राधा

आहे रम्य सारे काही 
मनाजोगते जग सारे 
पोकळी का अंतरीची 
रोज रोज डाचताहे 

जोडीदार तो देखणा 
प्रेमळ विनोदी मित्रसा 
जुळल्यात ना अजून तारा 
संभ्रमात का तू रोज मना 

भिरभिरणारे जणू प्राण 
पिल्ले माझी सारी सुजाण 
जातील तीही दूर उडून 
रुततील फक्त विरहाचे बाण 

कसली म्हणू ती नोकरी 
पैशात लपलेली चाकरी 
जाळल्या का मध्यरात्री 
इतुक्यासाठी ते नकळे 

आहेत मैत्रिणी आधाराला 
ओठांवर वर हसायला 
आधाराचा खांदा देऊन 
स्वदुःखावर रडायला 

वाखाणती वडीलजन चारही
मुलगीच मानती श्वशुरही 
प्रेम ओसंडून वाहते तरी 
वाटते कोरडेच का अंतरी 

उभे जग सारे जोडून हात 
फिरते भोवती दिन रात 
कोण लपलेसे खोल मनात 
अविरत का अदृश्य अश्रुपात

दुथडी वाहते जीवनगंगा 
रमवून रोमरोम अंग अंगा 
पालथाच तू आहेस घडा 
शोधिसी कसल्या प्रेमळ खुणा 

जीवन असेच असते मन्मना रे 
कधी ऊन कधी पाऊसधारा रे 
संगीत भरून राहिले निरनिराळे 
नाद विसर ना धुंद वेळूचा रे 

खंबीर असशी जगापुढती 
निर्भय लढा संकटांशी 
सांग रे तू का टाळशी 
जाणे रोज आरश्यापुढती 

मनात राहतो ना कान्हा
आरशात दिसतो पुन्हा पुन्हा 
नाद हा मनास जीवघेणा 
कशी थोपवू या गुरुत्वाकर्षणा 

होते तुझी आहे तुझीच मी 
थकून गेले रे धावून माझीच मी 
एकदा तरी सांग माझ्या कृष्णा 
तारून नेशील न आपुली राधा 



विवेक वैद्य


1 टिप्पणी: