहळू अनेक दुखण्यांनी घेरलं तुला, 
आता मात्र काय करावं, सुचेना मला. 
मी कर्तव्यं सगळी करतो, तुला डॉक्टरकडे पण नेतो 
पण खूप काहीतरी राहून गेलंय, हे मीही जाणतो. 

तू लावलेल्या दोन रोपट्यांना रोज पाणी घालतो. 
अन स्वतःच्याच मनाला समजावतो. 
आता तुझी नाही पण रोपट्यांचीच काळजी घेतो. 
आणि सतत वाहणाऱ्या अश्रूंना आवरतो. 
आता पश्चात्तापाशिवाय हाती काही नाही. 
कारण रोपट्यांवरचे गुलाब पाहायला तू जवळ नाही. 

पुनर्जन्म मिळाला तर, तुझ्यावर करीन प्रेमाचा वर्षाव 
स्वप्नांच्या रथाचे घोडे सोडीन भरधाव. 
माझ्यावर राग असा नको ग धरू, 
तू म्हणशील ना, तर आपण Valentine Day सुद्धा साजरा करू. 

पोचू दे हा निरोप तुझ्या पर्यंत थेट. 
काहीही कर, पण एकदा तरी भेट, एकदा तरी भेट. 
- मेघना असेरकर












- संवाद - 

संवादा रे संवादा, किती रे तुझी व्याप्ती? 
दोघे कुणी बोलले कुठे त्याला होते तुझी प्राप्ती. 

पण तुला नको असते नेहमीच कुठली ना कुठली भाषा, 
केवळ भाव कळावा हीच तुझी आशा. 

स्पर्शातून, नजरेतूनही कितीतरी बोलतोस तू, 
शब्दांनाही लाजवेल, अशी किमया साधतोस तू. 

तुझयामुळेच आम्ही शिकलो निसर्गाशी नातं जोडायला, 
तुझ्यामुळेच आम्ही लागलो मुक्या प्राण्यांशी जीव लावायला. 

जेव्हा येतोस हृदयातून, तेव्हाच असतोस तू खरा संवाद, 
जेव्हा येतोस डोक्यातून, तेव्हा घडतो नुसता वाद. 

तुझ्या अती वापरामुळे हा समाज बनतोय रे आळशी, 
तुझा वापर कमी करण्याची, तूच घेशील का रे काळजी? 

पण संवादा, तुझ्यावर अवलंबिली ही दुनियाच सारी, 
तू पळून गेलास तर व्हायची फजिती भारी!!! 
- मोनाली देशमुख












- या मंडळी शब्दगंधला - 

या मंडळी शब्दगंधला, आमंत्रण आमचे कवींना 
सुचते कसे काव्य, प्रश्र्न का येतो तुमच्या मना 

मला सुचते कविता, मिळता आगळी संकल्पना 
उचलतो सारे शब्द, त्याची करतो वेगळी रचना 

फिरवतो मनातील चक्रे, दूर फिरवून आणतो सर्वांना 
गुंतवतो विचारांचे जाळे, त्यात घुसवतो थोड्या भावना 

जड जड शब्द वापरून , वजन देतो मधेच पंक्तिंना 
सहज न उमजले कोणा, तर वाचावे लागते पुन्हा 

ट ला ट लावतो , ठेका धरतो, अर्थ न का लागेना 
वाहवा म्हणतात सारे , हलवतात आपल्या माना 

कवी शब्दगंधचे गुणी, सुंदर त्यांच्या काव्य रचना 
मला त्यांच्यात सामावले, हा खरा त्यांचा मोठेपणा 

काव्य मन होते विचलीत, येता रुचकर स्वाद नाकांना 
यजमानांचे अगत्य, आग्रह जेवणाचा करती सर्वांना 

दहा वर्षांचा हा रिवाज, काव्य वाचन असते दर महिना 
मनाचे श्रीमंत सारे, उधळती हास्य व टाळय़ांचा खजिना 
- श्रीरंग केळकर









- अनावृत्त चंद्र - 

आज झाडाआडून हळूच डोकावत तो पूर्ण चंद्र मला म्हणाला 
'अरे तू पण किती छान दिसतो, 
जेव्हा प्रत्यक्षात असतोस, 
नाही तर मलाच त्या दाहक स्क्रीन ( Laptop/TV ) च्या पिंजऱ्यात टाकतो 
माझ्या शीतलतेचा सहवास तू अनुभवावा म्हणून मीच सारखा झुरत असतो 
आणि तुझ्या दर्शनास आतुर होऊन सारखा फुलत देखील मीच असतो . 
तुझे म्हणावे तर छद्मी कौतुक ते मला असते का माझ्या स्क्रीनवरील प्रतिमेला ? 
का तुझ्या अधिकाराला की तू मला देखील बंदिस्त केलेस याला ? 
अरे प्रतिमेवरील प्रेम खरे असेल तर मेलेल्यावर कधी प्रेम झालंय? 
सहवासाशिवाय कधी प्रेम बहरलंय? 
मला कवेत घ्यावे मनसोक्त अनुभवावे असे नाही का वाटत ? 
आणि मी सुंदर दिसत असेन तर त्याला पण कॅमेरामध्ये बंदिस्त करत 
माझे तुझ्यावरचे प्रेम जगाला का वाटत फिरतोस ? 
कधी तरी अनावृत्त हो, कधी तरी खरा हो आणि कधी तरी माझ्यावर प्रत्यक्ष प्रेम कर. 
सहवास हाच खरा आणि प्रतिमा हा मुखवटा हे तरी समज. 
शंका नको घेऊ अनावृत्त झाल्यावर काही तरी लपवल्याच्या 
- शिरीष कुलकर्णी











- हिशोब… - 

खिडकीतून दिसता दूर, ते घनगंभीर आभाळ 
मग हलके कोसळताना, ते टपटप करती सूर 
एक टपोरा थेंब चोरटा, लक्ष चुकवूनी निसटून आला 
तुझ्या न् माझ्या आठवणींना, माझ्या नकळत बिलगून गेला 
खिडकीजवळच्या टेबलावर तुझी वही होती. 
मला तू कायम समोर दिसावीस म्हणून ठेवलेली. 
तुझ्या आठवणींना पावसाचा हा चिमुरडा थेंब 
पुन्हा ओलं करून गेला 

तुझी अन माझी जवळीक त्या वहीत होती 
तुझा अन माझा दुरावा त्या वहीतल्या शब्दांमधून निखळत होता 
तुझ्या व्यक्तित्वाची डायरी होती ती 
छान शब्द कानी पडले की तू त्यात टिपून ठेवायचीस … 
इतकंच काय तर वास्तवाची जाणीव म्हणून.. 
कुठे तरी गिचमिडीत लिहिलेले वाण्याचे हिशोब पण होते 
आपल्या नात्याचा सगळा उणे -अधिक प्रवास त्यात होता 
तुझ्या दृष्टीने कदाचित जास्त उणेच... 
मला मात्र हिशोब कधी जमलाच नाही, एक अधिक तर एक उणे, शेवटी उत्तर शून्य ... 
हे ही मला कधी उमगले नाही 
मला ध्यास होता फक्त…. उण्याचे अधिक करायचा, 
तेवढा हिशोब मात्र मला, कदाचित जमला होता 

त्या वहीत होतं एक पिंपळाचं पान .. 
आपल्या नात्यापेक्षा जास्त जीर्ण आणि कोरडं झालेलं 
दुराव्याचा प्रत्येक दिवस, जाळी अजूनच वाढवत नेणारं 
माझ्याकडचं पान कधीच विरून गेलं होतं 
तुझ्या पानाची जाळी व्हायचं, तू गेल्यावर थांबलं होतं 
जाळीचा तो हिशोब मात्र … मला तेंव्हा समजला होता 

आठवतंय मला ... आठवतंय मला, 
तुला राग यायला, काही खुट्ट होणं पण पुरेसं व्हायचं 
ओल्या डोळ्यातून मग शब्दांशी तुझं वैर व्हायचं 
तेंव्हा बाहेरच्या झाडाच्या फांदीवर असायची 
एक नि:शब्द अबोल पाखरसंध्या… 
अन् मग एका कोकीळेचा आवाज फक्त 
पुरा असायचा तुला बोलतं करायला 
त्या कुण्या कोकिळेचा हिशोब ..चुकता करायचा राहून गेला 

आठवतंय तुला … आठवतंय तुला 
भर दुपारी वेडेपणे आपण माळशेज घाटात 
मोटर सायकलवरुन भटकत होतो 
त्या मुक्तकाजळ्या आकाशातून 
अचानक गारा कोसळू लागल्या 
मन मस्त भिजताना, तुझा हसरा चेहरा अन् 
तुझ्या हाताची ओंजळ यात काहीसं बिनसलेलं 
तुझ्या ओंजळीत एकही गार पडेना 
जणू त्या गारखड्याला, तुझ्या कोमल हातांवर 
नाजूक ओरखडे यायला नको होते 
त्या निसटणार्‍या गारेबरोबर, 
तुझ्या चेहऱ्यावरचं हसू निसटू लागलं होतं 
माझ्या हातात विरघळणार्‍या त्या गारा 
मी तुझ्या हातात रित्या केल्या, 
तुझे हास्य जपण्याचा हा हिशोब मात्र तेव्हा मला जमला होता 

अशाच एका मस्त दुपारी 
सुरात कुठे धडपडत मी होतो 
गंधार तुझा मग उसना घेऊन 
गंध सूरांचा बहरुन गेला 
… तुझ्या त्या गंधाराचा मी अजुन ऋणी आहे 

फुले दिली मी ओंजळीतून 
एक मोगरा निसटून गेला 
गजर्‍यात तुझ्या एकाच फुलाचा 
सूक्ष्म वास हरवुनी तो गेला 
…. निसर्ग भावनांचे हे हिशोब बहुधा मला कळले 
माझ्या बर्थडेला तू केकवर जादूची कॅंडल आणली होतीस 
मी फुंकर मारुन थकलो 
पण ती ज्योत तुझ्यासारखीच अवखळपणे तेवत होती 
चिडून मग मी बोटानं ती ज्योत विझवली 
तू माझ्या बोटावर मारलेली ती फुंकर मला अजून गारवा देतीय 
त्या एका फुंकरेचा मी अजुन ऋणी आहे 

हिशोब हिशोब म्हणजे काय ? 
काय कमी आणि काय जास्त याची जाणीव 
माझा हिशोब भावनांचा होता 
अश्रू थांबवायचा होता, 
तुझ्या गालावरच्या खळीत हरवून जायचा होता 
व्यावहारिकतेचा माझा हिशोब पूर्ण फसला होता 
पण मन जपण्याचा हिशोब मात्र मला पूर्ण जमला होता 
- विनय पराडकर













- कुणीतरी असावं - 

कुणीतरी इतकं जवळचं असावं 
की दुराव्यातही जवळीक असावी 

कुणीतरी असावं … 
ज्याच्याजवळ अबोला धरला तरी 
त्यातल्या बोली त्याला कळाव्या 

कुणीतरी असावं … 
ज्याच्याजवळ अवांतर बोलता येईल 
कुपीतलं मन उघडता येईल 

कुणीतरी असावं … 
जो अगदी कंटाळा येत असूनही 
आपल्यालाच ऐकत राहील 

कुणीतरी असावं … 
ज्याला आपसूकच कळेल 
गर्दीत असूनही आपण एकटे आहोत 

कुणीतरी असावं … 
ज्याने असे म्हणावे, अगं 
ह्या साडीत तू खूप सुंदर दिसतेस 

कुणीतरी असावं … 
नेहेमीच्या गडबडीत मधूनच एखाद्या वेळी 
फोन करून विचारपूस करणारं 

कुणीतरी असावं … 
साध्या गोष्टीतून प्रोत्साहन देणारं 
शाबासकीचा हात पाठीवरून फिरवणारं 

कुणीतरी असावं … 
अशांत मनातल्या लाटांना 
शांत किनाऱ्यावर आणणारं 

कुणीतरी असावं … 
ओठांतून आलेल्या हलक्या हास्याला ओळखणारं 
हृदयाचे ठोके ऐकवत कवेत घेणारं 

कुणीतरी असावं … 
आपल्यातील छोटी गोष्ट टिपणारं अन 
नकळत आपल्याला सांगणारं 

कुणीतरी असावं … 
केवळ मला पाऊस आवडतो म्हणून 
माझ्यासवे ओलं चिंब भिजणारं 

कुणीतरी असावं खरंच 
ज्याच्याजवळ आपली काळजी - चिंता हरता हरता 

आपण स्वतःलाही विसरून जावं! 
- सौ. मिनल लाखे

२ टिप्पण्या:

  1. निरंजन भाटे, कविता मला खूप आवडली, मला स्वतःला त्यात थोडा शोधता आलं.
    मुक्ता, मला तुझी कविता आवडलीच, त्याचबरोबर तू वापरलेले काही शब्ध खासे आवडले. विशेषतः - बेसर, ठेपी, बगळ्या आणि टिमटिम.
    मिनल, तुझी कविता देखील छानच आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Jithe sagara kavita khupach khas watali. Khup sundar. tinhisanj dolyanshi ubhi rahte wachun.

    उत्तर द्याहटवा