"तमसो मा ज्योतिर्गमय"

सूर्योदयापूर्वीच्या चाहुलीने पक्ष्यांनी किलबिलाट करायला सुरवात केली आणि कृष्णंभटांना जाग आली. कंदिलाच्या क्षीण प्रकाशात त्यांनी आपली पत्नी रुक्मिणी आणि कन्या गार्गी यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्या अजूनही साखरझोपेत होत्या. एक मंदसे स्मित करत कृष्णंभट तांब्या उचलून परसदारी आले. नेहमीच्या सवयीप्रमाणे मुखप्रक्षालनादि नित्यकर्मे करून त्यांनी उपरणे खांद्यावर टाकले. खडावा पायात सरकवून ते घराबाहेर पडले आणि " वक्रतुंड महाकाय …. " असे पुटपुटत झपाझप कुशावर्ताच्या दिशेने चालू लागले. बाजूलाच असलेल्या गुरुकुलातील विद्यार्थीही आपल्या गुरूंच्या वेगाची कशीबशी बरोबरी करीत त्यांच्या पाठोपाठ चालू लागले.

सूर्योदयापूर्वी गोदावरीमध्ये स्नान, अर्घ्य आणि सूर्यस्तोत्र, त्र्यंबकेश्वर मंदिरात संध्या, हिवाळ्यात तांबडफुटीला त्र्यम्बकेश्वराची काकड आरती, घरी जाऊन घरच्या देवांची पूजा हा कृष्णंभटांचा नित्यक्रम - उपनयन झाल्यापासून बालवयातील काही किरकोळ आजार वगळता कधीही चुकला नव्हता. त्यानंतर गुरुकुलात विद्यार्थ्यांना संथा, यजमानांकडे यज्ञयागादि कार्ये, माध्यान्ह संध्या, भोजन, दुपारी घरी येऊन झोप, मग पुन्हा गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, सूर्यास्तापूर्वी पुन्हा संध्या, आपली कन्या गार्गी हिच्याशी संवाद, तिच्या शैक्षणिक प्रगतीची विचारपूस, अल्प भोजन, मग शास्त्र वाचन!

आज नदीतून स्नान करून बाहेर येत असताना घाट झाडणाऱ्याच्या झाडूचा त्यांना चुकून स्पर्श झाला. हे दृश्य लांबून पाहणारे विष्णूभट त्या झाडणाऱ्याच्या अंगावर धावले आणि घाटावर असलेल्या इतरांकडे पाहून "याला चांगली अद्दल घडवा" अशा अर्थाचे हातवारे करीत त्याला काही बोलणार, इतक्यात कृष्णंभटांनी त्यांच्याकडे असे पाहिले की विष्णूभट आपल्या जागीच खिळून उभे राहिले. दशग्रंथी व्युत्पन्न ब्राह्मण असलेल्या कृष्णंभटांबद्दल विष्णूभटांना भीतीयुक्त असूया होती. असे असूनही कृष्णंभटांसमोर लांगुलचालन करण्याची एकही संधी ते सोडत नसत. शास्त्रार्थात कृष्णंभटांचा हात धरू धरू शकेल असे उभ्या नाशकातच काय पण आजूबाजूच्या शंभर पंचक्रोशीत कोणी नव्हते असे चर्चिले जात असे. शास्त्रार्थ करण्यासाठी त्यांना अनेक संस्थानांकडून सादर निमंत्रण येत असे.

अनेक संस्थानांच्या दरबारी त्यांचे सत्कार होत असत. त्र्यंबकेश्वर मंदिराचे परंपरागत उपाध्येपण त्यांच्याकडे नसले तरी त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळात त्यांना आग्रहाचे आणि मानाचे स्थान असे. आणि मुख्य म्हणजे गंगाधरपंत जहागीरदार यांचे कृष्णंभट अत्यंत विश्वासू सल्लागार होते. गंगाधरपंतांच्या कारभारातील आणि घरातील पानही कृष्णंभटांच्या सल्ल्याशिवाय हलत नसे. विष्णूभटांना त्यांच्याविषयी वाटत असलेल्या असूयेची ही काही मुख्य कारणे होती.

या अचानक घडलेल्या प्रसंगानंतर कृष्णंभट पुन्हा एकदा नदीच्या पात्रात शिरले आणि पुन्हा अंगावर पाणी घेऊन बाहेर पडले. विष्णूभट अजूनही तिथेच उभे होते.

"नुसतं कर्मकांडाचं अवडंबर करून चालत नाही, विष्णूभट. चित्तही शुद्ध असावं लागतं!" कृष्णंभट म्हणाले. या त्यांच्या वक्तव्याने आलेला राग चेहऱ्यावरच्या लोचटपणाच्या मागे लपवित विष्णूभट त्यांच्या मार्गातून बाजूला झाले.

पुढच्या पडवीत येताच त्यांनी सवयीप्रमाणे "अहो…." अशी हाक दिली. "पायावर घ्यायला पाणी आणा" अशी आज्ञा आणि "पूजेची तयारी झाली का?" असा प्रश्न असे दोन अर्थ त्या हाकेमागे आहेत, हे रुक्मिणी वहिनींना सरावाने माहित होते. स्वत:ची आन्हिके उरकून त्यांनी केंव्हाच पूजेची तयारी करून ठेवली होती.

पायावर पाणी घेऊन कृष्णंभट देवघरात गेले आणि रुक्मिणी वहिनी त्यांच्या रोजच्या कामाला लागल्या. गार्गी त्याआधीच शाळेत निघून गेली होती. मुलांना आणि मुलींनाही आधुनिक विद्या शिकवलीच पाहिजे असे स्वत: कृष्णंभटांचे मत होते आणि त्यानुसार त्यांनी गार्गीलाही कन्याशाळेत दाखल केले होते. ब्रह्मवृंदात याविषयी औपरोधिक कुजबूज असली तरी कृष्णंभटांसमोर शब्द काढण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती.

घरातल्या देवांची पूजा आटोपून भट गुरुकुलात गेले. विद्यार्थ्यांना संथा देऊन आणि ठरलेली कार्ये उरकून ते जेंव्हा घरी आले तेंव्हा सूर्य चांगलाच डोक्यावर आला होता. अंगणात गार्गी एका लहानग्या मुलाला खेळवत बसली होती. "काय गं, कोणाचा हा? अनुसूयेचा का?" असे म्हणतच ते घरात शिरले. स्नानसंध्या आणि भोजन उरकून ते पुन्हा एकदा सोप्यात आले, तेंव्हाही गार्गी त्या लहानग्याला पडवीत एका दुपट्यावर ठेवून खेळवित बसली होती. त्यांच्या पाठोपाठ रुक्मिणी वहिनी देखील पदराला हात पुसत पुसत बाहेर येतच होत्या.

"गार्गी, कोणाचं मूल आहे हे? याची आई कुठे गेली? आणि तुला काही अभ्यास वैगरे नाही का?" भटांनी विचारले.

गार्गी काहीच बोलत नाही असे बघून त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने रुक्मिणी वहिनींकडे बघितले. वहिनी सुद्धा काही न बोलता गार्गीकडे आणि मुलाकडे बघत राहिल्या. काही क्षण असेच गेले. भटांच्या नजरेतली वाढती जरब लक्षात येताच वहिनी पटकन म्हणाल्या, "अहो, शाळेबाहेरच्या चौकात एक बाई "थोडा वेळ सांभाळ, मी इतक्यातच आले" असं म्हणून याला गार्गीच्या हाती देऊन गेली. बराच वेळ ती आली नाही तेंव्हा ही त्याला घेऊन घरी आली."

"म्हणून त्याला काय घरी घेऊन यायचं का?" हे कोण कोणाचं मूल आहे कुणास ठाऊक?"

गार्गीचा रडकुंडीला आलेला चेहरा पाहून वहिनी पुढे म्हणाल्या, "अहो तिने विचारलं होतं त्या बाईला. ब्राह्मणाचीच होती ती बाई!"

भटांनी गार्गीकडे बघताच गार्गी रडत रडत म्हणाली, "हो बाबा!"

"काही झालं तरी हे मूल आपल्याला घरी ठेवता येणार नाही." शांत परंतु दृढ स्वरात भट म्हणाले.

"त्याच्या आईचा ठावठिकाणा शोधावाच लागेल! आजचा दिवस राहू दे फार झालं तर! उद्याच मी फौजदारांना बोलावून याच्या आईचा शोध घ्यायला सांगतो."

दुसऱ्या दिवशी भटांनी फौजदारांना बोलावणे पाठविले आणि फौजदारांशी चर्चा करून त्या मुलाच्या आईचा तातडीने शोध घेण्यासाठी त्यांना विनंतीवजा आज्ञा केली.रोजच्या कामांमध्ये असेच काही दिवस गेले. बाळाचे दर्शन शक्यतो भटांना होऊ नये किंवा त्याचे रडणे त्यांच्या कानावर जाऊ नये याची मायलेकी कसोशीने काळजी घेत होत्या. कधी त्याचा विषय निघालाच तर कमीत कमी चर्चा होईल असे रुक्मिणीवहिनी बघत होत्या. भट सतत फौजदारांकडे चौकशी करतच होते; परंतु बाळाच्या आईचा काहीच पत्ता लागत नव्हता.भटांनी जेंव्हा फौजदारांना एखादं योग्य अनाथालय बघण्यास सांगितलं तेंव्हा मात्र रुक्मिणी वहिनींच्या काळजाचं पाणी पाणी झालं.

त्या दिवशी रात्री कृष्णंभटांचे पाय चेपून देत असताना रुक्मिणी वहिनींनी हलकेच विषय काढला. "मी काय म्हणते आहे, बघा म्हणजे आपल्याला पटतं का? माझ्या आपल्या सुमार बुद्धीला काय वाटलं ते बोलते हो मी! आपणच नेहमी म्हणता ना, की प्रत्येक घटनेच्या मागे काही ईश्वरी प्रयोजन असतं म्हणून?" भटांनी जरासे रागावूनच बघता त्यांनी विषयाला हात घातला, "बाळाला आपल्या गार्गीच्या हाती सोपवून तिला त्याला आपल्या घरी घेऊन येण्याची बुद्धी देण्यामध्ये सुद्धा काही ईश्वरी प्रयोजन नसेल कशावरून? आणि या ब्राह्मणाच्या मुलाला आपल्यासारख्या महापंडिताकडून शास्त्र ज्ञान व्हावे असा तर ईश्वरी संकेत नसेल ना?"

भट काहीच बोलत नाहीत असे बघून 'मौनं संमती दर्शनं' हे ताडून वहिनींनी आपले पालुपद पुढे चालूच ठेवले. "मी तर बाळाचे नावसुद्धा योजले आहे - 'कार्तिकेय'! ज्याला एकापेक्षा जास्त मातांची माया मिळाली असा 'कार्तिकेय'!" असं म्हणून त्या कृष्णंभटांकडे प्रतिक्रियेसाठी बघू लागल्या आणि प्रयत्न करून देखील भटांना आपल्या चेहऱ्यावर आलेले स्मित लपविता आले नाही, तेंव्हा त्या अगदी निर्धास्त झाल्या!

कळत नकळत भटांनाही बाळाचा लळा लागू लागला. जरी ते लेकीच्या आणि बाळाच्या खेळाकडे दुर्लक्ष केल्यासारखे दाखवित असत तरी बाळाच्या बोबड्या बोलांमुळे त्यांचेही मनोरंजन होऊ लागले. रुक्मिणी वहिनी तर बाळाचे सर्व काही करण्यामध्ये अगदी गुंगूनच गेल्या, आणि बघता बघता चारेक वर्षे कशी निघून गेली ते कळले सुद्धा नाही.

भट घरी येताच लहानगा कार्तिकेय त्यांच्या मागे मागे करून आणि "बाबा, असे का? बाबा, तसे का?" असे प्रश्न विचारून भंडावून सोडत असे! पहाटे लवकर उठून पूजेच्या वेळी त्यांच्या बाजूला बसून काळजीपूर्वक तो पूजाविधीचे निरीक्षण करीत असे.

घरच्या देवांची पूजाअर्चा आटोपून कृष्णंभट बाहेरची कार्ये करण्यासाठी बाहेर पडण्याची तयारी करत असताना रुक्मिणी वहिनींनी "कार्तिकेय आता चार वर्षांचा झाला……. दत्तक विधानाचे बघायला हवे काहीतरी…… " शी काही अस्पष्ट पुटपुट चालविली होती पण भटांच्या त्रासिक मुद्रेकडे बघून त्या गप्प झाल्या. भटांनाही हे पटत होते, नाही असे नाही, पण या बाबतीत त्यांचा निश्चित निर्णय होत नव्हता.ब्रम्हवृन्दातील काही वयोवृद्ध ब्राह्मणांशी या विषयी चर्चा करावी, असा विचार करत ते घराबाहेर पडले.

बाहेरची कार्ये करून, घरी येऊन माध्यान्ह संध्या आणि भोजन आटपून ते सोप्यावर विश्रांतीसाठी काही वेळ कलंडले असतील नसतील, तोच दिंडीबाहेरच्या गलबल्याने त्यांना जाग आली. कानोसा घ्यायला ते पडवी ओलांडून अंगणात आले, तोच त्यांना दिंडीतून आत शिरणारे दोन पोलिस शिपाई, दोन मुस्लिम महिला आणि त्यांच्या मागून दिसेल न दिसेल असे चालणारे विष्णूभट असे दृश्य दिसले. अंगणात ही सर्व मंडळी पावले दोन पावले शिरली नसतील, तोच कृष्णंभटांनी त्यांना 'तिथेच थांबा' अशी खूण हाताने केली आणि स्वत: त्यांच्यापर्यंत पोहोचले.

मागून आलेले विष्णूभट स्वत:च्या चेहऱ्यावर शक्य तितके साळसूदपणाचे भाव आणून, त्यापैकी एका पोलीस शिपायाला हाताने स्पर्श करून बोलण्यासाठी खुणावत होते. परंतु त्यातील थोडी वयस्क दिसणारी मुस्लिम महिला आपणहून पुढे झाली आणि म्हणाली, "तकलीफ के लिये मुआफ़ी चाहती हूँ, पंडितजी। मैं मेहरुन्निसा, हमीद चौकमें यतीम मुस्लिम औरतोंके लिए पनाहगाह चलती हूँ। ही माझ्याबरोबर आलेली झुबेदा…… आपके घरमें जो बच्चा पल रहा है, यह उसकी माँ है ऐसा उसका कहना है।"

मघा जेंव्हा ते सोप्यावर कलंडले होते, तेंव्हा गार्गी त्यांच्या पायाशी बसून अभ्यास करीत होती. हा सर्व गलबला ऐकून तीही कृष्णंभटांच्या मागोमाग अंगणात आली होती.त्या मुस्लिम महिलेकडे पाहून गार्गीच्या चेहऱ्यावर जे काही स्तंभित भाव उमटले ते भटांच्या नजरेने क्षणात टिपले. काय बोलावे ते कृष्णंभटांना कळेना. आपल्या सर्वांगातून आगीच्या ज्वाळा निघत आहेत असे त्यांना वाटू लागले, आणि त्यांनी हाक दिली…. "अहो…."

आत बाळाला भरवत बसलेल्या रुक्मिणी वहिनींना ती हाक ऐकताच विजेचा लोळ कोसळल्यासारखेच झाले आणि हातातला घास टाकूनच त्या बाहेर आल्या. बाहेरचे दृश्य बघून काहीतरी भयंकर घडले आहे असे त्यांना जाणवले. तोच भटांचा करारी आवाज त्यांच्या कानात तापल्या सळईसारखा शिरला….

"कार्तिकेयला तयार करून बाहेर आणा!"

झाला प्रकार लक्षात यायला रुक्मिणी वहिनींना वेळ लागला नाही. आपल्या पायाखालची धरणी सरकते आहे असे त्यांना वाटू लागले, आणि लटलटत्या पायांनी त्या तशाच खिळून उभ्या राहिल्या. डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. गार्गीनेही आता त्यांचे बघून रडायला सुरुवात केली होती.

"मी काय म्हणतो आहे…. लक्षात आले नाही का?"

हे ऐकताच त्या आतमध्ये गेल्या आणि गार्गीसुद्धा त्यांच्या मागे मागे "आई……. नाही….. नाही…..नको…. नको…. !!" असे रडत रडत घरात गेली. आतमध्ये जाऊन त्यांनी कार्तिकेयला सदरा आणि विजार घातली. त्याला काहीच समजे ना, आई आणि ताई का रडत आहेत ते! वहिनींनी एका पिशवीत त्याचे काही कपडे भरले, एका डब्यात त्याचा आवडता खाऊ भरला आणि त्याला घेऊन त्या बाहेर जाऊ लागल्या. डोळ्यांना संततधार लागली होती. गार्गी त्यांच्या पायाशी लागून "आई…… नको….. नको …..!!!" असे म्हणून आकांड करू लागली. हे सर्व बघून आता कार्तिकेयही हमसाहमशी रडू लागला होता.

बाहेर अंगणात भट एखाद्या वठलेल्या झाडाप्रमाणे उभे होते….. निश्चल!!

वहिनी बाहेर आल्या, पण त्यांचे पाऊल पडवीच्या पायऱ्या उतरून खाली यायला धजेना, तेंव्हा भटच फिरून परत आले आणि त्यांनी कार्तिकेयला वहिनींच्या हातातून सोडवून घेतले आणि ते मुस्लिम महिलांच्या दिशेने जाऊ लागले. गार्गीने धावत येऊन त्यांच्या पायाला घट्ट मिठी घातली आणि ती मोठ्यामोठ्याने रडू लागली, "बाबा, नको…… नको…… नको…… बाबा!!" भटांनी तिला हाताने दूर सरले आणि कार्तिकेयला त्या महिलांच्या हाती सोपवू लागले. ते कार्तिकेयला सांगू लागले, "तुला यांच्याबरोबर जायचे आहे….. बाळ…..!!" कार्तिकेयाने त्यांना घट्ट मिठी मारली आणि तो आणखीच हमसाहमशी रडू लागला!! आणि बोबड्या बोलात "मला नाही जायचं…… बाबा….. मला नाही जायचं!!"

आई….. ताई…… सांग ना…… !!!" असा आक्रोश करू लागला!!

मोठ्या कष्टाने भटांनी त्याची मिठी सोडवून त्याला झुबेदाच्या सुपूर्द केले. ती पटापट त्याचे पापे घेऊ पाहत होती पण तो तिला आपल्या छोट्या हातांनी मारू लागला, आणि पुन्हा पुन्हा भटांकडे झेपावू लागला. तिला अगदीच आवरेनासा झाला, तेंव्हा मेहरुन्निसाने त्याला घेतले आणि ती परतीच्या दिशेने वळली. वहिनी आता पडवीच्या खांबाला धरून कोसळल्या होत्या आणि त्यांच्या रडण्याला खंड नव्हता. गार्गी त्यांच्या कुशीत शिरून हमसाहमशी रडत होती! आणि भट दिंडीच्या चौकटीला धरून कार्तिकेयाला घेऊन जाणाऱ्या महिलांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे पाहत उभे होते…… एखाद्या पाषाणमूर्तीप्रमाणे!!

थोड्या वेळाने ते परत वळले, आणि सोप्यावरचे आपले उपरणे खांद्यावर घेऊन त्यांनी खाली उतरून पायात खडावा घातल्या. ते बघून रुक्मिणी वहिनींनी त्यांना रडतच विचारले, "अहो, कुठं निघालात?"

पण त्यांना काही उत्तर न देताच भट तरातरा चालत बाहेर पडले सुद्धा!

त्यांच्या पाठी पाठी वहिनी दिन्डीपर्यंत गेल्या आणि थबकल्या. त्यांनी खुणेनेच गार्गीला जवळ बोलावले आणि हातानेच तिला वडिलांच्या पाठीमागे जाऊन ते कुठे जात आहेत ते बघून परत येण्यास सांगितले. कृष्णंभट कुठलेही अतार्किक कृत्य करणार नाहीत याचा त्यांना पूर्ण विश्वास होता, पण पत्नीधर्माला अनुसरून त्यांना काळजी वाटत होती. काही अंतर गार्गी आपल्या पित्याच्या पाठी गेली आणि ते कुशावर्ताकडे जात आहेत असे पाहून ते सांगायला परत आली. भटांनी कुंडावर पोहोचताच आपले उपरणे काठावर ठेवले, आणि ते हळूहळू कुंडाच्या पाण्यात कंबरभर जाऊन उभे रहिले. तोंडाने काहीसे पुटपुटत त्यांनी अर्घ्य द्यायला सुरवात केली. किती तास ते असे उभे होते कुणास ठाऊक? दिवेलागणीच्या काही वेळ आधी त्यांनी तीन डुबक्या पाण्यामध्ये घेतल्या आणि ते परत फिरले.येताना ते गुरुकुलात शिरले आणि त्यांच्या एका आवडत्या शिष्याला त्यांनी सूचना केल्या. पुढच्या एक मासात ज्यांच्या घरी कार्ये होती त्या घरांची यादी देऊन त्याला त्या त्या घरी जाऊन गुरुजींना ही कार्ये करण्यास जमणार नसल्याचे सांगावे आणि पर्यायी व्यवस्था म्हणून गुरुकुलातील योग्य ते शिष्य ही कार्ये करण्यासाठी येऊ शकतील, असा निरोप देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे गुरुजी पुढचा एक मास व्रतस्थ असल्यामुळे येऊ शकणार नाहीत असाही निरोप त्यांनी दुसऱ्या एका शिष्याकरवी जहागिरदारांच्या वाड्यावर धाडला.

घरी आल्यावर काहीही न बोलता त्यांनी स्वत:च पायावर पाणी घेतले, आणि ते तडक देवघरात गेले. देवांसमोरच्या समईमध्ये त्यांनी तेलवाती लावल्या, तेल घातले, त्या पेटविल्या आणि देवांसमोर बसून राहिले. वहिनींना त्यांची चाहूल लागलीच होती, परंतु काही विचारायचे धैर्य त्यांना होत नव्हते.

आज माघ पौर्णिमा होती. भटांनी देवघरातल्या ग्रंथांच्या बासनातील एक पोथी काढली आणि ते वाचन करू लागले. थोड्या वेळाने उठून त्यांनी अंगणामध्ये तीन दगडांची चूल बनवली. स्वयंपाकघरातील एक पातेले आणि दोन मुठी तांदूळ आणले आणि त्यांनी त्या चुलीवर ते शिजत ठेवले. पुन्हा जाऊन ते देवघरात पोथी वाचन करू लागले.

सूर्यास्त होऊन आता अंधार पसरू लागला होता. गार्गी रडून रडून झोपी गेली होती आणि वहिनी विमनस्कपणे बसून होत्या. काही वेळाने उठून त्या देवघरात गेल्या. काही बोलणार इतक्यात त्यांची चाहूल लागून भटांनीच त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना खुणेनेच ते स्वत: जेवणार नसल्याचे सांगितले.

वहिनी काही न बोलता स्वयंपाकघरात गेल्या आणि गार्गीसाठी म्हणून त्यांनी काही तांदूळ आणि डाळ शिजत लावली. चुलीवरच्या भाताची रटरट होऊ घातलीच होती, तेंव्हा भटांनी पोथी बंद केली आणि ते चुलीपाशी आले.
ते पातेले त्यांनी चुलीवरून उतरविले. मग एक केळीचे पान घेऊन त्या शिजलेल्या भाताचे त्यांनी पंधरा घास करून त्या पानावर मांडले. मग पाण्याचा तांब्या भरून ते चंद्रोदयाची वाट पाहत अंगणात आसनावर बसून राहिले. चंद्रदर्शन होताच त्यांनी चंद्राला वंदन करून आणि गायत्री मंत्राचा जप करून ते पंधरा घास ग्रहण केले, आणि पाणी पिऊन उठले. अंगणामध्ये शतपावली करत ते तोंडाने अस्पष्ट आवाजात मंत्रोच्चारण करीत राहिले.

रुक्मिणी वहिनींनी गार्गीला उठवून कशीबशी तिची समजूत घालून तिला खाऊ घातले. झोपेतच असेलली गार्गी जेवून परत झोपी गेली. वहिनी झाकपाक करून बाहेर पडवीत आल्या आणि काही न बोलता भटांकडे बघत बसून राहिल्या. थोड्या वेळाने भट वर आले आणि सोप्यावर सतरंजी अंथरून त्यावर लवंडले. वहिनी त्यांचे पाय चेपायला आल्या तोच पाय आखडून घेऊन त्यांनी हातानेच "नको" अशी खूण केली. त्याबरोबर वहिनींचा बांध पुन्हा एकदा फुटला, "मला क्षमा करा. माझी चूक झाली…….

पण त्याची शिक्षा आपण स्वत: घेऊ नये….."

"तुमच्यातल्या मातृसुलभ वात्सल्याने कर्तव्यदक्षतेवर मात केली. ममत्वाचे माहात्म्यच तसे आहे. आपण खेद करू नये!" भट म्हणाले. "माझे व्रत आहे पुढच्या मासभर, त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवू नये, आणि हो, आपण जेवून घ्या!"

काही दिवसातच बघता बघता कृष्णंभटांच्या व्रताची गोष्ट चहुकर्णी झाली. दिवसभरचा उपवास, ग्रंथ वाचन, रात्री तिथीच्या संख्येएवढे फक्त भाताचे घास, ब्रह्मचर्य आणि मितभाषा!

माघ कृष्ण पंचमीला गंगाधरपंत जहागीरदार गावातील काही प्रतिष्ठित ब्राह्मणांना घेऊन कृष्णंभटांच्या भेटीला आले. काही साधक बाधक चर्चा झाल्या. कृष्णंभटांनी त्यात अगदी मोजका असा भाग घेतला. चर्चेमध्ये ऐन भरात आलेला स्वातंत्र्य लढा आणि त्याला लागलेले हिंदू - मुस्लिम यांमधील वाढत्या तणावाचे गालबोट, मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी असाही विषय होता. शेवटी कृष्णंभटांचे हे व्रत कुठले असा विषय निघालाच आणि भटांना विचारता त्यांनी स्मितहास्याने प्रश्नाला बगल दिली. तेंव्हा एका ज्येष्ठ परिचितांनी "हे चांद्रायण व्रतच ना?" असे विचारता यावरही भटांनी स्मितच केले. यावर प्रायश्चित्त घेण्यासाठी असे व्रत करतात, अशीही माहिती त्या ज्येष्ठ परिचितांनी पुरविली. "कसले प्रायश्चित्त" यावर चर्चा येण्यापूर्वीच सुज्ञपणे गंगाधरपंतांनी "आता कृष्णंभटांना विश्रांती घेऊ द्या आणि आपण निघावे" अशी आज्ञा सर्वांना केली. दिवसेंदिवस व्रताच्या कष्टाने भटांना क्षीणपणा जाणवू लागला होता. रोज हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाढती तेढ आणि काही ठिकाणी उसळलेले दंगे यासंबंधीच्या वार्ताही कानावर येत होत्या. भटांच्या मनामध्ये कसला तरी अनामिक घोर लागून राहिला होता आणि व्रतामुळे त्यांना मन:शांती काही लाभत नव्हती. असे करता करता फाल्गुनातील वद्य त्रयोदशी उगवली. उद्या व्रताच्या उद्यापनाचा दिवस.

गंगाधरपंतांसहित गावातील काही जवळच्या परिचितांना उद्याचे उद्यापनाच्या भोजनाचे आमंत्रण अगोदरच गेले होते. राम प्रहर उलटल्यानंतर भट विश्रांती घेत पडले होते, तितक्यात त्यांना दिंडीबाहेरून कोणी हाक घालत आहे असे वाटले आणि ते बघायला पुढे गेले. दिंडीबाहेर एक मनुष्य अदबीने उभा होता. प्रश्नार्थक मुद्रेने भटांनी त्याच्याकडे पाहताच दोन पावले सरकून दबक्या आवाजात तो म्हणाला, "हुजूर, मला मेहरुन्निसासाहिबा यांनी पाठविले आहे. झुबेदाका पैगाम आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे पनाहगाह बहोत तकलीफमध्ये आहे. आपल्याला येऊन मुलाला घेऊन जायची अजीजीने दर्ख्वास्त केली आहे!!! ते लोक परसो पनाहगाह खाली करून जाणार आहेत!"काय बोलावे हे भटांना कळेना. ते त्या माणसाकडे पाहतच राहिले.

"काय उलटा पैगाम घेऊन जाऊ, पंडितजी?" त्याने विचारले. काही न बोलताच कृष्णंभटांनी त्याला हातानेच परत जाण्याचे सुचविले आणि ते परत त्याच्याकडे कोऱ्या नजरेने पाहत राहिले. काही वेळ घुटमळून तो निराश मुद्रेने परत फिरला. कृष्णंभट सुद्धा परत घराकडे वळले. परत येऊन ते सोप्यावर सतरंजीवर पडून आढ्याकडे पाहत
राहिले. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी त्यांनी स्नानसंध्या केली आणि व्रताचे उपचार सुरु केले. पण त्यांचे कशातच खरे लक्ष नव्हते. रात्री त्यांना झोप लागली नाही. रात्रभर ते आरण्यक वाचत राहिले. "असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय।।….."

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रुक्मिणी वहिनींची लगबग सुरु झाली. ब्राह्मणभोजनाची तयारी म्हणजे काही सोपे काम नव्हे. अंगणात शिष्यवृन्दाने यज्ञाची तयारी चालविली होती. भटदेखील उपचाराप्रमाणे सर्व कामे करत होते, आणि शिष्यांना मार्गदर्शन करीत होते. पण खरे तर त्यांचे कशातच लक्ष नव्हते. यज्ञ सुरळीतपणे पार पडला. ब्राह्मण भोजनात ब्राह्मण तृप्त झाले. रुक्मिणी वहिनींना तर मणाचे ओझे डोक्यावरून उतरल्याप्रमाणे मोकळे वाटत होते.

कृष्णंभटांना अत्यंत थकवा आला होता आणि ते झोपले होते. रुक्मिणी वहिनी त्यांच्या पायाशी बसून त्यांचे पाय चेपून देत होत्या. दुसऱ्या प्रहरानंतर भट उठले आणि त्यांनी नित्यकर्मे उरकली. नंतर विमनस्कपणे ते सोप्यावर बसून राहिले. त्यांना खूपच थकवा आला असणार असा कयास करून सुज्ञपणे काही न बोलता रुक्मिणी वहिनी आपली कामे करीत होत्या, आणि गार्गी सुद्धा तिच्या नेहमीच्या उद्योगामध्ये गुंगली होती. का कुणास ठाऊक, भटांच्या कानात एकच सूक्त रुंजी घालत होते….. "असतो मा सद्गमय…… तमसो मा ज्योतिर्गमय…… "

रात्रीचे जेवणदेखील अशाच शांततेत पार पडले. शतपावली करून भट झोपायच्या खोलीत गेले आणि पलंगावर पडताना त्यांना अचानक खूप ग्लानी आली. डोळ्यासमोर एक प्रकाश पसरला, आणि त्यांच्या तनामनाला व्यापून एकाच सूक्त घुमत होते…… "असतो मा सद्गमय…… तमसो मा ज्योतिर्गमय…… "

पहाटे कृष्णंभट लवकरच उठले. नेहमीप्रमाणे त्यांनी गोदावरीकडे प्रस्थान केले. सर्व नित्यकर्मे करून ते गुरुकुलात गेले, आणि त्यांनी एक शिष्याकरवी कुशाभाऊ टांगेवाल्याला निरोप घातला. विद्यार्थ्यांना संथा देऊन झाली, तेंव्हा कुशाभाऊ टांगा घेऊन गुरुकुलाबाहेर उभाच होता. भटांनी त्याला टांगा हमीद चौकाकडे घ्यायला सांगितला आणि तो भटांकडे आश्चर्याने पाहतच राहिला. भटांनी जेंव्हा त्याच्याकडे थोडे कडकपणे पाहिले तसा तो वरमला आणि त्याने चाबूक हवेत फडकवला. टांगा हमीद चौकाकडे घेऊन जाणाऱ्या हमरस्त्याला जोडणाऱ्या छोट्या रस्त्याच्या दिशेने चालू लागला.

('धर्म' या हिंदी कलात्मक चित्रपटावर आधारित)












- निरंजन भाटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा