सिंगापूरची ५० वर्षे

सिंगापूर ह्या छोट्याश्या बेटराष्ट्राला १९६५ मध्ये मलेशियापासून क्लेशकारक फाळणी होऊन स्वातंत्र्य मिळाले. सुरुवातीला आलेल्या वांशिक दंगली आणि कम्युनिस्टांचा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न अशा अडचणींवर मात करून हा देश खंबीरपणे आणि आत्मविश्वासानी प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर झाला आणि अवघ्या ५० वर्षांच्या कालावधीत, आपण आज पाहतो ते वैभवशाली सिंगापूर झाला.

६० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत सिंगापूरचे बहुतांश नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये अथवा बैठ्या घरांत राहत होते. प्रधानमंत्री श्री ली क्वान यू यांच्या नेतृत्वाखालील PAP सरकारच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक होतं घरांचा दर्जा सुधारणं. सिंगापूरच्या नागरिकांना परवडतील अशी घरं उपलब्ध करून देण्यासाठी गृहविकास संचालनालय (HDB) स्वातंत्र्यपूर्व काळात १९६० मध्येच स्थापन करण्यात आलं होतं. ६० च्या दशकाच्या मध्यावर सुरु झालेल्या गृहविकास संचालनालयाच्या गृहसमूहांनी सिंगापूरचं चित्र पालटलं आणि सिंगापूरमध्ये उंच बहुमजली बांधकामांना सुरुवात झाली.
Esplanade Theaters Under Construction (1997) 
नोकऱ्या निर्माण व्हाव्यात आणि आर्थिक प्रगती व्हावी यासाठी सरकारने आक्रमक कारखानदारी धोरण अवलंबले आणि निर्यातप्रधान उद्योगांना चालना दिली. औद्योगिक प्रभाग तयार करण्यात आले; जुराँग त्यातला सर्वात मोठा होता. आर्थिक विकास संचालनालय (EDB) सरकारच्या आर्थिक विकास योजना राबवण्यासाठी स्थापन करण्यात आले. त्याने सिंगापूरला व्यापारोन्मुख राष्ट्र म्हणून प्रसिद्ध करत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा चंग बांधला. त्याचे प्रयत्न बव्हंशी यशस्वी झाले आणि सिंगापूरच्या औद्योगिक प्रगतीला चालना मिळाली. ७० च्या दशकाच्या मध्यावर सिंगापूरने शेल आणि एक्सनमोबिल (पूर्वीची एसो) सारख्या तेल कंपन्यांना शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी आमंत्रित केले आणि अशा तऱ्हेने ते जगातील एक मोठे तेल शुद्धीकरण केंद्र झाले.

Esplanade Theaters - Now
८० च्या दशकाच्या सुरुवातीला चांगी विमानतळ सुरु झालं आणि त्याला जागतिक दर्जाच्या सिंगापूर एअरलाईन्सची साथ लाभल्यानं सिंगापूर एक महत्त्वाचे प्रादेशिक वैमानिक दळणवळणाचे केंद्र झाले. ह्याच काळात सिंगापूर बंदर जगातील खूप जास्त आवक जावक असलेल्या बंदरांपैकी एक झाले. सेवा उद्योगांनी ८०-९० दशकांदरम्यान मूळ धरले आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती चालू आहे. सिंगापूर एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणूनही नावारूपाला येऊ लागले. दरम्यान, इतर स्पर्धकांच्या चार पावलं पुढे राहण्याच्या दृष्टीनी सिंगापूरच्या उद्योगांनी हळूहळू अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे बनवण्यावर भर द्यायला सुरुवात केली.
Old Place of The Merlion
मर्यादित जमीन आणि पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या हिश्याकरता सिंगापूर मलेशियावर अवलंबून होते. पाणीपुरवठ्याच्या हमीचं महत्त्व लक्षात घेऊन सिंगापूर सरकारनं अपारंपरिक स्रोतांचा वापर करत मलेशियावर अवलंबून राहणं कमी करायला सुरुवात केली. २००३ पासून "NEWater " प्रकल्प टप्प्याटप्प्यानं विकसित करण्यात आले आणि सांडपाण्यापासून प्यायचं पाणी तयार करता येऊ लागलं. समुद्राच्या पाण्याचे ताजे पाणी करण्यासाठी क्षार निर्मूलन प्रकल्प उभारण्यात आले. २०१० मध्ये बांधण्यात आलेल्या मरीना बंधाऱ्यानं 'मरीना बे' ला मुख्य समुद्रापासून वेगळं करून सिंगापूरचा १५वा पाणीसाठा तयार करण्यात आला.

सिंगापूरचे रहिवासी स्थानिक दळणवळणासाठी मुख्यतः सार्वजनिक वाहनव्यवस्थेचा वापर करतात. सिंगापूरच्या सार्वजनिक जलद वाहतूक (MRT) विभागानी ८० च्या दशकाच्या शेवटाकडे कामाला सुरुवात केली आणि आजतागायत नवीन मार्ग स्थापन करत ते जाळे वाढते आहे.
The Merlion - Now

२००५ मध्ये सरकारने पर्यटनाला आणखी चालना मिळावी यासाठी कॅसिनोना परवानगी दिली. ह्यामुळे सिंगापूरच्या दोन मनोरंजन केंद्रांच्या (Integrated Resorts) निर्मितीचा मार्ग खुला झाला - रिसॉर्ट्स वर्ल्ड सॅंटोसा आणि मरीना बे सँड्स. सिंगापूरमधलं आधुनिक बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यानं नटलेलं आहे. उदाहरणार्थ, एसप्ल्नाड थिएटर्स किंवा मरीना बे सँड्स. २००८ पासून सिंगापूरनी फॉर्म्युला १ ग्रांप्रि स्पर्धेचं यजमानपद भूषवायलाही सुरुवात केली.

आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सिंगापूरला कामाकरता येणाऱ्या भारतीयांची वाढती संख्या - आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसकट. आता भारतीय सणवार आणि सांस्कृतिक कार्यक्रम बेटभर मोठ्या उत्साहानी आणि धूमधडाक्यात साजरे होतात - मग ती होळी असो, गणेशोत्सव, गरबा / दांडिया किंवा दिवाळी. अनेक भारतीय शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांनी मागच्या दशकात सिंगापूरमध्ये त्यांच्या शाखा उघडल्या आहेत आणि त्या यशस्वीरीत्या चालू आहेत.
MBS Under Construction        
मागच्या ५० वर्षात सिंगापूर खूप बदललं आणि अजूनही बदलतं आहे. तसं सगळं जगच बदलतंय पण इतर देशांच्या तुलनेत सिंगापूर ठळकपणे नजरेत भरतं ते त्याच्या बदलाच्या भन्नाट वेगामुळे. सिंगापूरने स्पर्धेत पुढे राहण्यासाठी सतत बदल आणि नूतनीकरणाचं महत्त्व सिद्ध केलं आहे. हे सर्व सकारात्मक बदल सिंगापूरच्या नेत्रदीपक यशाचे द्योतक आहेत. समर्थ, द्रष्टे नेतृत्व, परिणामकारक अनुशासन, सक्षम सरकारी नोकरवर्ग, आणि नागरिकांचा खंबीर पाठिंबा यामुळे सिंगापूर आपली यशोगाथा पुढच्या ५० वर्षात निश्चितपणे एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल.

MBS Now














- भरत मोडक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा