आरोग्यम् धनसंपदा: "'ग्रीष्मऋतु'"

"Prevention is Better Than Cure" ही म्हण आपल्याला हल्ली लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी ऐकायला मिळते. आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये मात्र याचा विचार जवळजवळ ५००० वर्षांपूर्वीच केलेला आहे. एकदा रोग झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून काय काळजी घेतली पाहीजे याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. त्यामुळेच आयुर्वेद आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिनचर्या (ideal daily routine) आणि ऋतुचर्या (seasonal daily routine) याचे मार्गदर्शन करतो.

ग्रीष्म ऋतू सुरु झाला की उकाड्याने जीव अगदी हैराण होतो, अंगाची लाही लाही होते, शरीरातील उष्णता वाढते आणि अनेक रोगांना नकळत आमंत्रण मिळते. अशा अवस्थेत आपल्या शरीरातील उष्णता कमी करून आरोग्य जपण्यासाठी काय उपाययोजना केली पाहीजे याचा आपण या लेखात विचार करूया.

ग्रीष्म ऋतूत हवामानातील वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरातील उष्णता वाढून पंचमहाभूतांपैकी अग्नी आणि जल या महाभूतांचे अधिक्य असलेल्या पित्तदोषाचा प्रकोप होतो. शरीरातील वाढलेल्या पित्तदोषांमुळे acidity, अजीर्ण, अग्निमांद्य (भूक कमी लागणे), डोकेदुखी, चक्कर येणे, डोळ्यांची व हातापायांची आग होणे, अत्याधिक तहान व घाम येणे, अशी लक्षणं उत्पन्न होतात. तसेच रक्तदुष्टीमुळे त्वचाविकार आणि शरीरातील स्निग्धता व ओलावा उष्णतेने शोषला जाऊन अनेक वातव्याधी उत्पन्न होतात. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील पित्तदोषाचे शमन करून आरोग्य जपण्यासाठी पुढील उपाय करावेत. सिंगापूर विषुववृत्ताच्या जवळ कटिबंधात येत असल्याने इथे कायमच उन्हाळा असतो. त्यामुळे खालील गोष्टी कराव्यात:

१. भरपूर पाणी प्यावे (फ्रीज मधील वापरू नये) - त्यामुळे शरीरातील आमदोष (toxins) बाहेर टाकला जातो.

२. द्रवपदार्थ भरपूर प्रमाणात प्यावे. कैरीचे पन्हे, कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळ्याचे सरबत, शहाळ्याचे पाणी, ताक, धन्याचे पाणी, नाचणीची अंबील, हे सर्व भरपूर प्रमाणात घ्यावे. यामुळे पित्तदोष साम्यावस्थेत येउन शरीरात थंडावा निर्माण होतो.

३. गुलकंद, तवकीलाची/अरारोटची खीर, तुळशीचे बी दुधातून किंवा कोरफडीचा रस दिवसातून एकदा तरी अवश्य घ्यावे.

४, संत्री, मोसुम्बी, कलिंगड, खरबूज, डाळिंब, सफरचंद, ताडगोळी, द्राक्ष, आंबा, वेलची केळी ही फळे तसेच काकडी, मुळा, गाजर, बीट, रताळी, भेंडी, पडवळ, माठ व पालक अशा भाज्या खाव्यात.

५. आंबट, खारट व गोड अशा रसांनी युक्त, ताजा व पचायला हलका असा आहार करावा.

६. रोजच्या जेवणात दुधा-तुपाचा भरपूर समावेश करावा.

७, पांढरा कांदा अवश्य खावा. तो शीतवीर्य असल्याने उष्णतेमुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या रोगांपासून रक्षण करतो.

८. डोळ्यांवर दुधात किंवा गुलाबपाण्यात भिजवलेल्या कापसाच्या घड्या ठेवाव्यात.

९. शरीराला, डोक्याला व तळपायांना तेलाने (चंदनादी तेल) मालीश करावी.

१०. सकाळी लवकर उठून जरूर व्यायाम (योगा, प्राणायाम) करावा.

खालील गोष्टी टाळाव्यात:

१. तेलकट, मसालेदार, तिखट पदार्थ (हिरवी मिर्ची, आलं, लसूण, लोणची), फास्टफूड, आंबवलेले पदार्थ.

२. चहा-कॉफीचे अत्याधिक सेवन.

३. थंड पाणी, कोल्डड्रिंक्स, दही, मद्यपान.

४. खव्याचे पदार्थ, बेसनापासून बनवलेली मिठाई.

५. बाजरी, धणे-जीरे वगळता सर्व मसाल्याचे पदार्थ.

६. शिक्रण, फ्रुटसालड.

७. अवेळी जेवण.

८. अत्याधिक क्रोध, चिंता, तणाव.

९. दिर्घकाळ उन्हात फिरणे.

१०.अंघोळीसाठी गरम पाणी.



पुन्हा भेटू  आरोग्यम् धनसंपदेच्या पुढच्या भागात … "आदर्श दिनचर्या" !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा