योगायोग

मार्च महिन्याची ३१ तारीख होती. उन्हाने जीव घाबराघुबरा होत होता. मी बँकेत आले व एसीच्या गारव्याने मन संतोषले. आज नोकरीचा शेवटचा दिवस होता. म्हणजे रिटायरमेंटचा दिवस होता. "हं, पाणी घ्या ताई " म्हणत हिराबाई पाण्याचा ग्लास धरून उभी होती. क्षणभर त्या ग्लासकडे पहाता, मला बँकेत रुजू झाल्याचा पहिला दिवस आठवला. जेव्हा मी तोंडी, लेखी सर्व परीक्षा व मुलाखती पार करून नियुक्तीचे पत्र घेण्यासाठी बसले होते. माझ्या नावाचा उच्चार करत चपराशी आला व म्हणाला, "कॅबीनमध्ये बोलावले आहे". आत गेल्यावर मॅनेजर साहेबांनी अपॉइण्टमेन्ट लेटर दिले व चपराशाने पाण्याचा ग्लास पुढे केला. त्या पहिल्या ग्लासपासून ते आजपर्यंत मी SBI चे पाणी पीत होते. काय योगायोग पहा. पहिला व शेवटचा ग्लास या दोन्ही ग्लासांनी मला बालपणाच्या आठवणीत ओढून नेले.

क्षणात शालेय जीवन डोळ्यासमोर उभे राहिले. शाळेत असताना त्यावेळी मधल्या सुट्टीत पाणी पिण्यासाठी रांगेत उभे राहून, क्रमाने पाणी प्यायचो. पाणीवाल्या बाई प्रत्येकास पाणी पिण्यास द्यायच्या. त्यावेळी हल्लीसारखे वॉटर बॉटल घेऊन जाणे फार प्रचलित नव्हते. सकाळी १० ते संध्याकाळी ५ ची शाळा असावयाची. दोन लहान सुट्ट्या व एक मोठी डबा खाण्याची सुट्टी. माझे घर शाळेच्या अगदी जवळ होते. इतके जवळ की धावत जाऊन दोन मिनिटात पाणी पिऊन येऊ शकायचे. मोठ्या डबा खाण्याच्या सुट्टीत तर मी घरी जात असे तेंव्हा आजीने पाट मांडलेला असावयाचा. खाऊ खाऊन यावयाचे. आजी माठाला स्वच्छ ओले कापड गुंडाळून, त्यावर पाण्याची धार सोडून कापड ओले ठेवावयाची, की पाणी माठात थंड राहील .कधी कधी पाण्यात वाळा टाकावयाची त्यामुळे मंद सुगंघीत पाणी मिळायचे. माझ्या मैत्रीणी पण माझ्या घरी पाणी पिण्यास यावयाच्या. असे सर्व असताना आमच्या वर्गात एक जोशी नावाची मैत्रीण होती जिचे वडील शाळेच्या जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीस होते. तर, ती नेहमी वडिलांकडे जाऊन पाणी पिऊन यावयाची व वर्णन करून सांगावयाची की मी तर माझ्या बाबांकडे जाते. मग ते चपराशास सांगून मला पाणी देतात. तो थंड पाणी आणून देतो. आत वातावरण वाळ्याच्या ताट्यानी कसे थंड असते. " ए, ऐक ना, तुला यावयाचे आहे का ,माझ्या बाबांच्या बँकेत थंड पाणी पिण्यास?" मी तिला खुशीने हो ss म्हणत मानेने होकार दिला. मग ती म्हणाली, "जाऊया तर आपण बँकेत. पण एक काम तुला करावे लागेल." मी सहजतेने विचारले, "काय ग?" त्यावर ती म्हणाली, जेव्हा जेव्हा माझा गृहपाठ बाकी राहिला असेल त्या दिवशी तू पूर्ण करून द्यावयाचा. थोडे लवकर आपण शाळेत येतोच. तेव्हा तू तो पूर्ण करून देत जा." मी लगेच म्हटले, " एवढेच ना ? करीन की त्यात काय मोठे?" ती शाळेपासून लांब रहावयाची. त्यामुळे तिचा गृहपाठ बरेचदा बाकी रहावयाचा. पण मग आमचे ठरल्याप्रमाणे मी तिला नेहमी गृहपाठ पूर्ण करण्यात मदत करावयाची व तिच्याबरोबर रीसेसमध्ये तिच्या बाबांच्या बँकेत पाणी पिण्यास जावयाची. काय मजा वाटायची त्यावेळी. तिच्या बाबांच्या बँकेत जावयाचो. बँकेत दारात शिपाई उभा असावयाचा. त्याला ती तिच्या बाबांचे नाव सांगावयाची. मग आम्ही तिच्या बाबांच्या टेबलापाशी जायचो. आम्हाला पाहून तिचे बाबा चपराशाला बोलवून सांगावयाचे की, " ये बच्चीयोंको पानी देना." मग तो पितळी स्टॅंडमध्ये स्टीलच्या ग्लासात थंड पाणी घेऊन यावयाचा. तो पाणी आणून देणार याची तसेच आजूबाजूच्या टेबलखुर्च्या, त्यावर काम करणारे लोक, हे पाहून मजा वाटायची. पुढे त्या मैत्रिणीच्या वडिलांची बदली झाली असावी आणि मी पण पुढे तिला विसरले.

पुढे मी माझे प्राथमिक शिक्षण, हायस्कूलचे तसेच महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केले. पदवीधर झाले. नोकरीसाठी अर्ज करत होते. अर्ज करीत असता योगायोगाने त्याच बँकेत पुढे नोकरीस लागले. जेव्हा मैत्रीणीबरोबर पाणी पिण्यास येत होते तेव्हा कधी तरी वाटले होते का की पुढे त्याच SBI चे मी ३१-३२ वर्षे पाणी पिणार होते म्हणून !!

- वैशाली वर्तक




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा