- गोफ -

उत्तररात्र - रॉय किणीकर ह्यांचे जेमतेम शंभर पानांचे पुस्तक. पुस्तक दिवसभरात वाचून होईल असे तुम्हाला वाटते आणि इथेच तुम्ही सपशेल फसता!

सुरुवातीलाच सुभाष अवचट यांनी रेखाटलेले रॉय किणीकरांचे रेखाचित्र आणि नंतर प्रस्तावनेसारखे आलेले कोलाज पुस्तकाविषयी मनोभूमिका तयार करतात. वाचायला सुरुवात करताच एक दोन पानातच आपली अवस्था वावटळीत अडकल्यासारखी होते. आपण भिरभिरत राहतो. ना जमिनीवर राहतो, ना अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोचू शकतो. अर्थाच्या अनेक शक्यता जाणवत राहतात आणि धूसर वाटेवर आपले मन चालत राहते. सलगपणे हे पुस्तक वाचून पूर्ण करूच शकत नाही.

रॉय किणीकर - एक असामान्य प्रतिभावंत. चतुरस्र प्रतिभेचे धनी. नाटककार, कवी, संपादक, कथा व पटकथालेखक, आकाशवाणी कार्यक्रमांचे निर्माते व लेखक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात संचार करूनही जाणवेल असा स्वत:चा ठसा त्यांना जणू कुठेच उमटू द्यायचा नव्हता. मस्तकातल्या भिरभिरत्या वादळाने आणि पायाला लागलेल्या भिंगरीने त्यांना एका ठिकाणी स्थिरावू दिले नाही. आज त्यांच्या पश्चात त्यांची कविता उरली आहे ती केवळ 'रात्र आणि उत्तररात्र ' ह्या संग्रहाच्या रूपातच.

चार ओळींचा आकृतिबंध घेऊन त्यांची कविता अवतरते. ह्या आकृतिबंधाला रुबाई म्हणावे की नाही ह्या विषयी वेगवेगळी मते वाचायला मिळतात. पण त्या तांत्रिक चर्चेत वेळ न घालवता, कविता काय सांगू पाहते आहे, ते महत्त्वाचे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,

" पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते,
मध्यरात्र एक स्वप्न देऊन जाते,
आणि उत्तररात्र म्हणजे
जागर-यात्रेचे पुन: प्रस्थान।"

काव्यसंग्रहाचे नाव जरी 'उत्तररात्र ' असले तरी त्या आधी 'रात्र' येणे अपरिहार्यच होते. कवितेची रचना अशी की म्हणावे तर प्रत्येक चार ओळी म्हणजे स्वतंत्र रचना आणि म्हणावे तर आधीच्या चार ओळीतल्या अर्थाची छाया नंतरही जाणवत राहावी. वाचताना कधी आपल्याला वाटेल की जीवनाविषयी समरसून लिहिले आहे. अमृताच्या अंकुरण्याविषयी सांगत एकदाच येणाऱ्या स्वप्नफुलापाशी कविता आपल्याला घेऊन जाते पण काही क्षणातच ह्या सगळ्यातील फोलपण सांगू लागते. मृत्यूचा, अवचित अर्ध्या डावावरून उठून जाण्याचा उल्लेख अनेक वेळा अनेक कवितातून येत राहतो.

राहिले तिथे ते तसेच अपुरे चित्र
राहिले तिथे ते तसेच अपुरे पत्र
घटिपात्र बुडाले, कलंडला नि:श्वास
पाखरू उडाले, पडला उलटा फास ।।

प्रेमाविषयी आणि मीलनाविषयी सांगणारी कविताच लगेच सांगते की प्रीती अक्षय आणि अक्षत नाही; चंचल आहे. मोहाच्या झाडाला कांचन-सर्पाच्या विळख्याचा शाप आहे. प्रत्येक कविता अवघ्या चार ओळीत विचारांचा मोठा पट उलगडून जाते. कविता वाचून संपते पण तिने मनात सुरु झालेले विचार चक्र थांबत नाही. त्या चार ओळीत कवीने एक विचार ठामपणे मांडलेला असतो. थोडे पुढे जावे तर त्याला पूर्ण छेद देऊन जाणारा विचार मांडलेला दिसतो. सगळे घडणे, घडवणे हे भगवंताचे देणे आहे, देव करुणेचा सागर आहे असे म्हणता-म्हणताच देवालाही म्हणजे राम, कृष्ण, येशू, पैगंबर ह्यांनाही मरण चुकले नाही असेही ही कविता सांगते. भगवंताचा बाजार मांडणाऱ्या दिखाऊ संतांविषयी,
कीर्तनात गातो - माझी माय विठाई,
फिरवितो जणू तिला बाजारातील बाई ,

असे अत्यंत भेदक भाष्यही करते..
विचारातील विविधता, अनिश्चितता आणि अर्थाचे हेलकावे वाचकाला स्वस्थता लाभू देत नाहीत. विचारचक्र गरगरत राहते. 'रात्र'चा शेवट होतो तो आणखी एका हृदयस्पर्शी कवितेने ,
"पण लिहावयाचे लिहून झाले नाही,
पण सांगायचे सांगून झाले नाही,
संपली कथा जी कुणी ऐकली नाही,
संपली रात्र, वेदना संपली नाही ।। 

रात्रीनंतर येते अर्थातच उत्तररात्र. जागरयात्रेचे पुनःप्रस्थान असलेल्या ‘उत्तररात्र’ मध्ये कविता म्हणते,

जे माझे होते माझे नाही उरले,
नसताना ओळख श्वास सोबती झाले 

जीवनाच्या क्षणभंगुर स्वरूपाविषयी, त्यातील अटळतेविषयी, आपल्या वाट्याला आलेली भूमिका चोखपणे वठवणे हे भागधेय असण्याविषयी -
हा दोन घडीचा डाव
या विदूषकाला नाही रडाया वेळ
लावून मुखवटे नवा खेळ चल लावू
ठेवून सावल्या पडद्यामागे जाऊ।।

असे कवी लिहून जातो आणि कवितासंग्रहात सतत जाणवणारा मृत्यू, अनिश्चितता, हतबलता, नियतीचे वर्चस्व अशा सगळ्या हलत्या सावल्यांचा भास आणखी गडद होत जातो.

हे स्वरूप चिन्मय देहापुरते नसते
हे स्वरूप चिन्मय देह जाळता उरते

सांगणारी कविता युगायुगांच्या अक्षर यात्रेविषयी राखेत अश्रूला फुटणाऱ्या हिरव्या कोंबाविषयी पण बोलते आणि जणू सगळ्या संग्रहाचे मर्म असावे अशी एक कविता आपल्याला दिसते,

हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो वाढत जातो सरतो
न जन्म मरण ना देहातील तो म्हणतो 

ह्या कविता वाचताना सतत भास होत राहतो की ह्या सगळ्या जगण्यात कवी कुठेच समरस झाला नाही आहे, गुंतला नाही आहे. तो जणू ह्या सगळ्यातून अलिप्त असा दुरातून ह्या जगण्याकडे पाहतो आहे. त्याचे गंतव्य वेगळेच आहे.

ही कविता आठवण करून देते गोफाची. विविध रंगांच्या, पोतांच्या धाग्यांचे पीळ घातले जातात आणि तयार होतो गोफ. ‘उत्तररात्र’मध्ये विविध विचारांचे धागे आपल्या मनाला पीळ पाडतात आणि तयार होतो गोफ. मात्र हा गोफ मऊसूत नाही; खरखरीत, सतत टोचून जागे करणारा आणि ठेवणारा, मनात रुतत जाणारा असा हा गोफ आहे.
- वृंदा टिळक

३ टिप्पण्या:

  1. वृंदाताई, प्रत्ययकारी रसग्रहण… !

    "ते स्वप्न कालचे ठेव तिथे पायाशी
    ते स्वप्न उद्याचे ठेव तिथेच उशाशी
    हा भरला येथे स्वप्नांचा बाजार
    घे हवे तुला ते, मिळते स्वप्न उधार"

    "या इथून गेले यात्रिक अपरंपार
    पाठीवर ओझे-छोटासा संसार
    किती शिणले दमले म्हणता माझे माझे
    वाकले मोडले, गेले टाकुनि ओझे"

    …… रॉय किणीकर

    उत्तर द्याहटवा
  2. उधार स्वप्नांचे ओझे टाकून, मोडून , अर्ध्यातून निघून जाणे वारंवार येत राहते. वाचकाच्या मनात वावटळ उठवून जाते.

    उत्तर द्याहटवा
  3. फार सुंदर विश्लेषण ! राॅय किणीकर , एक गुढ व्यक्तिमत्व !

    उत्तर द्याहटवा