प्रकाश नारायण संतांच्या कथा

काही महिन्यांपूर्वी शिफारसीमुळे "झुंबर" वाचलं. खूप आवडलं. त्यामुळे "वनवास" आणि "पंखा" मिळवली आणि ती दोन्ही आणि "झुंबर" अशी वाचनत्रयी केली. माझं बऱ्याचदा असं होतं की पहिल्या वाचनात आवडलेलं पुस्तक, पाहिलेला सिनेमा किंवा ऐकलेलं गाणं खूप आवडतं. त्याचा पुन्हा आस्वाद घ्यायला गेलं की "आपल्याला हे आवडलं होतं?!" असं वाटतं. कधी कधी उलटही होतं. "झुंबर" बाबत काय होतं, हे पाहायची उत्सुकता होती. त्याचबरोबर, तीन कथासंग्रहातून प्रकाश संतांच्या लेखनाविषयी काय कळतं, ह्याबाबतही कुतूहल होतं.

"पंखा"च्या मलपृष्ठावर प्रकाशकांच्या नोंदीत "… प्रकाश नारायण संत यांच्या आधीच्या संग्रहांना वाचकांचा, साक्षेपी समीक्षकांचा अपूर्व प्रतिसाद मिळाला. आजच्या आघाडीच्या मराठी लेखकांत त्यांना मानाचे स्थान मिळाले," असा उल्लेख आहे. बहुतेक पुस्तकांना वेगवेगळे पुरस्कारही लाभलेले आहेत. अर्थातच या कथासंग्रहांची काही बलस्थानं असली पाहिजेत ज्यामुळे ती वाचकांना आणि समीक्षकांना इतकी आवडली.

पुलं "वनवास"साठी लिहिलेल्या मलपृष्ठटीपेत म्हणतात, "पौगंडदशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांच्या मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या या कथा आहेत.… ह्या अवस्थेचं इतक्या सहजतेनं दर्शन घडवणारं लेखन माझ्या तरी वाचनात यापूर्वी आलेलं नाही … एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चट्कन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे." प्रकाश संतांच्या कथांचं हे प्रमुख बलस्थान. ह्या विषयावरचं, ह्या प्रकारचं लेखन मराठीत ह्या आधी झालं नाही, असं पुलं म्हणतात. ताजेपणामुळे प्रथमदर्शनीच भावणारं असं हे लेखन त्यामुळेच अनेकांच्या पसंतीस उतरलं असावं.

रचना: कथा की कादंबरी?

वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर हे कथासंग्रह आहेत. त्यामुळे प्रत्येक कथा ही वेगळी म्हणून बघायला हवी. पण त्याचबरोबर ह्या सगळ्या कथांचं प्रमुख पात्र लंपन हा मुलगा आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्ती -- आज्जी-आजोबा, आई-बाबा, भावंडं, नोकर, आणि मित्रपरिवार. हा समान दुवा सगळ्या कथासंग्रहांमधून कायम राहतो. एका कथेतले संदर्भ इतर कथांमधून येत राहतात; तो ही धागा या कथांना एकत्र बांधतो. त्यामुळे ह्यांना कथासंग्रह म्हणावं की कथांमधून मांडलेली कादंबरी म्हणावं कळत नाही. ही रचनापद्धती निवडण्यामागे लेखनाला मिळणारी मोकळीक आणि 'रचनापद्धतीचा ऊहापोह हवा कशाला' अशी भूमिका सोडता आणि काय कारणं असतील, हा प्रश्न कायम राहतो.

लंपन हा मोठ्या शहरात राहणारा मुलगा. आई, बाबा, धाकटी बहीण, आणि अगदी लहान भाऊ असं त्याचं कुटुंब. काही कारणानी त्याला कर्नाटक सीमेवरच्या एका गावात राहणाऱ्या आपल्या आज्जी-आजोबांबरोबर राहण्यासाठी पाठवलं जातं. तो तिकडच्या शाळेत भरती होतो आणि मग सुट्टीत आई-बाबांच्या घरी जाण्याव्यतिरिक्त ते गाव, शाळा, आणि लोक हाच त्याचा परिवार होतो. लंपन आज्जी-आजोबांकडे राहायला का आला, हे कोडं उलगडत नाही. कुठल्या तरी गोष्टीत एक टांगेवाला म्हणतो त्याप्रमाणे शिक्षणासाठी ह्या गावातून बाहेर अनेक जण गेले; मोठ्या शहरातून गावात आलेला लंपू पहिलाच. ते का, हे कुठेही कळत नाही.

सगळ्या कथासंग्रहांतून आजूबाजूची माणसं आणि परिवेश ह्यांचं लंपूच्या चष्म्यातून दर्शन होत राहतं. बऱ्याचदा हे कथासंग्रह म्हणजे वेगवेगळी व्यक्तीचित्रं आणि स्थलचित्रं यांचं संकलन आहे, असं त्यामुळे वाटत राहतं. याचं आणखी एक कारण म्हणजे प्रत्येक कथेत काही महत्त्वपूर्ण संघर्ष आहे असे नाही. बऱ्याचदा कथेचा उत्कर्षबिंदू (climax) हा फारसा वर चढत नाही. त्यामुळे, या सगळ्या कथांना कादंबरीची गती मिळते आणि रचनापद्धतीविषयी गोंधळ वाढतो. ह्या सगळ्या कथा कादंबरीरुपात आल्या असत्या तर लंपूच्या जीवनाचं आणि भावविश्वाचं एकसंध आणि म्हणून जास्त सकस दर्शन घडलं असतं का?

शैलीवैशिष्टये
हे सगळे कथासंग्रह गाजले ते त्यांच्या बेळगावी मराठीच्या वापरामुळे. मराठी बोलीचे चिरपरिचित आणि त्याच बरोबर बेळगावी बोलीचे मराठी वाचकाला नवीन असे विशेष या कथांमधून येत राहतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या गावातली बोली ही कथांच्या परिवेशाला आवश्यक असल्यामुळे ती कथेचा आणि पात्रांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून येत राहते. अर्थात निवेदक प्रमाण मराठीच वापरतो. निवेदक लंपन आहे. त्यामुळे तो जी मराठी शिकून ह्या गावात आला ती तो वापरतो आणि दुसऱ्या बोलीतले विशेष तो टिपतही राहतो. ध्वनी, पदिम, पदबंध, वाक्यस्तरावर हे विशेष दिसतात.

ध्वनी स्तर

"डेप्युटी" साठी "दिपोटी"
"हॅट" साठी "ह्याट"
"अंपायर" साठी "हंपायर"
"स्टॅंड" साठी "टॅण" 

यासारखी इंग्रजी शब्दांचं मराठीकरण दाखवणारी अनेक उदाहरणं सापडतात. त्यानं दरवेळी विनोद साधला नाही तरी भाषिक बारकावे पकडले जातात. याच बरोबर

"संस्थान" साठी "सौंस्थान"
"कार्यक्रम" साठी "कारेक्रम"
"रघुवर" साठी "रगुवर" 
"चमचाभर" साठी "च्यमच्याभर"
"महत्त्वाचे" साठी "म्हत्त्वाचे" 

यासारखी मराठी बोलीचे ध्वनीविशेष टिपणारी उदाहरणेही सापडतात आणि पात्रबोली अस्सल वाटते. पण "बेष्ट" या पुनरुक्त विशेषाबाबत एखादी गफलत होते.

हसायचं कारणच नाही. माझंही खरं नाव एकदम बेष्ट आहे. पण लोक मला म्हणणार लंपू, लंपन, ए लंप्या. त्यातलं लंपन हे नाव सगळ्यात बेस्टं वाटतं मला. (वनवास, पान ११८)

पदिम/शब्द स्तर

पदिम स्तरावर काही तुरळक उदाहरणं लंपू-बोलीला पूरक आहेत. उदाहरणार्थ:
बाबूरावच्या त्या देशमुखवाडीचे बरेच इंगे मला माहीत होते. (इंगा - इंगे)

"झुंबर" मधल्या "नकादु" या कथेत एक खूप छान पदिम स्तरावरचं निरीक्षण वापरून संत विनोद साधतात.

"मुलांचं, बाळांचं सर्व कसं पारिजातकाच्या फुलांसारखं असतं. आईवडील जवळ असले की टवटवीत. दूर गेले की?" "कोमेजवीत," मी म्हणालो.

शब्दस्तरावर लंपूचे काही विशेष खूप गाजले. पुलंनी सुद्धा त्यांच्या टीपेत ते वापरले आहेत! "मॅड"चा संतांनी केलेला वापर लंपूचं वय, त्याचा निरागसपणा अतिशय परिणामकारकपणे टिपतो. 

एकदा मी आमच्या तिकडच्या शाळेच्या मॅड जिन्यावरून उतरत असताना कुणीतरी मला ढकललं.
एवढयात घंटा मॅडसारखी वाजली.
आजोबा मॅडच आहेत. आज्जीला उगाच भीतात.

"सणसणीत," "तंतोतंत" या शब्दांचा वापरही असाच रंजक आणि परिणामकारक आहे.

इंग्रजी-मराठीच्या देवाणघेवाणीतून आलेल्या काही शब्दविशेषांचा वापर या कथांमधून दिसतो. "कृष्णाबाईंचे मिस्टर" यातला "मिस्टर" चा वापर अशा प्रकारचा. इंग्रजी-मराठीची अर्थक्षेत्राधारित देवाण -घेवाण अर्थातच आहे. क्रिकेटशी संबंधित कथाभागांमध्ये बरेच इंग्रजी शब्द येतात.

मॅच सुरु झाल्या झाल्या पांड्या सदलगेकरची दांडी उडाली. "नो बॉल होता", "नो बॉल होता" असं ओरडत तो परत आला. आम्हीही ओरडण्यात तयार झालो होतो. आम्ही लगेच ओरडायला लागलो,
"पार्सलेटी हंपायर, पार्सलेटी हंपायर!"
(वनवास, पान ७३)

मुलांच्या बोलीतल्या भाषिक देवाण - घेवाणीचं चांगलं भान संतांना आहे असं यावरून वाटतं. पण त्याच बरोबर हे ही आढळतं:

पण मधेच त्याच्या बॅटला कट लागून बॉल उंच उडाला. त्यांच्या विकेटकीपरनं तो झेल बरोबर घेतला. 
(वनवास, पान ७३)

बॅट, कट, बॉल आणि विकेटकीपर बरोबर "कॅच"च्या ऐवजी "झेल" खटकतो. कधी कधी लंपूच्या बोलीत घातलेले इंग्रजी शब्द लंपूचे की संतांचे ते कळत नाही. उदाहरणार्थ:

मला ते चांगलंच समजलं होतं. खडी दाबायचं इंजिन. स्टीम रोलर. 

यातला "स्टीम रोलर" लंपूचा नसून लेखकाचा असण्याची शक्यता जास्त. लंपूची आज्जी एकीकडे "विन्ट्रेस्ट" म्हणते तर दुसरीकडे "फ्लॉरेन्स नायटिंगेल," "असिस्टंट" असे इंग्रजी शब्द सर्रास वापरते. तपशिलात अशा गडबडी होत राहतात.

X + {बुवा, साहेब, महाराज} अशी रचना हा लंपूच्या बोलीचा आणखी एक विशेष. सर्व कथासंग्रहातून नियमितपणे वापरलेला. विनोदनिर्मिती आणि लंपूचा निरागसपणा दोन्ही टिपणारा.

आम्ही दोघांनी त्या जमखानेबुवाला जिन्याकडं नेऊन खाली टाकून दिलं माजघरात. (वनवास, पान १६)
घरचा पुढचा भला मोठा दरवाजेबुवा उघडाच होता. (वनवास, पण ४३)

पण त्याचबरोबर लंपू बोलीचा हा विशेष अचानक एकदाच त्याच्या एकाच मित्राच्या तोंडी येऊन जातो. 

"नको बा. जटायूसाहेब, तुमी आणि तुमची अंडी. बसा आणि उबवा. आमी जातो." कणब्या जोरात ओरडला. (वनवास, पान ८४)

लंपू निवेदनाव्यतिरिक्त हा विशेष कुठेही वापरत नाही. त्यामुळे, प्रत्यक्ष संवादातला हा वापर खटकतोच.

पदबंध स्तरावर अतिशयोक्त आडनिडी संख्या वापरून एखाद्या गोष्टीची भव्यता, तीव्रता वगैरे दाखवणे, हा लंपूच्या बोलीचा आणखी एक खूप छान विशेष. संतांनी फार मजेशीरपणे याचा वापर केला आहे.

पण इतक्यात दोन हजार दोनशे बावीस मुंगळे माझ्या पायावर चढत आहेत … (वनवास, पान २४)
पण भूगोलात जरी या दिशा एकोणीसशे वेळा येत असल्या … (वनवास, पण १४)
बराच वेळ बंद असलेल्या रेल्वे-गेटामागं तेवीसशे ट्रक उभे आहेत … (वनवास, पान ८७)

पण त्याच बरोबर त्याच्या या विशेषाचा त्यांना विसर पडतो आणि त्याचं प्रमाण "पंखा" आणि "झुंबर" मध्ये खूप कमी होतं किंवा "वनवास" मध्येच त्याचा विसर पडून "सतराशे साठ" हा प्रचलित वाक्प्रचार वापरला जातो.

हौद, नळ, बादली, तास असल्या सतराशे साठ गोष्टी त्यात होत्या. (वनवास, पान ५२)

कानडी मराठीची नडी (भूक), लिंगवट्टल (खेळाचे नाव) अशी काही शब्दस्तरावरची वैशिष्ट्यं सोडता या कथांमध्ये आढळणारी वैशिष्ट्यं मुख्यत: वाक्यस्तरावरची / व्याकरणिक. संत ती खुबीनं टिपतात.

"बघा बे. खेकडा पकडलो."
"कोण लोंबायलंय म्हणे?" "तम्म्या ककमरी" "अशी काय लोंबला तो?"
"एक थोडंसं खाली येऊन सोड. काय की सांगणार मी तुला."
"अय्यय्यो! माज्याकडं पाहिली ती."

ह्या कानडी मराठीनीच या गोष्टी वेगळ्या, ताज्या, लोभसवाण्या वाटल्या. संत या वैशिष्ट्यांचा वापर सहजगत्या, नुसता विनोदाकरता नव्हे तर पात्रबोलीकरता करतात. पण त्याचबरोबर बोलींच्या तपशिलात बारीकसारीक गफलती होत राहतात. उदाहरणार्थ, तीनही कथासंग्रहात लंपूची बोली प्रामुख्यानं प्रमाण मराठी आहे. पण "वनवास" मध्येच "… तो गाढव आहे असा काहीतरी अर्थ असावा असं ककमऱ्या सांगितला" (वनवास, पान ७३) असं कानडी बोलीच्या वळणाचं रूप लंपूच्या तोंडी येतं. असंच "पंखा" मध्ये एक नवं रूप लंपू बोलीत शिरतं.

बाहेर सगळी सृष्टी की काय ती भिजायलेली. (पंखा, पान १०४)
हा ही एक गाण्यांचा पाऊस घरात पडायलाय असंच झालेलं. (पंखा, पान १०९)

पण लंपूची बोली तो राहतोय तिथल्या बोलीनं बदलतीये असं म्हणावं, तर ही रूपं सातत्यानं येत नाहीत.

मला तिला ते सांगायचं नव्हतं असणार. (पंखा, पान १६२)
ती मी पाहायला नाही. (पंखा, पान १०७)

ही वैशिष्ट्यं तर अक्षरश: एकेकदा वापरली आहेत. त्यामुळे लंपूची भाषिक जडण घडण दाखवण्याचा प्रगल्भपणा दिसण्याऐवजी तात्कालिक गंमतीशीर व्याकरणिक वैशिष्ट्यं इतपतच या रूपांचं काम उरतं. हेच इतरही व्यक्तिरेखांबाबत दिसतं. कासारगोड नावाचं पात्र कानडी मराठी बोलतं पण मध्येच त्याच्या बोलीत प्रमाण मराठी दिसतं.

"आतापर्यंत कुणाला सांगितलो नाही हे सगळं. आता सांगितलो. नाहीतर मी मरूनच सोडणार असं वाटायलंय म्हणून सांगितलो घ्या. एल्सा मला एकदम भयंकर आवडणार. [तिचं माझ्यावर प्रेम आहे. लग्न करू या म्हणते. पण आमच्या आईचं काय?]"

एकीकडे "पापं! केवडा वनवास घडवलो मी तुम्हांला," "हिकडे आमी फुंकायलोय" म्हणणारा बाबूराव अचानक "आमचे काका दचकले. देवभक्त आहेत. तुमच्या गावातल्या लोकांसारखे नाहीत. त्यांनी त्या जागेची पूजा केली…" असं अस्खलित प्रमाण मराठी बोलायला लागतो.

लंपू आणि निवेदक यांच्या बोलीतला फरक सांभाळणंही अवघड. निवेदकाला एखादा शब्द नेहेमीचा तो लंपूच्या वयबोलीला न बसणारा असं होण्याचा कायमच धोका. त्याच्यावर एक चतुर उपाय लेखक करतो.

मग खरोखरच सभा बरखास्त की काय ती झाली. (पंखा, पान ६८)

'{X} की काय' अशा पद्धतीनं लंपूला न शोभणारे शब्द वापरण्याची सोय लेखक करून घेतो.

पात्रबोली सुसंगतरित्या सांभाळणं हे अवघड काम असतं आणि चांगल्या लेखकाचं लक्षणही. त्या कसाला संत पुरे उतरत नाहीत. मात्र कानडी बोलीचा अपरिचित मजेशीर वापर हे या कथांचं बलस्थान आहे.

या कथांमधून संतांचे काही पाठ्य विशेष समोर येतात. ते म्हणजे विनोद, काव्यात्मता, तपशील, आणि संयत मनोदर्शन. 

विनोद 

त्याची गलबतं की काय ती फुटणार. आमची सायकल पंचर. तो सिंदबाद, आम्ही सायकलबाद! (पंखा, पान ४८)
म्हाताऱ्या माणसाचं डोकं जुन्या टांग्यांच्या चाकासारखं असणार सोडा. जरा डग मारणारच. (पंखा, पान ४०)
सोन्डऱ्याचं नावही 'गुरुवेंद्राचार्य.' त्याला तीन चार हाका मारायच्या म्हणजे जिभेला खरचटायची पाळीच. (झुंबर, पान ६९)

असा नर्म विनोदाचा वापर संत सतत करतात. ह्या गोष्टींमध्ये क्वचितच खळखळून हसायला येतं पण त्या सतत गालातल्या गालात हसवत ठेवू शकतात.

काव्यात्मता 

चॉकलेटच्या वड्या रंगीत कागदात गुंडाळलेल्या असतात तशी ही मॅड पोरं कोणत्यातरी वासामध्ये गुंडाळलेली. (वनवास, पान १०५)
आम्ही फाटकासमोर उभे असतानाच एखादी सोन्याची लांबच्या लांब पट्टी कुणीतरी रस्त्यावर आणून टाकावी तसा सोनेरी उन्हाचा लांबलचक पट्टा रस्त्याच्या एका बाजूला पडला … तेवढ्याच भागातल्या त्या उन्हात उभी असलेली पोरं आणि पोरी सोन्याचा वर्ख लावल्यासारखी दिसत होती. (वनवास, पान १०५)
एखाद्यानं मानेपासून डोकं हलवावं तशी ती पानांनी संपूर्ण भरलेली झाडं वाऱ्यात डुलायला लागतात. (वनवास, पान ८२)
इकडं तिकडं चाललेले डांबरी रस्ते आकाशाच्या फिती कापून चिकटवल्यासारखे दिसत होते. (पंखा, पान १०३)

असं व्यक्तींचं, स्थळांचं तरल चित्रण संत करतात. पण ते करताना निवेदक लंपू आहे याचं भान फारसं सुटू देत नाहीत. अशा काव्यात्म निवेदनानं या लिखाणाला आलेली तरलता बहुतेक कथांमधून जाणवत राहते. त्याचबरोबर तिचा अतिरेक झाल्याचं दिसत नाही. 

तपशील 

स्थलचित्र उभं करताना तपशील टिपणे ही संतांची खासियत आहे. त्याचं हे एक उदाहरण:

त्यानंतर काही दिवसांनी मी परळ्या आणि कणब्याबरोबर नानावाडीला गेलो तेव्हा त्या पायवाटेनंच गेलो. त्या उंचवट्याच्या बरोबर मधून एक लांबच लांब फट असल्यासारखी होती. आमच्यापेक्षा उंच. दोन्ही बाजूंना मातीच्या भिंती. मधून ती मॅड पायवाट. मातीच्या भिंतीतून ठिकठिकाणी बाहेर आलेली मुळं. गवताचे पुंजके. भिंतीला केव्हाही ओकारी होऊन फटाफट बाहेर पडतील असं वाटणारे मातीतच रुतून बसलेले दगडांचे गुंडे आणि कितीतरी बिळं. काही सापांची, काही उंदरांची.
(वनवास, पान ८३)

संयत मनोदर्शन 

त्याचबरोबर लंपू उभा करताना लंपूच्या भावविश्वाशी सुबद्ध अशा उमपा, रुपकांचा वापर हे ही या कथांचं वैशिष्ट्य आहे. 

पण चहा करता करता त्यानं आधी शर्ट काढून टाकला, नंतर त्यानं गंजीफ्रॉकही काढला आणि शेवटी शेवटी तो नाटकातल्या घटोत्कचासारखा दिसायला लागला. (वनवास, पान ६१)
सुटी संपून शाळा सुरु झाल्यावर लगेच पावसाचीही घंटा इंद्राच्या दरबारात वाजल्यासारखी झाली. (पंखा, पान ९४)

त्याचबरोबर लंपू बहुधा dyslexic असावा असे त्याचेच उल्लेख, उदाहरणार्थ, "पण अक्षरांऐवजी वाकड्या तिकड्या फांद्यांचं दंडकारण्य की काय तेच कागदावर आहे आणि मी त्यात हरवलो आहे" इत्यादि, त्याचं भरून आल्यावर "घसा दुखणं," त्याच्या आठवणी वासांशी निगडीत असणं, उदाहरणार्थ, "सायकलच्या तेलाचा, रबराचा, उदबत्तीचा आणि जमिनीचा, असा कोणता तरी एकदम नवाच वास दुकानात भरून राहिला होता" अशा वैशिष्ट्यांतून लंपूची व्यक्तिरेखा रेखाटण्यात संत यशस्वी होतात. त्याची निरागसता ते उत्तम रीतीनं टिपतात. पौगंड अवस्थेतल्या भावभावना परिणामकारकपणे पण तरीही त्याच्या वयाला साजेश्या निरागसपणे दाखवतात. आणि हेच या कथांचं प्रमुख बलस्थान आहे.

एकंदर 

तीनही कथासंग्रहातून भाषिक वैशिष्ट्यं मात्र सैल पडतात. कधी एखादं वैशिष्ट्य संतांना आठवतं, मग त्याचा जाणवेल इतका वापर होतो. एखादं वैशिष्ट्य ते विसरून जातात आणि मग ते कितीतरी काळ गायब होतं. व्यक्तिरेखाही अशाच येत जात राहतात - विसरल्यासारख्या आणि मध्येच आठवल्यासारख्या. सुमीसारखी मुख्य आणि रोजच्या जीवनातली व्यक्तिरेखाही कित्येक कथांमधून हद्दपार राहते. तपशिलांमध्ये गडबड होत राहते. एकदा लंपन तिसरीतून चौथीत जाताना आजोळी आला तर एकदा सहावीतून सातवीत जाताना, एकदा बाबूराव लंपन गावी आल्यानंतर कामावर हजर झालेले तर एकदा तो यायच्या आधीपासून. एकदा त्याला गणित अवघड आणि दुसरीकडे एक गणितावर आधारलेला क्लिष्ट विनोद. एकदा त्याला चिंचा आवडत नाहीत तर दुसरीकडे सुमीला चिंचा द्याव्या लागल्या म्हणून राग. पात्रबोलींमध्ये आधीच दाखवल्याप्रमाणे गडबड होत राहते.

एकंदर, रचनानिवडीमुळे म्हणा किंवा अन्य काही कारणानी म्हणा, कथांमधून मांडलेली ही कादंबरी मराठीत वेगळं काहीतरी वाचल्याचा आनंद देते पण जिथवर जाणं शक्य होतं त्याच्या अलीकडेच थांबते.

नीतीन मोरे


३ टिप्पण्या:

  1. नीतीन, तुमची मॅड समीक्षा आवडली म्हणजे काय आवडलीच. या अतिसुंदर साहित्याबद्दल जेवढे बोलावे आणि ऐकावे तेवढे कमीच. तरीही सम्यक दृष्टीने सगळ्याचा केवळ उदोउदो न करता तुम्ही केलेली सूक्ष्म निरीक्षणे आणि सूचना अगदी तंतोतंत. संतांच्या सगळ्या कथासंग्रहांचे रसग्रहण कादंबरी स्वरूपात करणे अधिक प्रभावकारी झाले असते का हा विचारही सणसणीत. एकोणीस हजारदा संतांची पुस्तके वाचूनही काहीतरी राहून गेल्यासारखे का वाटते याबद्दल 'प्रकाश' पाडण्यातही तुमच्या समीक्षेची नीटच मदत झाली.

    लिखाणाची एकंदर वैशिष्ट्ये तुम्ही छान नमूद केलीत (विनोद, काव्यात्मता, इत्यादी). मला जाणवलेले आणि भावलेले दोन अजून पैलू:

    अ) प्रतीके
    एखाद्या प्रसंगाचे किंवा व्यक्तीचे वर्णन करताना लंपन त्याच्या छोटयाशा आयुष्यात पाहिलेल्या आणि डोक्यात घट्ट बसलेल्या गोष्टींची प्रतीके वरचेवर वापरतो. या प्रतीकांच्या चपखलपणामुळे वर्णनाची दृश्यात्मकता तर वाढतेच पण लंपनचे छोट्याशा गावातील साधे आणि निष्पाप भावविश्वही वाचकाला जाणवत राहते.

    काही उदाहरणे:
    १. ते 'नागझरी ग्राउंड' म्हणजे वर्गातला 'ढ' मुलांसारखं. ती कायम शेवटच्या रांगेत. तसं ते ग्राउंड एकदम शेवटचं. (शारदा संगीत. पृ.७४)

    २. मी ते पाकीट त्याच्याकडून घेतलं आणि ते तिकीट सावकाश सोडवायला लागलो. संत्र्याच्या फोडीवरचं साल रस न होऊ देता काढतात, तसं ते तिकीटही अगदी सावकाश कागदापासून सुटायला लागलं. (झुंबर. पृ.८०)

    ३. वट्टलनं काजूबिया उडवणं म्हणजे फटाक्यांची वात उदबत्तीने पेटवण्यासारखंच. नाकात सुंदर वास आणि शिवाय सगळीकडे शांत शांत. पण एकदा वात पेटवल्यावर? मग? आधी सुर्रर्रर्रर्र… आणि नंतर फटाकेसाहेबांचा दंगा असणार की नाही? तसंच हे. (शारदा संगीत. पृ.१०४)

    ४. कुशीवर झोपायसाठी वळणार होतो तेवढयात थेटरमधली सिनेमा सुरु व्हायच्या आधीची घंटा वाजते तसा माझा पाय दुखायला लागला एकदम. (झुंबर. पृ. ११९)

    ब) रेखाटने
    सर्वच पुस्तकात समाविष्ट केलेली अतिशय सुंदर रेखाटने वाचनाची खुमारी वाढवतात. निरनिराळ्या कथांमधले वातावरण, व्यक्ती आणि प्रसंग रेखाटनांमुळे अजून सजीव होते. वसंत सरवटे, जुनुका देशपांडे, अनिरुध्द दीक्षित, चंद्रमोहन कुलकर्णी आणि स्वतः प्रकाश संत या सर्वांचीच चित्रे गोष्टीचा अविभाज्य भाग असतात, होतात.

    विशेष आवडलेली काही:
    १. सुमीबरोबर दिसलेलं आवळ्याचं मॅड झाड (पंखा. पृ. ८६)
    २. लंपनचं विश्व (शारदा संगीत. पृ. ७०)... चंब्या कुलकर्णीचं हजार खोल्यांचे घर...असा सणसणीत नकाशा होणे नाही:-)
    ३. घसरगुंडी. (शारदा संगीत. पृ. ११५)
    ४. भिंत (झुंबर. पृ. ७०)
    ५. स्पर्श (झुंबर. पृ. १५१)

    तुमच्याबरोबर या पुस्तकांवर अजून चर्चा करायला नक्की आवडेल. लंपनची व्यक्तीरेखा आवडली असेल तर तुम्हाला "My Life as a Dog" हा swedish चित्रपट नक्कीच आवडेल. त्यातील Ingemar चे character अप्रतीम आहे. https://en.wikipedia.org/wiki/My_Life_as_a_Dog#Awards

    तुमच्या सुंदर लिखाणाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

    आपला,
    योगेश तडवळकर

    उत्तर द्याहटवा
  2. पुस्तक परीक्षण हे इतकं सखोल लिहिता येऊ शकता हे माझ्या गावीच नव्हतं.
    लेख -चपखल. परीक्षकाबद्दल हे परीखन बराच काही सांगतंय हे मात्र नक्की.

    भाषेच्या विवेचनात एक शंका - हि भाषा बेळगावी मराठी आणि सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्नाटक सीमा भागातील मराठी यांची सरमिसळ तर नाही ना? विशेषकरून 'बे' चा उपयोग एवढ्या मोठ्या प्रमाणात बेळगावी मराठीत होतो का?

    उत्तर द्याहटवा
  3. योगेश,

    इतकी तपशीलवार प्रतिक्रिया कळवल्याबद्दल खूप आभार. शैलीवैज्ञानिक समीक्षेला अभ्यासू वाचक मिळण्यासारखं भाग्य नाही. तू संतांच्या कथा कोळून प्यायलायंस हे दिसतंय - उघड, ठळक आणि जोरकसपणे 😀

    नक्की खरंच चर्चा करू या!

    उत्तर द्याहटवा