महाकवी सावरकर


महाकवी सावरकर

माझी आई तिची अंघोळ झाल्यावर ओळीने काही स्तोत्रे म्हणत असे. त्या लयीत एकीकडे तिची कामेही चालू असत. त्या स्तोत्र मालिकेतील शेवटचे होते ते मला खूप आवडायचे. लहानपणी अर्थ तर काही कळायचा नाही; पण सगळ्या संस्कृत श्लोकानंतर मराठीचे शब्द कानी आले की कसे ओळखीचे कोणी भेटल्यासारखे वाटायचे. आई म्हणायचीही ते खूप छान...अगदी मनापासून. म्हणजे अजूनही म्हणत असते पण आता ते ऐकायला मीच तिथे नसते.
ते शब्द होते :
अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती
कोण तयांची महती गणती ठेविली असे.
परी जे गजेन्द्रशुंडेने उपटिले, श्रीहरीचरणी अर्पण केले
कमलपुष्प ते अमर ठेले, मोक्षदायी पावन
अमर होय ती वंशलता, निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरे सुगंधिता, लोकहित परिमलाची.

अर्थ कळायच्या आधीच रोज ऐकून ऐकून ते शब्द पाठ झाले होते. त्या शब्दांत होतेच तसे काहीतरी खास.. त्याची लय गुंगवून टाकणारी नव्हती तर खडखडीत जागे करणारी होती ! मोठे झाल्यावर कळले की ही कविता आहे. कोणाची असेल ही कविता? कोणी लिहिले असतील इतके प्रेरणादायी शब्द, की ज्यांच्या तेजाने कवितेला स्तोत्राचे महत्व प्राप्त व्हावे? मग कळले की ती कविता आहे स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर ह्यांची.
कविता म्हणजे नक्की असते काय? मनात एक सतत वाहणारा झरा? कधी खळखळणारा तर कधी संथ वाहणारा..कधी प्रगट होणारा तर कधी अदृश्य होणारा..जेव्हा शब्दरूप घेऊन लौकिकात अवतरेल तेव्हा कळत नकळत कवीचे प्रतिबिंब त्यात उतरलेलेच असते. अनुभूतीची अभिव्यक्ती असा हा काव्यप्रकार. त्याला वृत्त, यमक, छन्द आणि व्याकरणाचे सारे नियम एक सांगाडा पुरवतात म्हणायला हरकत नाही; पण कवितेचा आत्मा असतो तो त्या कवितेतून व्यक्त होणारा अस्सल जीवनानुभव आणि तो शब्दात मांडण्याची कवीची हातोटी.
ह्या वरच्या ओळी लिहिणाऱ्या कवीचेच आयुष्य त्या ओळीतून डोकावत नाहीये का? वैयक्तिक आयुष्याची तमा न बाळगता, राष्ट्रहिताचा ध्यास घेऊनच हा क्रांतिकारक आपले जीवन जगला.. मार्सेलिसच्या समुद्रातले साहस अयशस्वी झाल्यावरही, बंदिवान अवस्थेत असताना, खिजवणाऱ्या, त्रास देणाऱ्या पहारेकर्‍यांना ,
"अनादी मी, अनंत मी, अवध्य मी भला ।
मारील रिपु जगती असा कवण जन्मला ।'

असे म्हणू शकण्याएवढे आत्मबल व दृढनिर्धार हा महापुरुष दाखवून गेला. एकाकी अवस्थेत, शत्रुच्या कैदेत असताना, सगळ्या छळाला सामोरे जातानाही ते तेज झाकोळले नाही.
त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की भारतीय राष्ट्राच्या आकांक्षांशी माझे जीवन एकरूप झाले आहे असे मला लहानपणापासूनच जाणवले होते. त्यांची हीच भावना त्यांच्या एका कवितेच्या ओळीत आपल्याला दिसते,
"राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची, ईर्ष्या निजांतरी धरुनी करावयाची..
हिन्दुभू परम श्रेष्ठास न्याया, आम्ही कृती नित करू झिजावोनी काया'

ह्या ध्येयासाठी आपले सर्वस्व ते मातृभूमीच्या चरणी अर्पण करतात. सर्व संकटाना सामोरे जातात. संकटाची पर्वा इथे आहे कोणाला? ते लिहितात,
"की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने
जे दिव्यदाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे'
सतत ध्यास उन्नततेचा, मातृभूच्या स्वातंत्र्याचाच ...त्या शिवाय मनात दुसरा विचार नाही. दुसरे उद्दिष्ट्य नाही. पारतंत्र्यात त्यांचा जीव तळमळत होता. स्वतंत्रता..हीच देवी..तिची कीर्ती, तिचे गुणगान गाऊन झाल्यावर त्यांना तिला प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही.
"ही सकळ-श्री-संयुता आमची माता भारती असता
का तुवा ढकलुनी दिधली
पुर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, का तू त्यजिले उत्तर ह्याचे दे
स्वतंत्रते भगवति | त्वामहमं यशोयुतां वंदे ||'

स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यात आदर्श कोण? तर अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची जयगाथा सावरकर आळवतात आणि मग मागणे मागतात
"दे पुन्हा मंत्र तो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा'

ही कविता कधी लिहिली असेल त्यांनी? शाळेत असताना!! बालवयापासून त्यांच्याजवळ अपार शब्दवैभव होते.
"हे हिंदू-शक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा, हे हिंदू-तपस्या पूत ईश्वरी ओजा
हे हिंदू-श्रीसौभाग्यभूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा '

ह्या ओळी एक शाळकरी मुलगा लिहितो? दरवेळी ही कविता वाचताना मी अचंबित होऊन जाते. त्यांच्या असामान्य प्रतिभाशक्तीचे अजून एक उदाहरण म्हणजे "जगन्नाथाचा रथ' ही कविता.
"ऐश्वर्ये भारी.. अशा ह्या ऐश्वर्ये भारी.. महाराज अपुली कथा ना कुठे निघे स्वारी !'
विश्वनियंत्याला, जगन्नाथालाच सावरकर प्रश्न विचारत आहेत ,"कुठे निघाली स्वारी?' नक्षत्र कणांचा धुरळा उडवत, शत सूर्याच्या मशाली पेटवून ही स्वारी कुठे निघाली आहे? हे ऐश्वर्य कोणाला दाखवायचे आहे की परत फिरून निजागारी म्हणजेच स्वत:च्याच घराकडे ..मूलस्थानाकडे परत यायचे आहे. विश्वाच्या उत्पत्तीविषयी, त्याच्या प्रयोजनाविषयी विचार मांडणारी ही कविता रोमांचित करून टाकते. दरवेळी वाचताना आपण वेदातलेच काही वाचत आहोत अशी भावना मनात दाटून येते. अशी अनेक तेजस्वी गीते!! "कमला'सारखे महाकाव्य तर अगदी विपरीत परिस्थितीत त्यांनी लिहिली. लिहायला जवळ कागदही नाही. मग कोठडीच्या भिंतीवर ते सगळे लिहून काढले. मुखोद्गत केले. असामान्य प्रतिभाशक्ती आणि अभूतपूर्व स्मरणशक्ती !!
इतके सगळे साहित्य लिहूनही ते म्हणतात, "कविता हे माझे साध्य नाही साधन आहे. राष्ट्र स्वतंत्र नसेल तर तिथे न शास्त्राभ्यास होऊ शकतो न प्रतिभेची आराधना. तरुणांमध्ये तेज जागवण्यासाठी मी साहित्यनिर्मिती केली. सांगलीच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणाले होते की तरुणांना स्वातंत्र्य प्राप्तीची प्रेरणा देणारी नाटके लिहिली जावीत. स्वातंत्र्यासाठी "लेखण्या मोडा आणि हातात बंदुका घ्या' असेही त्यांनी म्हटले होते. लेखणीची ताकद आणि मर्यादा अचूक ओळखून त्याचा सुयोग्य वापर करणारा असा हा द्रष्टा पुरुष.
भाषेवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. भाषाशुद्धीचा आग्रह करीत असतानाच भाषेत नवनवे अचूक शब्द आणून मराठी भाषेला कालसुसंगत ठेवण्याबद्दल ते आग्रही होते. आपण आता रोजच्या व्यवहारात वापरतो ते कितीतरी शब्द सावरकरांनी मराठी भाषेत आणले आहेत ह्याची आपल्याला कल्पनादेखील नसते. आपले राज्य येईल, स्वराज्य असेल तेव्हा राज्यकारभाराची भाषा ही आपलीच म्हणजे मराठी असली पाहिजे हे त्यानी खूप आधीच जाणले होते आणि त्या दृष्टीने मराठी शब्द तयार करायला सुरुवातही केली होती. त्यांना भाषाप्रभूच म्हणायला हवे. तेव्हा त्यांची चेष्टा झाली होती. खूपदा अजुनही त्यांची चेष्टा होते. त्यांच्या कामाचे महत्व कळण्याचे शहाणपण यायला आम्हाला अजून किती वर्षे लागणार आहेत कोणास ठाऊक??
त्यांचे लिखाण वाचताना डोळ्यांपुढे ना रम्य दृष्ये येतात, ना युवक युवतींचा शृंगार येतो ना मोहक निसर्ग!! येते ती फक्त एक धगधगती ज्वाला ..तेज..स्फुल्लिंग..ऊर्जा.
मी शोध घेत होते, आई नेहमी म्हणते त्या कवितेच्या जन्मकथेचा. शोध घेताना हाती गवसली ती एक हृद्य कहाणी.
तात्याराव परदेशात होते. इकडे बाबाराव आणि बाळ सावरकरांना पण अटक झाली. घरची परिस्थिती फारच बिकट होऊन गेली. मालमत्ता जप्त झाली होती. सरकारच्या भीतीने नातेवाईक, ओळखीचे लोक कोणी संबंध ठेवेनासे झाले. खाण्याचेही हाल व्हायला लागले. कोणीतरी सहृदयतेने, पोलिसांना न कळू देता, मंदिरात देवापुढे ठेवण्यात आलेल्या धान्यातला वाटा घरी आणून द्यायचे. त्यावर गुजारा होत होता. येसुवहिनींनी मन मोकळे करण्यासाठी, आपल्या दिराला पत्र लिहिले. त्यात न राहवून त्यांनी विचारले, की आम्हाला तुमच्या कुळात आणलेत ते ह्या यातना सोसण्यासाठीच की काय? पत्र वाचताच सावरकर व्यथित झाले; पण त्यांनी उत्तर दिले ते मात्र जीवनसार सांगून जाते. त्यांनी लिहिले, "वहिनी, तुम्ही आम्हाला कधी आईची उणीव भासू दिली नाहीत.' मग पुढे ते लिहितात, "धन्य धन्य अमुचा वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, की रामसेवा पुण्यलेश - अमुच्या भाळी आले.' आमचे भाग्य थोर म्हणून अशी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. संसार तर काय सर्वच करतात. "अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती, कोण तयांची महती गणती ठेविली असे.' पण राष्ट्राच्या पायी वाहिलेले आयुष्य भाग्यवान. जणु अमरच झालेले.
"अमर होय ती वंशलता, निर्वंश जिचा देशाकरिता, दिगंत पसरे सुगंधिता, लोकहित परिमलाची'
दुसऱ्या एका प्रसंगी त्यानी भारतमातेला उद्देशून म्हटले आहे, "दोनच काय पण मला सात भाऊ असते न तरी आम्ही सातांनीही तुझ्याच पायावर आपले आयुष्य वाहिले असते.'
आपल्या शब्दांतून मनातली भावना अनेकांच्या मनात संक्रमित करू शकण्याइतके शब्दसामर्थ्य, अचूक शब्द योजता यावेत एवढे शब्दवैभव आणि त्या शब्दांना स्तोत्रांची शक्ती यावी असे जगलेले व्रतस्थ आयुष्य... ह्या महाकवीच्या स्मरणाशिवाय मराठी कवितेचा उल्लेख केवळ अशक्यच.
वृंदा टिळक

७ टिप्पण्या:

  1. "की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने
    लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने
    जे दिव्यदाहक म्हणोनी असावयाचे
    बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे'

    ह्या कवितेच्या पुढील ओळी मिळु शकतील का?
    लहानपणी ही कविता म्हणताना पुढे पण अजुन कवितेच्या ओळी असल्याचे आठवतय. त्या ओळी थोड्याश्या स्मरणात आहे त्या खालील प्रमाणे आहेत.
    "आले शिरावरी जरी घणघोर घाले
    दारीद्र्यदुःख अपमानही प्राप्त झाले
    कारागृही सतत वास जरी स्मरे मी
    पुजिन तरी ही निर्भय मातृभुमी


    E mai: < vgdeokar@gmail.com> विजय देवकर ७७३८१८०९९०

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. माझे मृत्युपत्र नावाची 25 कडवी आणि 100 ओळींची पूर्ण कविता आहे, त्यातील' की घेतले व्रत न हे ' हे एक कडवे आहे.

      हटवा
  2. सुंदर माहिती दिलीत धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच छान,पुन्हा पुन्हा वाचावी अशी माहिती दिलीत.पुढेही अशीच माहिती मिळत जाईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. एक छोटीसी चूक सुधारायची आहे.

    "राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची, ईर्ष्या निजांतरी धरुनी करावयाची..
    हिन्दुभू परम श्रेष्ठास न्याया, आम्ही कृती नित करू झिजावोनी काया"

    ह्या ओळी डॉ. वि. रा. करंदीकर यांच्या आहेत. ज्ञान प्रबोधिनी ह्या संस्थेच्या प्रार्थनेमधील हे पाहिलं कडवं आहे.
    प्रबोधिनी चे संस्थापक संचालक श्री. अप्पा पेंडसे यांच्या सांगण्यावरून त्यांनी ५ कडवी लिहिली.
    आणि प्रार्थनेचे शेवटचे कडवे म्हणजे सावरकरांनी लिहिलेल्या खालील ओळी.

    "की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने
    लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने
    जे दिव्यदाहक म्हणोनी असावयाचे
    बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे'

    अशी मिळून ६ कड्व्यांचि प्रार्थना तयार झाली. वि रा करंदीकर हे अप्पांचे मित्र आणि ख्यातनाम लेखक होते. त्यांनी संघाबद्दल अनेक साहित्य लिहिले आहे.

    बाकी लेख उत्तम जमला आहे

    उत्तर द्याहटवा